मागच्या एका गप्पांमध्ये मी म्हणाले होते की, कंप नसलेल्या पार्किन्सन्स शुभार्थींचे पार्किन्सन्सचे निदान करणे कठीण जाते. त्याविषयी आपण बोलु. पण त्यापूर्वी आपण पार्किन्सन्सचे निदान ह्याविषयीसुद्धा थोडे बोलणे गरजेचे आहे.
पार्किन्सन्सच्या निदानासाठी कोणतीही एक ठरावीक चाचणी किंवा तपासणी नाही. जसा रक्तदाब किंवा मधुमेह तपासता येतो, तशी पार्किन्सन्स तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे निदान होण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे, शिवाय ट्रायल आणि एरर ह्या प्रकारात मोडणारी आहे. काही वेळा काही रुग्णांची लक्षणे इतकी स्पष्ट दिसतात की, ताबडतोब त्यांना पार्कीन्सन्स असल्याचे निदान होऊ शकते. अश्विनी विरकरला २००१ मध्ये ३० व्या वर्षीच पीडीने गाठले त्यावेळी तिला एक वर्षाचा मुलगा होता. पहिल्यांदा न्युरॉलॉजिस्टकडे जाऊन आल्यानंतर तिला निदानाबाबत शंका वाटली आणि आणखी एक मत घ्यावे असा विचार करून ती दुसऱ्या न्युरॉलॉजिस्टकडे गेली. वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्टना दाखवले. त्यांच्यावर विश्वास नव्हता यापेक्षा तिला आशा होती की, निदान एक तरी न्युरॉलॉजिस्ट पार्किन्सन्स नसल्याचे सांगेल. पण तसे झाले नाही. कारण लक्षणे अगदी स्पष्ट दिसत होती.
माझ्या नवऱ्याच्या बाबतही आमच्या फॅमिली .डॉक्टरनाच लगेच निदान झाले आणि त्यांनी आम्हाला न्यूरॉलॉजिस्टकडे पाठविले.आमच्याकडे न्यूरॉलॉजिस्टच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय पीडी आहे हे सांगणारे दुसरे काहीच नाही.काही जण म्हणतात’ तुमचा MRI केला नाही का?’नाही केला म्हटले तर ‘असे कसे होईल आमचा तर केला होता.MRI शिवाय पीडी समजतो तर आमचा का केला?’ डॉक्टर उगाच लुबाडतात अशीही मल्लीनाथी केली जाते.असे आरोप करण्यापूर्वी यातले सत्य समजून घेतले पाहिजे.
MRI ही मेंदूची चाचणी, पीडीचे अस्तित्व नसणे सिद्ध करण्यासाठी असते असणे नाही.यातुन ट्युमर आहे का? ?स्ट्रोक आहे का? हे पाहिले जाते.ज्यांच्याबद्दल डॉक्टरना अशी शंका येते त्यांचीच ही तपासणी होते.आणि मेंदुत इतर काही समस्या नाही हे पाहिल्यावरच त्यांचे पीडीचे निदान केले जाते.
निदान करण्यात येणारी आणखी एक अडचण म्हणजे पार्किन्सन्स सदृश्य लक्षणे असणारे इतर आजारही आहेत अगदी वार्धक्य जरी म्हटले तरी थकवा,थोडीशी थरथर, मंद हालचाली,तोल जाणे,अशा काही बाबी दोन्हीत सारख्या असू शकतात.
कंप, मंद हालचाली,ताठरपणा, या प्राथमिक लक्षणानी काहींची पार्किन्सन्सची सुरुवात होते.त्यावेळी निदानही लवकर होते.पार्किन्सन्सची बद्धकोष्ठता,नैराश्य आणि अस्वस्थता,तोल जाणे,वेदना,डोळ्यांची उघडझाप करता न येणे,लाळ गळणे हस्ताक्षरात बदल,डोक्यात कोंडा होणे,अशी अनेक दुय्यम लक्षणेही आहेत आणि काहींची सुरुवात या दुय्यम लक्षणापासून होते.इतर प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यावर पार्किन्सन्स आहे हे लक्षात येते.( लक्षणांची भली मोठी यादी पाहून घाबरून जाऊ नये.प्रत्येकात ही सर्व लक्षणे नसतात.)आता ही सर्व दुय्यम लक्षणे पाहताच लक्षात येईल ही सर्वसामान्य माणसातही ही असू शकतात.इथे न्युरॉलॉजिस्टचे ज्ञान आणि अनुभव यांची कसोटी लागते.
पुढच्या गप्पात अशा दुय्यम लक्षणापासून आजाराची सुरुवात झालेली उदाहरणे पाहू.
मला वाचनातून,तज्ज्ञांच्या व्याख्यानातून जे समजले त्यावर आधारित ही माहिती आहे.माझ्या फेसबुक मित्र यादीत अनेक डॉक्टर आहेत कृपया चूक आढळल्यास निदर्शनास आणावी.
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson’s Mitramandal, Pune हा युट्युब channel पहा.