गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने डॉक्टर मानसी देशमुख यांचे ‘ स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.त्या क्लिनिकल सायकोलॉजीस्ट आहेत आणि ‘Mind-trail Intellectual services,Psychological services and research center’ च्या संचालक आहेत.
सभेस ६० जण उपस्थित होते. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात जन्म असलेल्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करून सभेस सुरुवात झाली.
व्याख्यानात सुरुवातीला डॉक्टर मानसी देशमुख यांनी पार्किन्सन्स आजार,त्याची लक्षणे,मेंदूच्या विविध भागाची कार्ये. याबाबत उल्लेख केला.हे व्याख्यान नाहीतर कार्यशाळा आहे असे सांगत कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंट आणि त्यात सुधारणा करण्यासाठी घरच्या घरी शुभंकरालाही करता येतील अशा करावयाच्या विविध कृती,खेळ,छोटे प्रयोग यावर भर दिला.कॉगनीटीव्ह हा शब्द वापरतो तेंव्हा त्यात विचार करणे,स्मरणशक्ती,संघटन,लक्ष केंद्रित करणे, अशा विविध बाबी येतात.पीडी पेशंटमध्ये कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंटमुळे सुरुवातीला सौम्य स्वरूपाचे बदल होतात.कामाची अमलबजावणी,लक्षकेंद्रित करणे इत्यादीत अडचणी निर्माण होतात,विचार प्रक्रिया मंदावते त्यामुळे अपेक्षित काम पूर्णत्वास नेण्यास विलंब लागतो.
योग्य शब्द सापडण्यास त्रास होतो.हे सांगताना त्यांनी अल्झायमर आणि पीडीमुळे येणाऱ्या समस्या यातील फरक स्पष्ट केला.पीडीमध्ये डीक्शनरी असते शब्दही उपलब्ध असतात परंतु हालचाली मंदावल्याने डीक्शनरीपर्यंत पोचायला वेळ लागतो.विचार प्रक्रिया मंदावल्याने शब्द सापडायला वेळ लागतो. अल्झायमरच्या बाबतीत मात्र डीक्शनरीची पानेच कोरी असतात.त्यामुळे सुधारण्यासाठी वाव नसतो.पीडीमध्ये मात्र तो असतो.ब्रेनजीमने दैनंदिन जीवनातील अडचणींची तीव्रता कमी करू शकतो.१९८७ मध्ये प्रथम ब्रेनजीम ही संज्ञा वापरली गेली. स्मरणशक्ती म्हणजे पूर्वीचे अनुभव आणि शिकलेल्या गोष्टींचा खूप मोठा साठा असतो.स्मरणश्क्तीचेही लाँग टर्म मेमरी,शॉर्टटर्म मेमरी,वर्किंग मेमरी असे प्रकार असतात.यासाठी आणि विविध कॉगनीटीव्ह कौशल्यांसाठी डॉक्टर मानसी यांनी काही कृती( activity ) करवून घेतल्या.
यात Visual scanning,लक्षपूर्वक ऐकणे,शब्द आठवणे,हालचाली आणि विचारप्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोडींग,Acrochart इत्यादींचा समावेश होता.यानुसार शुभंकरानी रोज शुभार्थीकडून करवून घेणे अपेक्षित आहे.तीच कृती पुन्हा पुन्हा केल्याने कौशल्यात सुधारणा होते.सातत्य महत्वाचे.या कृती करण्यापूर्वी शुभार्थीची ही कौशल्ये कोणत्या पातळीवर आहेत हे तपासता येतील अशी ३९ प्रश्नांची प्रश्नावली त्यांनी दिली.ही प्रश्नावली म्हणजे मान्यतापत्र ‘ Quality of Life scale and memory scale.’ आहे.काही दिवस सातत्याने activity केल्यावर पुन्हा ही प्रश्नावली भरून काही फरक झाला आहे का हे पाहायचे.इंग्लंड,अमेरिकेत तज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट हे करतात. पण आपल्याकडे याला अजून इतके महत्व दिले जात नाही.परंतु या स्केलनुसार घरी करवून घेणे शक्य आहे.शुभंकराने शुभार्थीची मानसिकता समजून घेणे यासाठी महत्वाचे आहे.थेरपी आणि ब्रेनजीम यातील फरकही त्यांनी सांगितला.उदासीनता,भयगंड,चिंता ग्रस्तता इ.साठी थेरपीची गरज असते.या सर्वात मला बदलायचं आहे हा दृष्टीकोनही महत्वाचा असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
मित्रमंडळ हा आता एक परिवार झाला आहे.मित्रमंडळ सदस्यांना आपल्या आनंदात सर्वाना सहभागी करून घ्यावेसे वाटते.वसू देसाई यांचा नातू ९५ % गुण मिळऊन दहावी उतीर्ण झाल्याने त्यांनी सर्वांसाठी पेढे आणले,सविता ढमढेरे यांना नात झाल्याने त्यांनी काजूकतली वाटली तर आशा रेवणकर यांनी वाढदिवसाबद्दल चहा बिस्कीटे दिली
– डॉ. शोभना तीर्थळी