गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०१७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.नवीन वर्षाची सुरुवात खेळ आणि तिळगुळ समारंभाने करायची ठरले होते.४५ सभासद हजर होते.संक्रांतीनिमित्त काळे कपडे घालायचे ठरले होते.अनेकजण काळे कपडे घालून आले होते.फक्त खेळ असल्याने लोक येतील का अशी शंका मनात होती.पण ती खोटी ठरली.डीबीएस सर्जरीनंतर पद्माकर आठल्ये प्रथमच येत होते.येण्यासाठी त्यांनी हट्ट धरल्याने त्यांची मुलगी त्यांना घेऊन आली होती.मीरा देशपांडेना हिप सर्जरीमुळे चालता येत नाही.पण त्या व्हीलचेअरवर आल्या होत्या.शीलlताई कुलकर्णी मुलीचा काळा ड्रेस घालून उत्साहाने आल्या होत्या.तुमची सूचना मानली असे हसत हसत सांगत होत्या.एकूणच वातावरणात चैतन्य होते.दीपा,अरुंधती,सविता हे आमचे खंदे कार्यकर्ते काही कारणाने येऊ शकले नव्हते.त्यांना आम्ही मिस करत होतो.
सुरुवातीला कमिन्स कॉलेजच्या देवयानी आणि गौरी कुलकर्णी,मृगाली भट,शर्वरी इनामदार या इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनिनी आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. त्यांनी कंप मोजणारे App तयार केले आहे.याद्वारे कंप पार्किन्सन्सचेच आहेत का हे समजू शकणार आहे.पीडी असणाऱ्यांचाही कंप केंव्हा कमी होतो, केंव्हा जास्त होतो हे मोजता येणार आहे.याची किंमत ५०० रुपये पर्यंत असेल आणि शुभार्थीना कोणताही त्रास न होता कंप मोजता येणार आहे.हे App करताना डॉक्टर मंदार जोग यांनी अशी App केले ली आहेत त्यामुळे त्यांचाही सल्ला घेतला. शुभार्थींच्या घरी जाऊन त्यांच्या ऑफ पिरिएडमध्ये त्या हे काम करणार आहेत.
यानंतर जानेवारी महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्या शुभंकर, शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.’हाउसी’ हा सर्वजण सहभागी होतील असा खेळ यानंतर खेळण्यात आला.आशा रेवणकर यांनी सुरुवातीला खेळाचे नियम सांगितले.सर्वाना यासाठीचे अंक असलेले कागद वाटण्यात आले. प्रथम पाच,चार कोपरे,पहिली ओळ,दुसरी ओळ, तिसरी ओळ,सर्व पूर्ण अशी बक्षिसे होती.आशा रेवणकर खुसखुशीत शैलीत उत्कंठा वाढवत अंक जाहीर करत होत्या.हेमा शिरोडकर यांचे प्रथम पाच पूर्ण झाल्याने बक्षीसाचा श्रीगणेशा केला. यानंतर नंदा चित्तरवार,जोत्स्ना आणि आर.एस.सुभेदार,श्री शिरोडकर,अनिल कुलकर्णी,शरच्चंद्र पटवर्धन,पदमाकर आठल्ये,अंजली महाजन,श्यामला शेंडे हे बक्षिसाचे मानकरी ठरले.प्रत्येकाचे अंक तपासले जात होते.अंक लक्षपूर्व ऐकणे, अंकावर खूण करणे यासाठी लागणाऱ्या एकाग्रतेमुळे शुभार्थी थोडावेळ का असेना पीडिला विसरले होते.
अंकावर खुणा करण्यासाठी पेन आणि बक्षिसे हे सविता ढमढेरे यांनी प्रायोजित केले होते.यानंतर सर्वाना तिळगुळ देण्यात आला.मंडळासाठी अरुंधती जोशी यांनी तिळगुळ प्रायोजित केला.याशिवाय शीला कुलकर्णी,हेमा शिरोडकर,मीरा देशपांडे यांनीही तिळगुळ आणला होता. मोरेश्वर काशीकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पेढे दिले.
जानेवारी महिन्याचा संचारचा अंक सर्वाना देण्यात आला.नवीन वर्षाची सुरुवात सर्वांच्या सहकार्याने रंगतदार झाली.