मला जर कोणी विचारले की , “तू आनंदी आहेस का ” ? तर मी क्षणाचाही विलंब न लावता ” हो “
असेच उत्तर देईन.कारण खरचं मी आनंदी आहे पण याचा अर्थ मला कोणत्याही प्रकारचे दु:ख नाही असे नाही .पण मला माझ्या दु:खाचा बाजार मांडून बसायला आवडत नाही. मला नेहमी आनंदी रहायला आवडतं . जीवनात सुख हे चाॅकलेट प्रमाणे मस्त आनंदाने चघळायच असतं आणि दु:ख हे औषधांच्या गोळ्यांप्रमाणे चटकन गिळायच असतं.
आपला आनंद खरं आपल्याच हाती असतो ,पण आपण मात्र आनंद इकडे तिकडे शोधत असतो . त्यासाठी विशिष्ट वेळेची वाट पहात असतो आनंद मिळण्यासाठी विशिष्ठ व्यक्तीवर अवलंबून असतो ,आनंद शोधण्याच्या गडबडीत आनंद आपल्यातच विसावलेला यांचा आपल्याला साफ विसर पडतो.
खरं सांगू आनंद म्हणजे काय ?हे समजण्यातच अनेकांचा गोंधळ होतो,माझ्या मते या क्षणी आपल्याला जे प्राप्त आहे,जे आपल्याकडे उपलब्ध आहे तेच सर्वोत्तम आहे असे मानणे आणि त्याचा मनोसक्त आस्वाद घेणे व तो क्षण मनापासून साजरा करणे म्हणजे “आनंद ” होय.
सुख हे जसं मानण्यावर अवलंबून असतं तसाच आनंद ही मानण्यावर अवलंबून असतो एखादी स्त्री राजमहालात उंची पैठणी वस्त्र नेसून सुध्दा दुरमुखलेल्या चेहऱ्यानी महालात वावरते,तर एखादी स्त्री फाटक्या साडीत झोपडी मध्ये राहून आनंदी राहते.
जीवन जगताना दैनंदिन स्थिती विपरीत असली तरी आनंदी जीवन सहज जगता आले पाहिजे,या मताचा आदर केला की,आपले मन आपोआप आनंद शोधण्याकडे धाव घेत रहाते.आऩंदाची कल्पना ज्याची त्याची वेगळी असते परंतू विशिष्ठ प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी आताचे मिळणारे क्षण का वाया घालवायचे ?उद्याची चिंता करता करता आजचे आदंनाचे क्षण का वाया घालवायचे ?या गोष्टी चा प्रामुख्याने विचार केला तर आनंदी राहण्याची वृत्ती निश्चितच वाढते.
आनंदी वृत्ती वाढण्यासाठी स्वत:ची तूलना इतरांशी करीत बसण्यापेक्षा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला. पाहिजे जगणं रसरसीत ठेवण्यासाठी जे आपल्याकडे नाही त्याविषयी खंत करीत बसण्यापेक्षा आहे जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानले की आनंदी वृत्ती वाढू लागते प्रत्येकाला देवाने जे रंग रुप गुण दिलेले आहेत त्याच भांडवलावर आनंदी जीवन जगले पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर अक्कल,हुशारी,समज,सगळंच वाढत जात आणि दुसऱ्याशी बरोबरी होऊ लागते अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की,यश मिळाले नाही की, नैराश्य येते व आनंद निघून जातो .
घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात.तेव्हा शुभार्थी /शुभंकरांनी आजचे क्षण चिंतेत घालवायचे नाहीत,प्रत्येक गोष्टीत भरभरून आनंद शोधायचा आनंदा पासून बिलकूल वंचित रहायचे नाही. भूतकाळात घडून गेलेल्या घटना उगाळीत बसायच्या नाहीत.भविष्यकाळाची अनावश्यक चिंता करीत बसायची नाही.भविष्याच्या चिंता आणि भूतकाळातील कडू आठवणी वर्तमानकाळातील आनंदाला बांध घालत असतात.माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे म्हणून आनंदाचे क्षण जेवढे वेचता येतील तेवढे वेचत राहिले पाहिजे.
साधारण ६० च्या आसपास पार्किन्सन्स ने शरीरात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच माझे आता काही खरे नाही,माझे आता काही जगच नाही ही भावना सतावत असते शारीरिक कुरबुरींना हळूहळू सुरुवात झालेली असते माझ्याकडे कुणी लक्षच देत नाही,सगळे आपापल्या कामात व्यग्र आहेत ही भावना मनी येऊ लागते पण या सर्वांवर शुभार्थीनी मात करून आपल्याला स्वत:च असं व्यक्तीमत्व आहे व त्याचा विकास आपला आपल्यालाच करायचा आहे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे.प्रत्येक शुभार्थी, शुभंकर यांचा स्वतंत्र असा स्वभाव असतो ,आवडी निवडी विचार स्वतंत्र असतात त्यानुसार जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे.शुभार्थी, शुभंकर यांनी वेळ छान जाण्यासाठी विविध छंद जोपासले पाहिजेत मग ते कोणतेही असोत घरातल्या घरात वाद्य वाजवणे,वाद्य शिकणे,बागकाम करणे ,संगीत ऐकणे शिकणे,वाचन करणे लेखन करणे , नृत्य करणे घरकाम करणे, पाककृती करणे.
हे करीत असताना आपल्याला खूप वेगळा आनंद मिळतो व त्या योगे आपले मानसिक आरोग्य उत्तम राखले जाते.या शिवाय भरतकाम विणकाम,चित्रकला पेंटी़ग जे आवडेल त्याचे थोडे साहित्य आणून ते करून बघून शुभार्थी ला सर्जनशीलतेचा आनंद मिळतो.
व्यायाम केल्याने ही शरीरा बरोबर मनाला खूप आनंद मिळतो ध्यानधारणे मुळे मन शांत होण्यास मदत होते योगा केल्याने शरीर व मन दोन्ही सकारात्मक वागू शकते व शुभार्थी आनंदी राहू शकतो.
चित्र काढणे, हिंदी मराठी गाणी गाणे वाद्य वाजवणे हे सारे मनासारखे शुभार्थी ला करायल्या मिळाले की,किती आनंद मिळतो म्हणून सांगू ! बाहेर जाणे जमत नसेल प्रत्यक्ष गाठीभेटी होत नसतील तर शुभार्थी नी स्मार्टफोनवर छान गप्पा मारत भेटीचा आनंद मिळवावा गप्पागोष्टी करुन शुभार्थी ला खूप समू मिळते ते अनमोल असते ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांनी डायरी लिहावी यातून ही शुभार्थी ना आनंद मिळतो.मनात काही विचार आले तर शुभार्थी नी ते लिहून काढावेत कदाचित ते साहित्य दर्जा असलेले लेखन असेल अगर नसेल पण मनातले लिहून काढले की मनातील विचारांचा निचरा होण्यास मदत होते मनाचा तळ ढवळून निघतो व एक वेगळा आनंद मिळतो.
स्वत:साठी आनंद निर्माण करायला शुभार्थी ला स्वतंत्र वेळ काढावा लागत नाही तो आपसूकच मिळू लागतो. आनंद शोधायला दूरवर जावे लागत नाही छोट्या गोष्टी त तो मिळू शकतो विविध छंदांच्या माध्यमातून काही तरी नवीन केल्याचा,शिकल्याचा आनंद अवर्णनीय असतो.आनंदी रहायला वयाचे बंधन नसते वयाच्या कोणत्याही टप्प्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा आनंद लुटू शकता मग ते स्वादिष्ट खाणे असो, चित्रपट नाटक पहाणे असो, मनमुराद पावसात चिंब भिजणे असो,यात्रा,सहलीस जाणे असो शुभार्थी यातून मनोसोक्त आनंद उपभोगू शकतात.
आजचा आनंद आजच उपभोगा तो उद्यावर टाकू नका आयुष्यातील अनमोल क्षण हातातल्या वाळूसारखे चटकन निसटून जायला नको असतील तर शुभार्थी नी प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला पाहिजे.
Chhaan lihile aahes Anjali.
अंजली लेख छान. तुझ्या क्रुतीतूनही आनंदी कसे राहायचे दाखवून दिले आहेस.