मधुसूदन चिंतामण शेंडे आणि श्यामला मधुसूदन शेंडे या भारदस्त नावाच्या दांपत्याशी माझी ,आमची ओळख नेमकी केंव्हा व कशी झाली ते नेमके आठवत नाही.स्वभाविकच आहे;योगापेक्षा सह्ज योगाने निर्माण झालेले मैत्र ‘तिथीबारच न क्षत्र ‘ प्रमाणे आठवत नाहीच! त्याच अस झाल,की तुळशीबागवाले कॉलनीतील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या क्रीडांगणाला फेर्या मारणार्या आम्हा काही मित्रांना शेंडे भेटले ते प्रभात फेरी मारताना.आठवत एव्हढच, की एक उमदा देखणा गृहस्थ ओळख करून घ्यायला आणि द्यायलाही स्वत: पुढे आला.
‘मी मधुसूदन शेंडे तुळशीबागवाले कॉलनीतील धोमकर रस्त्यावर ‘अमितदीप’ या इमारतीत राहतो.ही माझी पत्नी श्यामा.सिव्हील इंजिनीअर म्हणून देशविदेशात चाळीस वर्षे काम केल आणि आता सेवानिवृत्त होऊन मस्त जगायचं ठरवून परत पुण्याला आलो आहे.’ बहुधा ते वर्ष असाव १९९६ .महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर.त्या ओळखीनंतर एम.सी.शेंडे याना आम्ही सगळेच शेंडे साहेब म्हणू लागलो.ठरवून नव्हे अगदी सहज.देशविदेशात मोठे आणि महत्वाचे बांधकाम प्रकल्प राबविणारे मधुसूदन शेंडे एखाद्या ब्रिटीश साहेबासारखेच वाटले. लवकरच विश्वास बसणार नाही अशी स्वत:विषयीची हकीकत शेंडे साहेबांनीच सांगितली.’मला पार्किन्सन्स डीसिजचा त्रास आहे’.’१९९३मध्ये तो लक्षात आला.’
खर सांगायचं तर पार्किन्सन्स आणि ‘अल्झायमर्स’ या आजाराविषयी केवळ ऐकून होतो.शेंडे साहेबांमुळे पार्किन्सन्स कळत गेला.माझ्या धाकट्या कन्येने ‘अल्झायमर्स’नावाच्या एकांकिकेत तो आजार झालेल्या तरुणीची भूमिका केली होती.प्रेक्षकांच्या ती चांगलीच अंगावर आली होती. धरण,रस्ते आणि इमारती रचण्याचा उद्योग कलेल्या शेंडे साहेबाना शरीर रचना शास्त्र बर समजत असाव.कारण मुळात मेंदूचा विकार असलेल्या पार्किन्सन्सचा शरीरावर कसा परिणाम होतो हे त्यांनी तितक्याच सहजपणे सांगितलं.जितक्या सहजपणे बांधकाम प्रकल्पाविषयी सांगत.
शेंडे साहेब हा तसा गप्पिष्ट माणूस.गोष्टीवेल्हाळ म्हणावा इतका.स्वत:विषयी सांगता सांगता दुसर्याविषयी जाणून घ्याव याची खूप हौस असते.त्याना.स्वत: बोलतील आणि दुसर्याला बोलत करतील हा त्यांचा स्वभाव.निरनिराळ्या विषयावर इंटर अॅक्शन झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह.त्यांच्या या स्वभावाचा खरा अनुभव आला तो आमच्या ‘हिंडफिरे’ गटाच्या सहलीमधून.आम्ही पाच दांपत्ये,दोन साठे,एक कानडे,एक देव आणि एक शेंडे.सहली काढायची टूम काढली तीही बहुता शेंडे साहेबांनीच. केरळ झाल,कर्नाटक झाल,गोवा झाल, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूदेखील झाल.एवढच काय अंदमान आणि चारधाम यात्रा देखील झाली.या सगळ्या हिंडण्याफिरण्यात शेंडे साहेबांचा उत्साह काही औरच म्हणायचा.त्यांचा पार्किन्सन्सचा वाढता आजार त्या दहा वर्षात त्यांनी एखाद्या मित्रासारखा वागवला.अर्थात श्यामाताई त्यांच्याबरोबर ‘सावली’ सारख्या असायच्या.त्यांच्यामुळेच शेंडेसाहेब स्वावलंबी राहू शकले.
शेंडे साहेबांचे दोन्ही मुलगे अमेरिकेत स्थायिक आहेत.शिक्षण संशोधन क्षेत्रात नाव लौकीकासह कार्यरत आहेत.शेंडे साहेबांच्या सुनाही तितक्याच मातब्बर.नातवंड प्रगतीपथावर.प्रतिवर्षी अमेरिकेला मुलांकडे जाण्याचा शेंडे दंपतीचा उत्साह दांडगा. अमेरिकेत पार्किन्सन्स-मित्र मंडळी चांगलीच संघटीत.तेथील मुक्कामात शेंडे साहेबांनी या आजारासंबधी जेवढी माहिती मिळवता येईल तेव्हढी मिळविली.काही रुग्णांना ते प्रत्यक्ष भेटले.अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी मला जे काही सांगितलं,दाखवलं त्यात ‘पार्किन्सन्स’ साहित्याचा भरणा असे.ही माहितीपत्रके,ते अहवाल,ती पुस्तके अस नाना परीच साहित्य. अमेरिकेतील पार्किन्सन्स मित्र-परिवाराप्रमाणे पुणे शहरात पार्किन्सन्स मित्रमंडळ स्थापन करण्याची कल्पना आणि कृती शेंडे साहेबांचीच.अर्थात श्री. शरच्चंद्र पटवर्धन यांच्या पुढाकाराचा मित्रमंडळ सुरु करण्यासाठी फार उपयोग झाला.
शेंडेसाहेब हे पुणे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य आहेत.मंडळ स्थापन झाल २००० साली पण त्याआधी कितीतरी वर्षे शेंडे साहेबांनी पार्किन्सन्स रुग्णासाठी काम केल आहे.श्यामला शेंडे यांची साहेबाना सतत सक्रीय साथ आहे.पुण्यात असो की परदेशात ते दोघे सतत पार्किन्सन्स या आजारावर विचार करीत आले आहेत.अमेरिकन पार्किन्सन्स,डिसीज असोशिएशनशी संपर्क साधून आहेत.पार्किन्सन्स या एकाच विषयावर त्यांनी माहितीपत्रके,पूरक पुस्तके,उपयुक्त अशा चित्रफिती संग्रहित केल्या आहेत.पुस्तके मराठीतून भाषांतरित करण्याची परवानगी अमेरिकेतील प्रकाशकाकडून मिळवली आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाने तीन पुस्तकांचे भाषांतर केले ते शेंडे साहेबांच्या सौजन्यामुळेच! विशेष म्हणजे अमेरिकन पार्किन्सन्स,डिसीज असोशिएशन ( APDA ) ने शेंडे दांपत्याला प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.
शेंडे साहेब एक निष्णात सिव्हील इंजिनिअर.अनेक अभियांत्रिकी संस्थांचे सन्माननीय सभासद.अकराहून अधिक देशात बांधकाम,बांधकाम व्यवस्थापन,बांधकाम विषयक सल्लामसलत इत्यादी महत्वाची कामे पार पडलेला यशस्वी बांधकाम अभियंता.अशा व्यक्तीला पार्किन्सन्स सारखा झिजवणारा आजार व्हावा या भोगाला काय म्हणावे? बरे शेंडे साहेबांसारखा मनुष्य असा आजार सहज साहून जातो तरी कसा? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेंडे साहेबांसारख्या उमद्या व्यक्तीला पार्किन्सन्स सारखा आजार व्हावा या भोगाला काहीही म्हणता येणार नाही.तो आजार ते कसा निभाऊन नेतात हे महत्वाच.
शेंडे साहेबांनी आजाराच स्वागत केलय.त्याची लक्षण ओळखली आहेत.त्याचे परिणाम जाणून घेतले आहेत,आपण जे अनुभवल,आपल्याला जे उमगल ते इतराना सांगून समजाऊन घेऊन वेदना आणि दु:ख वाटून घेऊन हलक कराव अस त्याना मनापासून वाटत आल्याच जाणवत.’वेदनेचा जयजयकार’ हे तत्वज्ञान असू शकत प्रत्यक्षात वेदना शमवणारे उपाय आणि औषध याना शरण जाणे जमले तरी पुष्कळ काही घडून येऊ शकत अस शेंडे साहेबांना वाटत असणार पार्किन्सन्स सारख्या आजारावर ‘ निवांता साहून जाणे म्हणजे हातपाय गाळून बसणे नाही: तर त्या आजारावर मात करीत म्हणणे,-
मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण | मोक्ष अथवा बंधन,सुख समाधान इच्छा ते | |
शेंडे साहेब प्रसन्न आहेत.आज आत्ता आणि या क्षणीही.
डॉक्टर विजय देव यांचा परिचय
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या उभारणीच्या काळात डॉक्टर विजय देव आणि विणा देव यांची मोलाची मदत लाभली.विजय देव यांनी एस.पी.कॉलेजमध्ये ३० वर्षे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.राज्यशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.कौटिल्य आणि मॅकिअव्हेली यांचा तुलनात्मक अभ्यास हा त्यांचा पीएचडीच्या संशोधनाचा विषय होता.गो.नी.दांडेकर दुर्ग साहित्य संमेलनाचे ते प्रवर्तक आहेत.गो.नी.दांडेकर यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे कार्यक्रम डॉक्टर देव यांच्यासहत्यांचे सारे कुटुंब करते हे सर्वश्रुत आहे.
त्यांनी आपले मित्र शेंडेसाहेब यांच्यावर लिहिलेला लेख २१ मे या शेंडे साहेबांच्या वाढदिवसादिवशी प्रसिद्ध करत आहोत.