Saturday, December 21, 2024
Homeवृत्तांतशांतीवन सहल वृत्तांत

शांतीवन सहल वृत्तांत

पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थीसाठी सहल ही आनंदाची पर्वणी असते.वर्षभराच्या आनंदाची बेगमी असते.आत्तापर्यंत दुपारी २.३० ते ६.० अशी अर्धवेळ सहल असायची. मागील वर्षीची पूर्ण दिवसाची सहल यशस्वी झाली त्यामुळे यावर्षीही दिवसभराची सहल करायची ठरली.पुण्याजवळील सिंहगड रोडवरील शांतीवन हे ठिकाण आणि १८ नोव्हेंबर तारीख ठरली. सहल असली की दोन महिने आधीपासूनच पूर्वतयारी सुरु होते. जायच्या  आदल्या दिवशी पर्यंत अचानक अडचणी उद्भवतात.सहलीच्या दिवशीही एखादी व्यक्ती उशिरा आल्याने पुढचे  सर्व वेळापत्रक कोलमडते..पूर्वानुभवावरून हे सर्व गृहीत धरलेले  असते  पण शांतीवन सहलीने पूर्वीचे सर्व अनुभव मोडीत काढले.

पाडळकर पती पत्नी चिंचवडहून येणार होते. आम्हाला वेळ झाला तर गाडी थांबवा असे त्यांनी सांगितले होते.शीलाताई कुलकर्णी स्वत:ची गाडी घेऊन येणार होत्या. बस थांबवण्यापेक्षा त्यांची  गाडी मागे ठेवायची ठरवलं होत.पण तशी गरजच पडली नाही.सर्व जण वेळेत आले.सर्वाना त्यांच्या नावाचे  बॅचेस देण्यात आले.अंजलीने हजेरी घेतली.४८ शुभंकर, शुभार्थी सहभागी झाले होते.आजार, वय विसरून  सर्वांनी लहान व्हायचं होत.शरच्चंद्र पटवर्धन यांनी ओरिगामी साठी कागद कापून  आणले होते ते सर्वाना देण्यात आले.ब्रेकफास्ट बसमध्ये द्यायचा होता.तोही वेळेत आला.बस मार्गस्थ झाली’.साथी हात बढाना’ पद्धतीने ब्रेकफास्ट वाटप सुरु झाले.उमा दामलेनी लाडू देणे सुरु केले.शुभार्थीना हातात धरायला सोपे असे सुंदर पॅकींग होते.व्हेजिटेबल उपम्यावर खोबरे,शेव,डाळिंब यांची पखरण होती.पंचाहत्तरीनिमित्त गोपाळ तीर्थळी यांनी नाश्ता  दिला.सविता ढमढेरेने स्वत: घरी केलेले रव्याचे लाडू आणले होते.थंडीही त्यादिवशी बोचरेपणा कमी करून सुखद बनली होती..खाण्याचा  आस्वाद घेऊन झाल्यावर गाण्याला सुरुवात झाली.

महेंद्र शेंडे खास आमच्या मदतीसाठी आणि त्यांच्या गाण्याने सहलीची रंगत वाढवण्यासाठी आले होते. टाळांच्या साथीने त्यांनी ‘रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली,चला जाऊ पुसायला’.हे गमतीशीर गीत गायला सुरुवात केली. सर्वाचेच आवाज त्यात मिसळले.काहींनी ओरिगामी करून आपली कलाकृती सादरही केली.विजय ममदापूरकर यांच्यातील खोडकर मुल जागे झाले होते.त्यांनी शेजारी बसलेले दिलीप कुलकर्णी,गाणे सांगणारे महेंद्र शेंडे,लाडू वाटणारी उमा यांची व्यंगचित्रे काढली.चालती बस आणि थरथरणारे हात यांचा त्यांना विसर पडला होता.

खडकवासला धरणाच्या काठाकाठाने बस जात होती.महेंद्र शेंडे गाईडचे काम करत बाहेरील महत्वाच्या गोष्टी पाहण्यास सांगत होते.बघता बघता शांतीवन आलेही.गेटमधून आत शिरताच,भरपूर झाडी,सुंदर फुलझाडे,हौदात फुललेली विविध रंगी कमळे,आखीव रेखीव रस्ते,बसायला  पार,  अगत्याने स्वागत करणारे कर्मचारी आणि स्वच्छता हे सर्व पाहून  मन प्रसन्न झाले.विविध पक्षांचे  आवाज आणि सहलीसाठी आलेल्या बालवर्गातील २५० मुलांचा  किलबिलाट दोन्हीही सुखावणारे.मोठ्या हॉल मध्ये चहा,कॉफी,बिस्किटांची सोय केली होती.चहापानानंतर सभा मंडपात आम्ही आलो.परस्पर परिचयाचा कार्यक्रम होणार होता.भिंतीवरील मोठ्या आकारातील ओम पाहून सर्वांनी आधी शांत बसून ओंकार करूयात असे शेंडेनी सुचवले.सर्वांकडून ओंकार म्हणवूनही घेतला.वातावरण सकारात्मक लहरींनी भारावून गेले..नकळत एकरसता निर्माण झाली.एरवी कंटाळवाणा होऊ शकणारा परिचय कार्यक्रमही नेटका  झाला.सहलप्रेमी आणि आज आपल्यात नसणाऱ्या शेंडेसाहेब,अनिल कुलकर्णी, चंद्रकांत दिवाणे या शुभार्थींच्या आठवणीनी सर्वच भावूक झाले.प्रत्येकजण मित्रमंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते.रामचंद्र करमरकर यांनी प्रत्येकाच्या  ओळखीनंतर त्या त्या व्यक्तीचे  मंडळासाठी योगदान,शुभंकर, शुभार्थी,स्वयंसेवक  म्हणून वैशिष्टे सांगत टिप्पणी जोडली.परिचय रंगतदार केला.वसू देसाईनी चौकटीतील फुले ओळखा  आणि वाद्ये ओळखा अशी दोन कोडी करून आणली होती ती सर्वाना वाटण्यात आली.

यानंतर १ वाजेपर्यंत शांतीवन फिरण्यासाठी मुभा होती.निसर्ग पाहणे,फिरणे,खेळणे,आराम करणे,बऱ्याच पायऱ्या उतरून खडकवासला धरणाचे बॅक वॉटर पाहणे,विविध आकाराच्या रंगीबेरंगी दगडांचे संग्रहालय पाहणे ज्याला जे हवे ते करता येणार होते.प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार,क्षमतेनुसार मार्ग निवडले.ज्यांना आराम करायचा होता त्यांच्यासाठी हॉलजवळील व्हरांड्यात बाजा टाकून देण्यात आल्या.हवे असल्यास बागेतही विविध ठिकाणी बाजा होत्या.काही शुभार्थीना आरामाची गरज होती.कितीतरी दिवसांनी त्यांच्या शुभंकरानाही निश्चिंतपणे मोकळा श्वास घेता येणार होता.संधीचा फायदा घेत त्यांनी झोपाळे,झुलतापूल,विविध खेळ यांचा मनमुराद आनंद लुटला.काहीजण गटाने गुजगोष्टी करत बसले,ज्यांना शक्य नव्हते त्यांनी हॉलमध्ये बसून कोडी सोडवणे, ओरिगामी करणे पसंत केले.कुठेही असाल  तरी पार्श्वभूमीला मंद, मधुर,सुरेल संगीत असाव तशी  निसर्गाची अदृश्य साथ होतीच.कडक ऊन नाही,गार वारा नाही.विशेष म्हणजे नेहमी सहलीच्या ठिकाणी आढळणारे वातावरणातील एकतानता भंग करणारे कर्कश संगीत नव्हते.अनेकांचे मोबाईल हे आनंदाचे क्षण मात्र टिपत होते.मने भरली नव्हती पण जेवायची वेळ पाळायची होती.सर्वजण स्वयंशिस्तीने डायनिंग हॉलमध्ये जमा झाले.

बुफे पद्धतीने जेवण मांडलेलेच होते.सर्वांनीच रांग लावून जेवण घेतले.ज्यांना खूप चालणे शक्य नव्हते त्यांना सभा मंडपात जेवण दिले.आल्यापासून कर्मचारी शुभार्थींची अवस्था पाहत असल्याने न सांगताच मदत करत होते.चटणी ,कोशिंबीर,पापड,दोन भाज्या,पुलाव,डाळ,गुलाबजाम असे साधेच पण चवीष्ट,गरम गरम  जेवण होते.कर्मचारी जातीने कोणाला काय हवे नको पाहत होते.

जेवणानंतर सर्व पुन्हा  सभामंडपात  जमले.आता खेळ,करमणुकीचे कार्यक्रम ठरले होते.

प्रथम विजय ममदापूरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील व्यंग चित्राची गमतीदार आठवण सांगितली.तास चालू असताना सरांचेच व्यंगचित्र काढल्याने शिक्षकांनी कान पिरगाळला.पालकांना बोलवायला सांगितले.ते अमेरिकेत गेलेल्यावेळी मात्र त्यांच्या व्यंगचित्राचे कौतुक झाले. गंमत म्हणून काढलेली व्यंगचित्रे  १०/१० डॉलरला विकली गेली.कुस्तीपटू ममदापुरकर यांनी व्यायामाचा अतिरेक नको असा सल्ला दिला.अशा अतिरेकानेच  आपल्याला पार्किन्सन्स झाला असे वाटत असल्याचे सांगितले.

वसू देसाईने दिलेले कोड्यांचे कागद आता गोळा करावयाचे होते. पाच मिनिटाची वार्निंग बेल देण्यात आली.सर्वाना शाळकरी झाल्यासारखे वाटत होते.सर्व वाद्ये आणि सर्व फुले ओळखणारेही निघाले.विजया दिवाणेनी दोन्हीमध्ये पहिले बक्षीस मिळवत चंद्रकांत दिवाणे यांची परंपरा चालू ठेवली.त्यांच्या बरोबरीने रेखा आचार्य,विजय ममदापूरकर,अंजली महाजन, हेही विजयी ठरले.ओरीगामिचे परीक्षण महेंद्र शेंडे यांनी केले.सौ.ठक्कर यांच्या पंख्याला पहिले,श्रद्धा  भावे यांच्या पंचपाळ्याला दुसरे,अंजली आणि वसू या दोघीच्या फोटोफ्रेमला  तिसरे,अरुंधती जोशी यांच्या जंबो विमानाला आणि शशिकांत  देसाई यांच्या फ्लॉवरपॉटला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.या सर्वाना तसेच पुढे करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेणार्‍यांना   डायऱ्या देण्यात आल्या.व्यंगचित्रे काढल्याबद्दल ममदापूरकर यांना खास बक्षीस देण्यात आले.

आता पुन्हा करमणुकीच्या कार्यक्रमाकडे वळायचे होते.

शीलाताई कुलकर्णी यांनी एक विनोद सांगितला.’एका माकडाने काढले दुकान’ हे बालगीत ठसक्यात म्हणत स्वत:तील लहान मुल जपल्याचे दाखवून दिले.यानंतर अनुपमा करमरकर यांनी ‘केतकीच्या बनी तिथे’ हे अवघड गीत लीलया म्हटले.वन मोरच्या आग्रहाने ‘अंगणी माझ्या मनीच्या’ हे गीत म्हटले शेंडेनी टेबलावर ठेका धरला.अंजलीलाही नृत्य करण्याचा मोह झाला.कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.अनेकांना गाण्यासाठी फर्माईश होऊ लागली.मग  शोभना तीर्थळी यांनी ‘रसिक बलमा’ आणि ‘खुलविते मेंदी माझा’ ही गीते म्हटली. उमा दामलेनी ‘घनघन माला’ आणि’ ‘ओ सजना बरखा बहार आयी’,सविता ढमढेरेनी’ सांज ये गोकुळी’,ही गीते म्हटली.केशव महाजन यांना काहीतरी सादर करायचे असते.ते खूप एक्साईट होतात आणि दमतात म्हणून आम्हाला काळजी वाटत असते.पण आमच्या काळजीला न जुमानता त्यांनी सौदागर मधील राजकुमारचा संवाद आणि’ सबकुछ सिखा हमने’ हे अनाडी मधले गाणे म्हटले.चहासाठी डायनिंग हॉलमध्ये जायचे होते.पण शुभार्थीना पुन्हापुन्हा नाचानाच करणे कठीण आहे हे कर्मचार्‍यांच्या  लक्षात आले.त्यांनी सभामंडपातच चहा आणला.चहा घेताघेता अंजलीनी नेहमीप्रमाणे स्वरचित कविता म्हटली.शुभार्थी पद्मजा ताम्हणकर यांनी ‘रंगरेखा घेउनी मी’ हे गीत म्हटले.

विष्णुपंत जोशी यांनी ५००/१००० च्या नोटा भरण्यासाठी आलेल्या लोकांना सूचना देणाऱ्या गमतीशीर पुणेरी पाट्या वाचून दाखवल्या.करमरकर यांनी पुणेरी लोकांच्यावरील विनोद सांगितला.महेंद्र शेंडे यांनी नामदेवांची ‘देव जेवला हो’  ही भैरवी म्हटली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

पुण्याकडे प्रयाणाची वेळ झाली होती.नवी उमेद, नवे परिचय,आणि मधुर स्मृती बरोबर घेऊन बस निघाली.डॉक्टर गुजराथी यांनी दिलेले वेफर्स, वसू देसाई यांनी आणलेली नानकटाई, मोघे, दिवाणे यांनी आणलेली चॉकलेटस वाटली गेली.गप्पा, गाणी करत डेस्टिनेशन आले ही.

डॉक्टर आनंद जोशी आणि सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल’ मेंदूतील माणूस’ हे पुस्तक नुकतच वाचनात आले.त्यात त्यानी लिहिले आहे की,सामुहिक खेळ,सहली,सार्वजनिकरीत्या साजरे होणारे करमणुकीचे कार्यक्रम यातून मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार होते.यामुळे ताणतणाव कमी होतात माणूस जास्त मनमिळाऊ, समाजाभिमुख होतो,असे शास्त्रज्ञाना दिसून आले आहे.त्यांच्या या विधानाला पुष्टी देणारी अशी  आमची सहल झाली.

– शोभनाताई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क