Sunday, October 6, 2024
Homeये हृदयीचे ते हृदयीआयुष्य व मानव – ये हृदयीचे ते हृदयी – १२ – अंजली...

आयुष्य व मानव – ये हृदयीचे ते हृदयी – १२ – अंजली महाजन

या जगात मानव जन्म हा श्रेष्ठ जन्म मानला जातो. तेव्हा या मानव जन्मी आपले आयुष्य अतिशय सुंदर सुरेख व्यतीत केले पाहिजे.मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही मग तो उत्तम प्रकारे निभावून नेला पाहिजे.
मानवाच्या बुध्दीचा विकास हा इतर प्राण्यांपेक्षा अधिक झालेला आहे त्यामुळे मानवाला बुद्धीवान प्राणी म्हणतात .
‌‌. मानवाने बुध्दीचा जोरावर प्रचंड प्रमाणात आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक वगैरे प्रगती केली आहे.स्वत:चा विकास करून घेण्यासाठी मानव आजही रात्रंदिवस मेहनत,काम, संशोधन करीत आहे.
मानवाचे आयुष्य फार छान आहे पण माणसाने त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघितले तर त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल.
आयुष्यात सगळे अनुभव मानवाला आले तर ते खरे आयुष्य असते ‌आयुष्याच्या रस्त्यावर चालताना एकदा तरी माणसानं पडलं पाहिजे तेंव्हा च त्याला कळेल ना,की आपल्या कडे बघून कोण हसतयं ? आपल्या कडे कोण दुर्लक्ष करतयं आणि आपण पडल्यावर आपल्याला कोण सावरायला येतयं ? याची अनुभूती घेतली माणूस पुढील वेळी अधिक सतर्क राहतो .कारण अनुभव हा माणसाचा फार मोठा गुरू आहे पण त्याच्या गुरुदक्षिणेची किंमत फार मोजावी लागते.
मानवाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे त्याची मेहनत ,त्याचे कष्ट,त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा सर्वोत्तम साथीदार म्हणजे त्याचा आत्मविश्वास होय.
मानवाने आयुष्य गेलेले दिवस मोजण्यासाठी घालवू नये तर उरलेले दिवस आनंदात कसे घालवता येतील याचे नियोजन केले पाहिजे. मानवाने काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय चांगलं घडवायचं आहे याचा विचार केला पाहिजे. आयुष्यात सफलता यश हे नेहमी विचारातून येते.चांगले विचार हे चांगल्या लोकांच्या सहवासातून येतात, म्हणून आयुष्यभर चांगल्या लोकांच्या सहवासात राहून जीवन जगले पाहिजे तर‌ आयुष्य ‌सुखमय जाईल.
मानवाच्या आयुष्यातील नकारात्मक विचार हे माणसाला कमजोर बनवतात व सकारात्मक विचार हे बलवान बनवतात म्हणून आयुष्यभर सकारात्मक विचार केले तर आयुष्यात काही समस्या येत नाहीत आणि जरी समस्या आल्या तरी मानव त्या सहजपणे सोडवू शकतो.एक वेळ माणूस शरीराने कमजोर असला तरी चालेल पण मनाने तो कधीच कमजोर असता कामा नये.आयुष्यात जीवन जगताना यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते व ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो.
आयुष्यात माणसाला अहंकाराने आणि गैरसमजाने घेरले तर माणूस महत्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो‌ कारण माणसाला गैरसमज सत्य ऐकू देत नाही, आणि अहंकार सत्य पाहू देत नाही.
‌कधी कधी अति विचारांमुळे माणूस आपल्या जीवनात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या की, अस्तित्वातच नसतात त्यामुळे माणसाला भावनिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.म्हणून समजूतदार पणा माणसाच्या अंगी असेल व ज्ञान थोडे कमी असेल तर‌ ज्ञानापेक्षा ही समजूतदार पणा महत्वाचा ठरतो.
आयुष्यात जीवनात शांतता हवी असेल तर माणसाने दुसऱ्या शी वाद घालत बसण्यापेक्षा, किंवा त्याला बदलवत बसण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्यावे , संपूर्ण जगात आपल्या पायाला खडे टोचतात म्हणून कारपेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालून घेणे अधिक योग्य असते.
आयुष्यात कितीही जपून चालायचे ठरवले तरी चालता चालता कधीतरी ठेच ही लागणारच, आयुष्यात कितीही आनंदाने जगायचं म्हंटले तरी माणसाच्या आयुष्यात थोडेफार दु:ख हे येणारच .तेव्हा आयुष्यात ठेच लागली म्हणून माणसाने चालणं का सोडायचं ? दु:ख आहे म्हणून जगणं का सोडायचं ? आयुष्यात दु:ख असतानाही आनंद शोधणं म्हणजे खरं जीवन असतं, आपण दु:खी असतानाही दुसऱ्यांना हसवणं हे च तर खरं जगणं असतं.
माणसातील माणुसकी, समजूतदारपणा,संयम,शांतता,हे गुण वयावर अवलंबून नसतात तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात.आयुष्यात माणसाला महत्वाकांक्षा असल्या शिवाय माणूस मेहनत करीत नाही आणि मेहनत केल्या शिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही.
माणसाने आयुष्यात सुख वेचायला शिकले पाहिजे,दु:ख सहन करायला शिकले‌ पाहिजे.दुसऱ्याचे अश्रू पुसायला शिकले‌ पाहिजे आणि इतरांना हसवायला शिकले पाहिजे.तर आयुष्य आनंदात जावू‌ शकण्यास मदत होते.
आयुष्यात जगायचं असेल तर माणसाने स्वतः च्या पध्दतीने जगले पाहिजे कारण या जगात लोकांची पध्दत वेळेनुसार सारखी बदलत असते.
आयुष्यात प्रत्येकाला आपले दुःख , आपल्या विवंचना सांगत बसू नये ,कारण प्रत्येकाच्या घरात त्यावर औषध नसते पण मीठ मात्र नक्की असते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी त्याची कोणाकडे तक्रार करू नये कारण परमेश्वर असा दिग्दर्शक आहे की तो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो .
‌‌. आयुष्यात वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच खरी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.माणसाने आयुष्यात शिक्षणा आधी बहुमोल संस्कार,व्यापारा आधी व्यवहार, आणि देवा आधी आई-वडिलांना समजून घेतले तर माणसाला जीवनात कोणात्याही समस्यांना तोंड देणे अवघड वाटणार नाही.
आयुष्यात प्रेम माणसावर करावे त्याच्या सवयींवर नाही,नाराज व्हावे त्याच्या वाईट वागण्यावर,बोलण्यावर पण त्याच्या वर नाही.त्याच्या कडून काही चूका झाल्या तर त्या विसरा पण त्याला विसरु नाही.कारण माणसापेक्षा मोठ्ठ या जगात काहीच नाही.
आयुष्यात आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना कृतीची जोड देऊन योग्य प्रवाहात आणणारी चा़ंगली माणसं आयुष्यात मिळणं ही महत्वाची गोष्ट आहे.
“आशा ” हा फक्त दोन अक्षरांचा शब्द पण पूर्ण जग या शब्दावर अवलंबून असते ‌.
माणूस हा प्राणी प्रचंड आशावादी आहे म्हणून तो आयुष्य भर आशेचे किरण पहात,आशेचे मनोरे रचत आयुष्य जगत असतो.
लेखिका
अंजली महाजन पुणे
१२|०४|२०२२

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क