१९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धावर, युद्धाच्या पार्श्वभूनीवर नव्हे तर प्रत्यय युद्धावर माझी एक कादम्बरी आहे, बोमदिला.
मुळात मी ही कादम्बरी हिन्दीत लिहिली. मग तिचे मराठी रूपान्तर आले, ते मीच केले.
मराठी कादम्बरी योगायोगाने धारवाडच्या रश्मीताईंच्या वाचनांत आली, त्यांना बोनदिला खूप आवडली नि त्यांनी आपल्या कन्नडमध्ये तिचे भाषान्तर करून प्रकाशितही करवले.
असममधल्या उदालगुडीमध्ये राहणाऱ्या पुष्पधर शर्मा नावाच्या प्राध्यापक महोदयांच्या वाचनांत माझी हिन्दीतली बोमदिला कादम्बरी आली. त्यांना ती खूप आवडली नि बोमदिलाचे असमीया भाषेत भाषान्तर केले नि यथावकाश ते डॉ० इन्दिरा गोस्वामी ह्यांचा हस्ते प्रकाशित करवले.
एकदा डेक्कन कॉलेजचे प्रा० दत्तभूषण पोलकम ह्यांच्या घरी गप्पा मारताना बोमदिलाचा विषय निघाला. सरांना संस्कृत प्रतिष्ठानासाठी काही लेखन करायचे होते. योगायोगाने माझ्याजवळ हिन्दीतली आवृत्ति होती. मी म्हणालो की तुम्ही वाचून पहा, बरी वाटली तर भाषान्तराला घ्या. पन्धरा दिवसांनी मी सरांना कशी वाटली हे विचारण्यासाठी फोन केला तर सर म्हणाले की बोमदिलाचे संस्कृतमध्ये अर्धे भाषान्तर झाले! पुढच्या महिन्याभरात सरांनी बोमदिलाचे संस्कृत भाषान्तर पूर्ण केले. पुढे लौकरच ते दिल्लीच्या संस्कृतभारतीने ते प्रकाशित केले. ह्या संस्कृत आवृत्तीला वाचकांचा प्रचण्ड प्रतिसाद लाभला.
मुम्बईच्या प्राध्यापिका प्रतिभा दवे ह्यांच्या नजरेला हिन्दीतली बोमदिला कादम्बरी पडली तेव्हा वेगळ्या विषयामुळे त्यांनी ती वाचली नि ती गुजरातीत आणण्याचे ठरवले नि ते काम पूर्णही केले.
गुवाहाटीचा माझा मित्र अलीन्द्र ब्रह्म CIIL मध्ये बोडो भाषा शिकवतो. बोमदिलाचे असमिया पाहून त्यालाही उत्साह वाटला, त्याने एका रात्रीत असमियातली बोमदिला वाचली नि तिचे बोडोत भाषान्तर करण्याची परवानगी मागितली. मी त्याला मूळ हिन्दीतून भाषान्तर करण्याची अट घालून परवानगी दिली.
अलीन्द्रने काम सुरू केले. पुढे दुर्दैवाने अलीन्द्रला अर्धांगाचा भयंकर झटका आला. तो बिचारा अगदीच अगतिक झाला. काम बन्द पडले.
पण सुदैवाने अलीन्द्रचे एक स्नेही दिनेश सिं ब्रह्म ह्यांनी बोमदिलाचे बोडो भाषान्तर पूर्ण केले नि ते मागच्या आठवड्यात गुवाहाटीत प्रकाशित झाले आहे. माझ्या हातात ती आजच पडली आहे.
डॉ० अविनाश बिनीवाले
३१/५/२०२२.