पार्किन्सन्स मित्रमंडळाची नव्या वर्षाची सुरुवात ८ जानेवारीला नर्मदा हाॅल येथे एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने झाली.डाॅक्टर अमित करकरे यांचे ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ या विषयावर व्याख्यान झाले.सुधीर मोघे यांच्याबरोबरचे अनुभव त्यांच्याच कविता व गीतांच्या सोबतीने त्यानी सादर केले.सभेस ५० सदस्य उपस्थित होते.
सुधीर मोघे यांच्या ‘नादब्रम्ह परमेश्वर’ या शोभना तीर्थळी यांनी गायलेल्या गीताने सभेची सुरुवात झाली.यानंतर शुभंकर,शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.कमीन्स काॅलेज आॅफ इंजिनीअरींगच्या इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोलच्या विद्यार्थिनी राधिका निबंधे, अक्षदा शिंदे, रश्मी अत्रे, आॅंचलसिंह गुलेरीया या त्यांच्या फायनल ईअर प्रोजेक्टची माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या.त्यांच्या प्रोजेक्टचा विषय डोळ्यांची हालचाल आणि स्किन इंपेडन्स वापरुन पार्किन्सन्सचे निदान असा आहे.त्यानी प्रकल्पाची माहिती देउन त्यामध्ये शुभार्थिनी सहभागी होउन मदत करावी अशी विनंती केली.नव्याने दाखल झालेले संख्याशास्त्रज्ञ असलेले शुभार्थी अविनाश धर्माधिकारी यांनी प्रकल्पाबद्दल आपले विचार सांगुन मदत करण्याचे आश्वासन दिले.
डॉक्टर अमित करकरे यांच्या व्याख्यानाची सर्वांनाच उत्कंठा लागली होती. त्यांची ओळख शोभना तीर्थळी यांनी करून दिली.चाहता ते त्यांचा मित्र,त्यांचे फेसबुक पेज,त्यांचा स्वगत संवाद ब्लॉग हाताळणारा सहकारी,मोघेंच्या भाषेत प्रवक्ता,या क्षेत्रातील त्यांचा सल्लागार असा सुधीर मोघे यांच्याबरोबरचा करकरे यांचा जवळून झालेला अनौपचारिक सहवास होता.एक डॉक्टर, व्यक्ती, प्रोफेशनल अशा विविध अंगांनी तो त्यांना समृद्ध करून गेला.हा प्रवास मोघे यांच्या स्वभावाचे पैलू,त्यांचेच गद्य लेखन,कविता, गाणी,त्यांच्याबरोबर घालवलेले भारावलेले क्षण यांचा आधार घेत त्यांनी उलगडून दाखवले.
मोघेना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी शाळकरी वयातच’ स्मरणयात्रा’ या चित्रपट संगीताची वाटचाल सांगणाऱ्या टीव्हीवर झालेल्या झपाटून टाकणाऱ्या कार्यक्रमातून झाली होती.या कार्यक्रमाचे वर्णन सर्वांनाच जुन्या काळात घेऊन गेले.या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा मोघे होते, हे त्यांच्या भेटीनंतर समजले ‘.नक्षत्राचे देणे’ या कार्यक्रमाची संहिता,संशोधन त्यांचे होते. त्याचाही त्यांनी गाजावाजा केला नाही. मी,माझे यात न अडकण्याच्या स्वभावाची ओळख तेथे झाली.प्रसिद्धीपासून लांब राहून आपले आपले काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. सुरेश भट यांच्या ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ हे मोघे यांनी चाल दिलेले संगीतकार म्हणून पहिले गाणे.या कवितेतले शब्द मोघे यांच्या आयुष्याला लागू होणारे आहेत. डॉक्टर करकरे यांनी हे सुरेल आवाजात गाऊन व्याख्यानाची रंगत वाढवली.
मोघे यांची स्वभाव वैशिष्ट्ये डॉक्टरांनी त्यांच्याच कवितातून उलगडवून दाखवली.त्यानी ललित गद्य,कादंबरी,कविता,चित्रपट गीते,संगीत,संहिता लेखन,कार्यक्रमाचे सादरीकरण,ब्लॉग अशा विविध गोष्टी समर्थपणे हाताळल्या पण ते कोठेच गुंतून राहिले नाहीत.वागणे, बोलणे,वेशभूषा या सर्वात साधेपणा होता.लहान,मोठे पुरस्कार असो की छोटा कार्यक्रम ते नेहमी त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिवून घेतलेला झब्बा घालायचे.कोणत्याही गोष्टीचे श्रेय स्वत:कडे न घेणारे मोघे इतरांचे श्रेय मात्र ज्याचे त्याला द्यायला विसरायचे नाहीत.’गोमू संगतीने’ हे त्यांचे गीत लोकप्रिय झाले.त्याची पहिली पकड घेणारी ओळ शांताबाई शेळके यांची आहे हे आवर्जून सांगायचे.त्यांच्याशी गप्पा मारताना ते स्वत:विषयी बोलायचे नाहीत पण जुन्या नव्या सर्व कवी,लेखकांच्या लेखनाचे कौतुक सांगत राहायचे.आज प्रसिद्ध असलेल्या अनेक कवींनी, मोघेंच्या त्यांना झालेल्या मदतीबद्दल आवर्जून सांगितले आहे.
कोणत्याही गोष्टीत ते अडकून राहिले नाहीत. तसेच कोणत्याही गोष्टीची खंत ही बाळगली नाही.काही वाया जात नाही.ज्याचे त्याचे श्रेय त्या त्या गीताला त्याच्या वेळेनुसार मिळते असे ते म्हणायचे.१८५७ पासूनच्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिलेले ‘स्वतंत्रते भगवती’ हे त्यांचे पुस्तक,ज्यावर ते कार्यक्रमही करीत त्याची दखल घेतली गेली नाही असे त्यांच्या आईला वाटायचे.मोघेंच्या मनात मात्र याबाबत नाराजी नव्हती.तो इतिहास लढलेल्या हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना जेथे समाज विसरला तर या पुस्तकाचे काय असे त्यानी याबाबत आईला समजावले.
त्यांच्यात एक निरागस मुल आणि टेक्नोसॅवी व्यक्ती होती.म्हणूनच Tablet भेट मिळाल्यावर आणि त्याची उपयुक्तता समजल्यावर, वर्डमध्ये शब्द मोजून सांगितले जातात हे समजल्यावर ते हरखून जातात.सध्या भली मोठी फी आकारून Mindfulness वर मोठमोठ्या कार्यशाळा घेतल्या जातात.Mindfulness म्हणजे भूतकाळाच्या आठवणी उगाळून दु:खी होऊ नका आणि भविष्याची चिंता करू नका तर या क्षणात जगा.या क्षणाचा समरसून अनुभव घ्या.मोघे असे जगले.कायम नवीन करत राहिले. आपल्या ‘फिरुनी नवी जन्मेन मी ‘ या गीतातून ही भावना व्यक्त झाली आहे. आपणच आपल्याला नव्याने शोधत राहायचे. हे गीत डॉक्टरांनी खास शुभंकर, शुभार्थींसाठी निवडल्याचे सांगितले. बरीच वर्षे पार्किन्सन्स मित्रमंडळाशी संबंधित असल्याने अनेक शुभंकर, शुभार्थी कळतनकळत असे नव्याने जगत असल्याचे पाहिल्याचे सांगितले.
मोघे आपल्या आयुष्यात असे अनेक गोष्टी नव्याने शिकत राहिले.अखेरच्या काळात ते चित्रकला शिकले.नवीन शिकत राहिल्यास मेंदूतील सर्व पेशी कार्यरत राहतात.मेंदू सतत सतर्क राहतो.एकाच विषयात तज्ज्ञत्व मिळाल्याने आलेला मीपणा कमी होतो.हे मोघे यांच्याकडून शिकता आले.हाच आशय सांगणाऱ्या’ तरीही वसंत फुलतो’ या कवितेने डॉक्टर करकरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
डॉक्टर करकरे यांना मोघे यांच्यावर असेच कार्यक्रम करायचे आहेत. पार्किन्सन्स मित्रमंडळाला त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाचे श्रोते होण्याचे भाग्य मिळाले.मोघे नव्याने समजले.
यानंतर मोघे यांचे मित्र शुभंकर उल्हास गोगटे यांना त्यांच्या आठवणी सांगण्याची विनंती करण्यात आली.उल्हास गोगटे यांच्या कवितेच्या पुस्तकाला मोघेनी प्रस्तावना लिहिली आहे.गोगटे यांच्या फार्महाउसची एक किल्ली मोघेना देऊन ठेवली होती. त्यांना वाटे तेंव्हा ते तेथे जाऊन राहत.लेखन करत,पेंटिंग करत.
उल्हास गोगटे यांनी त्यांची १९७१ वी कविता दिली. पीडीवरची ही कविता शोभना तीर्थळी यांनी वाचून दाखवली.गोगटे यांच्या कविता नेहमीच सकारात्मक असतात.
कार्यक्रमास निपुण धर्माधिकारी यांनी सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर वडिलांचा शुभंकर म्हणून हजेरी लावली.मंडळाच्या उपक्रमात रस दाखवून गरजेनुसार मदत करण्याचे आश्वासन दिले, ही मंडळाच्या दृष्टीने आनंदाची बाब.
शशिकांत देसाई आणि रमेश घुमटकर यांनी वाढदिवसानिमित्त पेढे दिले.अविनाश धर्माधिकारी यांनी चहा दिला.यानंतर चहापान,अत्तर आणि तिळगुळ देऊन समारंभाची समाप्ती झाली..संचारचा जानेवारीचा अंकही सर्वाना देण्यात आला. उपस्थित नसणाऱ्यांना पोस्टाने पाठविण्यात येईल.
खुप छान
धन्यवाद अमृता.