आपण शालेय जीवनात असल्यापासून ग्रंथालयात अथवा शाळेच्या फळ्यावर “वाचाल तर वाचाल “ग्रंथ हेच खरे गुरु ” पुस्तका सारखा चा़ंगला दूसरा मित्र नाही यासारखे सुविचार वाचत लहानाचे मोठे झालो आहोत, त्यामुळे वाचनाचा संस्कार अगदी लहानपणापासून आपल्या मनावर कळत नकळत झालेला आहे याबद्दल दूमत नसावं असे मला वाटते.
प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर वाचनाचे ज्ञान सर्वांना होते पण काय वाचावे ? याचे ज्ञान सर्वांना होत नाही दर्जेदार वाचन व सकस वाचन करावे याचे ज्ञान अगदी थोड्या लोकांना होते.
वाचन करावे आपण म्हणतो पण त्याआधी वाचन म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.वाचन म्हणजे काय तर आकलना सह अक्षरांचे केलेले ध्वनी उच्चारणं म्हणजे वाचन होय.वाचनाचे दोन प्रकार आहेत १) प्रगट वाचन २) मुक वाचन
अक्षररूप ध्वनी च्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात.आणि लिखित किंवा मुद्रीत अक्षरे डोळ्यांनी पाहून नंतर त्या अक्षरांचा मेंदू ने अर्थ ग्रहण करणे यास मुक वाचन म्हणतात.
सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात वाचन संस्कृती कमी होऊ नये ती वाढावी म्हणून सर्वत्र भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.आणि जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन व मृत्यू दिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.
वाचन प्रेरणा दिनी आणि जागतिक पुस्तक दिनी वाचनास लेखनास व पुस्तक प्रकाशनास प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
भाषण, वक्तृत्व, वादविवाद,स्पर्धा,कथा कविता लेखन , सादरीकरण स्पर्धा अभिवाचन कथावाचन स्पर्धा घेतल्या जातात ग्रंथ प्रदर्शने, ग्रंथ दिंडी, साहित्य संमेलने, घेतली जातात.वाचनकट्टे,वाचनालये निर्माण केली जातात.
यांद्वारे चांगले लेखक,चा़ंगले वाचक, दर्जेदार साहित्य निर्माण होण्यास मदत होते.चांगला सुजाण भावी नागरिक निर्माण होण्यासाठी व्यक्ती वर लहानपणापासून वाचन संस्कार होणे गरजेचे असते.लहान वयात झालेला वाचन संस्कार तरूणपणी,प्रौढपणी,व वृद्धावस्थेच्या काळापर्यंत चिरकाल टिकून राहतो.वाचनामधून व्यक्तीला विलक्षण अनुभव प्राप्त होतो,निखळ आनंद प्राप्त होतो व त्या व्यक्तीचे जीवन समृद्ध व संपन्न होण्यासाठी मदत होते.
वाचन कधी करावे ?कसे करावे ? केव्हा करावे याबाबत काही लिखित नियम नाहीत . वाचायला येऊ लागल्यापासून ते डोळ्यांनी छान दिसत आहे ,शरीर साथ देत आहे तोपर्यंत वाचन करीत राहिले पाहिजे.
वाचन अंधारात करू नये, पुरेसा उजेड असेल तेथे करावे, खूप गोंगाट असेल तर तेथे वाचन करू नये शक्यतो वाचनाची जागा शांत असावी .वाचताना आपली बैठक योग्य असावी.वाचताना शरीराच्या कोणत्याही भागावर ताण येणार नाही उदा.पाठ,मान वगैरे याची काळजी घ्यावी.
वाचताना एखादं वाक्य समजले नाही किंवा वाक्याचा बोध झाला नाही तर ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचायचे पुस्तकातील काही वाक्ये , विचार आवडले तर त्याची नोंद स्वतंत्र डायरीत,विहीत करून ठेवावी.पुस्तकात रेघा, खुणा,स्टार करून पुस्तक विद्रुप करु नये . पुस्तकात आपल्या हाताने काही लिहू नये.
वाचनाचे खूप फायदे आहेत ते जाणून घेतले पाहिजेत म्हणजे आपण वाचनापासून वंचित राहणार नाही.
वाचलेल्या पुस्तकांमधून आपण कोणत्या तरी प्रकारचे ज्ञान संपादन करतो व त्यामुळे आपली विचार शक्ती वाढते.वाचनामुळे चांगल्या गोष्टींची प्रेरणा मिळते, माणूस सुशिक्षित होतो . दर्जेदार वाचन सतत केल्याने माणसाची वागणूक बदलण्यास मदत होते समाजातील सर्व स्तरातील लोकांशी वागण्याची,बोलण्याची कला अवगत होते.
वाचनामुळे आपली स्मरणशक्ती, आकलनशक्ती, वाढण्यास, मदत होते,आपला शब्द संग्रह वाढून आपले संवादकौशल्य वाढण्यास मदत होते.वाचनामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व आपण सुजाण सजग नागरिक होण्यास मदत होते आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा वाचनात रमून जातो त्यावेळी आपण आपला भूतकाळ विसरून जातो. जीवनातील वाईट,दु:खद प्रसंग, विसरतो त्यामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते
वाचन हा एक चांगला छंद आहे उत्तम सवय आहे, त्यायोगे आपण एक उत्तम व्यक्ती बनू शकतो व चा़ंगले यशस्वी जीवन जगू शकतो.सतत चांगले वाचत राहिल्यामुळे मनात चांगले विचार येतात व चांगल्या कृती घडून येतात चांगल्या कल्पना मनात येतात, त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होते.
वाचनामुळे निर्णय क्षमता वाढते , मनोरंजन होते, मनाला आनंद,शांती लाभते,मनाची एकाग्रता वाढते.भावनिक आरोग्य सुधारते , सामाजिक, भावनिक, मानसिक,विकास हा वाचनामुळे अधिक चांगल्या प्रकारे होतो.
बैठे खेळ,अथवा मैदानी खेळ खेळण्यासाठी आपल्याला कोणाची तरी सोबत लागते, गप्पा मारायला ही कोणीतरी व्यक्ती लागते पण वाचन करायला कोणाचीही गरज लागत नाही आपण एकटे आपले आवडते पुस्तक घेऊन आपल्या मनाची छान करमणूक करू शकतो एवढे वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
थोडक्यात काय तर वाचनाचा छंद जोपासून आपण आपले जीवन आनंदमय सुखमय करायचे .
वाचलेल्या पुस्तकांमधून मिळालेले चांगले विचार कसे आत्मसात करता येतील या विषयी विचार करायचा.
लेखिका
अंजली महाजन पुणे
१०|०४|२०२२
वाचाल तर वाचाल – ये हृदयीचे ते हृदयी – ११ – अंजली महाजन
RELATED ARTICLES