न्युरोफिजिओथेरपिस्ट पूनम गांधी यांनी ताई ची ( Tai Chi ) वर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.सभेस ४०/४५ सदस्य उपस्थित होते.पार्किन्सन्सच्या ‘ फ्रीजिंगच्या समस्येवर फिजिओथेरपी उपचार ‘असा प्रयोग त्या करत आहेत. त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
सुरुवातीला हरिप्रसाद आणि उमा दामले यांनी त्यांच्या Travel – Mate या नव्याने सुरु केलेल्या सेवेविषयी माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांना सर्व सुविधा असतात.पण एकटे कुठे बाहेर जाणे शक्य नसते, सोबतीची गरज असते. अशी सोबत या सेवेद्वारे दिली जाणार आहे.या दोघांचे निवेदन चालू असतानाच चहा देण्यात आला.यावेळी अरुंधती जोशी यांनी चहा दिला.सध्या चहा देण्यासाठी वेटिंग लिस्ट असते ही आनंदाची बाब आहे.
यानंतर पूनम गांधी यांची शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.त्यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला Tai Chi या व्यायाम प्रकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली.हजारो वर्षांपासून चीनी संस्कृतीमध्ये जीवन पद्धती म्हणून याकडे पाहिले आहे.सुरुवातीला मार्शल आर्टसाठी याचा वापर केला जायचा.श्वासोच्छवास आणि मन यांच्याशी समतोल राखत केला जाणारा हा व्यायाम प्रकार आहे.शरीर आणि मन यांचे संतुलन साधण्यासाठी हा व्यायाम केला जातो.
तावो तत्वज्ञानानुसार मानवी शरीराच्या अमर्यादित क्षमता आहेत.त्यांचा वापर करायचा तर उर्जेची गरज आहे.ती उर्जा म्हणजे ‘ Chi.’ मनाची एकाग्रता आणि श्वासोच्छवास यांचा समन्वय साधून केलेल्या विशिष्ट हालचालीतून ती मिळवता येते.चायनीज उपचार पद्धतीनुसार योग्य श्वासोच्छवासामुळे तारुण्याला टिकवता येते आणि आजारांना रोखता येते.त्याला व्यायामाची जोड दिल्यास शरीराला उपयुक्त आयर्न,कॉपर,झिंक,मॅग्नेशियम मिळते. शरीरात निर्माण होणारी दुषित द्रव्ये,टाकाऊ पदार्थ बाहेर फेकले जातात.
या विशिष्ठ हालचालीमुळे उर्जा शरीरात आठ मार्गांनी ( channel ) पसरवण्यास मार्गदर्शन होते.येथे हे फक्त विशिष्ठ पद्धतीने केलेल्या हालचालींनी साध्य होणार नाही तर श्वासोच्छवासाबरोबर एकाग्रता साधण्याची मनाची शक्ती ही महत्वाची आहे.म्हणून याला moving meditation असेही म्हटले जाते.
यानंतर पूनम गांधी यांनी शुभंकर शुभार्थी यांच्याकडून ताई चीचे विविध प्रकार करून घेतले.हे प्रकार महिनोनमहीने योग्य प्रकारे केल्यास त्याचा परिणाम दिसतो असे त्यांनी सांगितले.पार्किन्सन्स शुभार्थीचा विचार करता तोल जाणे, पडण्यापासून बचाव, मनाचा समतोल, रिलॅक्सेशन यासाठी याचा उपयोग होतो.या हालचाली आनंददायी असल्याने शुभार्थी मनापासून करू शकतात.एकत्रित केल्यास सामुहीकतेतून वेगळाच आनंद मिळू शकतो.
मेयो क्लिनिकने केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार ताई चीमुळे स्नायूंची ताकद वाढणे,लवचिकता,तोल सांभाळणे, वृद्धांमध्ये पडण्यावर नियंत्रण, झोप चांगली लागणे, अस्वस्थता, नैराश्य कमी होणे, वेदना कमी होणे,रक्तदाब कमी होणे,हृदयाची शक्ती वाढणे,स्त्रियांच्या मेनोपॉजनंतर हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते ती कमी होणे, ताकद, सहनशक्ती, चपळता वाढणे असे अनेक फायदे होऊ शकतात.
यानंतर पूनम गांधी यांनी पीडी पेशंटच्या फ्रीजिंग या समस्येवर माहिती दिली.त्यांनी यासाठी काही पीडी पेशंटवर पायलट स्टडी केला आहे आणि फिजिओथेरपीचा यासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार केला आहे.या समस्येवर औषध नसल्याने इतर उपाय योजावे लागतात.फ्रीझिंग म्हणजे पेशंटचा एकदम पुतळा होतो. हालचाल करता येत नाही. हे ऑन पिरिएडमध्ये तसेच ऑफ पिरिएडमध्ये ही होऊ शकते.यातून सुटका करण्यासाठी हालचालीचे निरीक्षण करून Relaxation, Concentration, External cuing हे उपाय करता येतात.
External Cuing मध्ये दृश्य स्वरुपाचे,आवाजाच्या आधारे आणि Vibration च्या आधारे असे प्रकार येतात. यातील कोणता प्रकार कुणाला आणि कोणत्या स्थळी उपयोगी पडेल हे निरीक्षणानेच ठरवता येते.तसेच एकावेळी २/३ Cue च्या एकत्रीकरणातूनही उपयोग होऊ शकतो.
शुभार्थीना आशेचा किरण अशी एक गोष्ट गांधी यांनी सांगितली ती म्हणजे पीडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत ट्रेडमिलवर high density व्यायाम केल्यावर हालचालीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण येऊ शकते असे संशोधन सेकंड फेज मध्ये आहे.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना गांधी यांनी उत्तरे दिली.पूनम गांधी या पार्किन्सन्सच्या whats app ग्रुपवर असल्याने कोणाला काही शंका असल्यास तेथे विचारता येतील.फ्रीजिंगची समस्या असणारे आणि ज्यांना ताई ची शिकायचे आहे ते त्यांच्याशी संपर्क करू शकतील.