दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त ९ एप्रिल रोजी मेळावा आयोजित केला होता.यावेळी केसरीवाड्याऐवजी एस.एम.जोशी सभागृहात कार्यक्रम होता.तेथे थोड्या पायऱ्या असल्याने शुभार्थींना त्रासाचे होईल का असे वाटत होते.पण भर उन्हात २००/२५० जण उपस्थित होते. हॉलबद्दल कोणाचीच तक्रार नव्हती.ताक देऊन आणि अत्तर लावून सर्वांचे स्वागत करण्यात येत होते.बाहेर व्हरांड्यात शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडले होते.भरपूर जागा असल्याने प्रत्येक कलाकृती दिसेल अशी ठेवली होती.४ ते ४.३० हा वेळ कलाकृती पाहण्यासाठी ठेवला होता.प्रमुख पाहुणे डॉक्टर लुकतुके यांच्यापासून सर्वांनी कलाकृती पाहून भरभरून कौतुक केले.पद्मजा ताम्हनकर,विजय चिद्दरवार,डॉक्टर प्रकाश जावडेकर,विजय देवधर,भूषणा भिसे,गोपाळ तीर्थळी,केशव महाजन,उमेश सलगर,करणी,शशिकांत देसाई, प्रभाकर जावडेकर,विजय ममदापुरकर या शुभार्थींनी आपल्या कलाकृती ठेवल्या होत्या.
९४ वर्षांच्या नारायण कलबाग यांच्या ईशस्तवनाने सभेला सुरुवात झाली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्णता, सुरेलपणा थक्क करणारा होता.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा होनप यांनी केले.
सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता. नृत्यामध्ये विलास जोशी,मंगला तिकोने,विजय देशपांडे,कर्नल प्रमोद चंद्रात्रेय,धीमंत देसाई,श्रीराम भिडे,पारिजात आपटे,मंजिरी आपटे,नितीन व सुजाता जयवंत, ,दिलीप कुलकर्णी, या शुभार्थी व शुभंकरांनी सहभाग घेतला.सुरुवातीलाच हृषीकेशनी आम्ही सादरीकरण करणार नाही तर क्लास मध्ये रोज काय घेतो हे दाखवणार असल्याचे सांगितले.सुरवातीच्या हालचालीत प्रेक्षकांनाही सहभागी करून घेतले.यानंतर’ शोला जो भडके’ आणि ‘गौराई माझी लाडाची लाडाची ग’या थिरकत्या चालीच्या गाण्यांवर नृत्य सादर केले.सर्व सभागृह भारावून गेले होते. प्रतिसाद म्हणून टाळ्यांचा कडकडाट आणि standing ovation मिळाले.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या नऊ वर्षांच्या परिश्रमाचे हे फलित होते.यानंतर हृषीकेशने आपले मनोगत व्यक्त केले.प्रेक्षकांनी आवर्जून हृषीकेशचा फोन नंबर मागून घेतला.
स्टेजवर टेबल खुर्च्या यांची मांडामांड होईपर्यंत मंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर उल्हास लुकतुके यांच श्यामला शेंडे आणि रामचंद्र करमरकर यांच्यासह मंचावर आगमन झाले. शरच्चंद्र पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.दीपा होनप यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर उल्हास लुकतुके यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.याचवेळी वेबसाईटवरही अतुल ठाकूर यांनी स्मरणिका प्रकाशित केली.
डॉक्टर उल्हास लुकतुके यांचे व्याख्यान ऐकण्यास सर्वच उत्सुक होते.
स्वमदत गटात माणूस आला की आपली पूर्वीची बिरुदे बाहेर राहतात आणि शुभार्थी गटाशी जुळवून घेतात.आज ते जाणवले असे सांगत त्यांनी व्याख्यानास सुरुवात केली.मी औपचारिक भाषण न करता आपल्याशी येथे जे जे पाहिले त्याचा आधार घेऊन संवाद साधणार आहे असेही त्यांनी सांगितले.ईशस्तवन,नृत्य, कलाकृती या सर्वांचा आधार घेत त्यामागचे विज्ञान समजावून सांगितले.नृत्य करणाऱ्या शुभार्थींची नृत्य करताना पार्किन्सन्सची लक्षणे थांबलेली सर्वांनी पाहिली..तादात्म्य,सापडलेली लय यामुळे ती थांबली .जेंव्हा लय बिघडते तेंव्हा रोग होतो.कलाकृतीतही क्विलिंग हे अत्यंत नाजूक काम Movement Disorder असणारी व्यक्ती करु शकते कारण ते काम करताना त्यांचे मन रमते,छान वाटते.या छान वाटण्यात लय असते.मी माझा स्वामी हा भाव असतो.अशी लय सापडणे महत्वाचे.ती मनाची असते तशी शारीरिक वर्तनाची असते.ही सापडवायची कशी?
होकारार्थी मानसशास्त्रात ती सापडतील. होकारार्थी मानसशास्त्र हे जगण्याचे शास्त्र आहे. तसेच त्यात सूत्रे असतात, ती लक्षात ठेवायची आणि ती जगण्याचा प्रयत्न करायचा.Four A हे सूत्र यासाठी डॉक्टरांनी सांगितले
.१)Adapt – जुळवून घेणे.यामुळे साधनसामग्रीची शक्ती वाढते,नकार असेल तर जुळवून घेणे कठीण होते.
२) Adopt – दत्तक घेणे. आजाराशी भांडू नये.भोवतालच्या परिस्थितीवर आपला ताबा नसतो, आपल्यावर असू शकतो.
३) Alter – मुळ डिझाईन कायम ठेवून् दृष्य सोयी बदललणे.आपल्या अपेक्षा,भावना ,वर्तन,सकारात्मक रीतीने अल्टर करणे.
४) Accept – नाईलाजाने नाही तर स्वेच्छेने स्वीकार करणे.आपल्याला यापेक्षा बदलणे शक्य नाही या पातळीवर आणणे.आणि हे म्हणताना पूर्ण प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारणे
स्वमदत गटात आपल्याप्रमाणे इतर असल्याने स्वीकाराची प्रक्रिया सोपी होते.
यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.
वसुमती देसाई यांनी काही निवेदने सादर केली, आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.
जाताना सर्वाना पेढा आणि स्मरणिका देण्यात आल्या.औपचारिकरित्या कार्यक्रम संपला तरी अनेकजण अजून कलाकृती पाहत होते.थांबून एकमेकांच्या ओळखी करून घेत होते.फोटो काढत होते.दिल्लीहून पुण्यात नर्सिंगहोम मध्ये आलेल्या तारा माहुरकर यांनी सर्वाना देण्यासाठी द्राक्षे आणली होती, तीही वाटली गेली.
या कार्यक्रमाने अनेक शुभार्थींचे लय सापडण्याचे काम सोपे होईल असे वाटते.
( डॉक्टर उल्हास लुकतुके यांचे भाषण आणि संपूर्ण कार्यक्रम आपल्याला युट्युबवर पाहायला मिळेल.)