पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. यावेळी ‘पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव’ या विषयावार शेअरिंग झाले.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.
डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.पहिली १५ मिनिटे त्यांनी त्याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.प्रसिद्ध नृत्यांगना सुचित्रा दाते यांच्या कडे त्यांची नृत्यसाधनाही चालू आहे.सुचित्र दाते या गेली काही वर्षे पार्किन्सन्स पेशंट आणि जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नृत्योपचार करत आहेत.देविका यांना फिजिओथेरपीचा त्यांचा अनुभव आणि नृत्य हे बऱ्याचवेळा सारखे आणि एकमेकास पूरक आहेत असे वाटले.यासाठी त्यांनी पदव्युत्तर प्रकल्पासाठी हा विषय घेतला. प्रात्यक्षिकासाठी त्यांना शीतल टेकावडे आणि झिनल संगवी यांनी मदत केली.भरतनाट्यममधील आडव,विविध मुद्रा,नवरस त्यांनी दाखवले.शुभंकर शुभार्थीनीही यात उत्साहाने सहभाग घेतला.फिजिओथेरपी करताना कंटाळवाणे वाटू शकते नृत्याची जोड दिल्याने ते मनोरंजक होते.पाय आपटताना अॅक्युप्रेशरचे सर्व पॉईंट दाबले जातात,नृत्याच्या विविध बाबी करताना हालचालीतील समन्वय, चालण्यात सुधारणा,तोल सावरणे या गोष्टी साध्य होतात,आत्मविश्वास वाढतो.नवरसाच्या अभिनयामुळे चेहऱ्याला फेशिअल होते. भावविहीन चेहरा हे पिडीचे लक्षण, त्यावर मात करता येते.
या प्रयोगात सहभागी असलेले मोरेश्वर काशीकर यांनी आत्तापर्यंत आठ सेशन केलेली आहेत. त्यांनी पाय आपटण्यामुळे फ्रीजिंगची समस्या कमी झाल्याचे सांगितले.
यानंतर रामचंद्र करमरकर यांनी सहलीबद्दल माहिती सांगितली.
शरच्चंद्र पटवर्धन यांनी पूरक उपचार म्हणजे अॅलोपथीचे उपचार चालू ठेऊन केले जाणारे इतर उपचार अशी पूरक उपचारपद्धतीची व्याख्या करत चर्चेला सुरुवात केली.
मोरेश्वर काशीकर यांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे पूरक उपचार वापरत असल्याचे सांगितले.यात आयुर्वेद,होमिओपॅथी,नृत्योपचार, योगासने,प्राणायाम,सर्वांग सुंदर व्यायाम,संगीत इत्यादीचा समावेश असल्याचे सांगितले.ते शुभार्थीनी मदत मागितल्यास घरी जाऊन योग शिकवतात.यात त्यांना आनंद मिळत असल्याचेही सांगितले.विजय ममदापुरकर यांनी खेळाडू म्हणून स्वत:चे अनुभव सांगितले.श्री काशीकर यांच्या स्मरणिकेतील योगोपचार उपचारावरील लेखाचा फायदा झाल्याचे सांगितले.स्वमदत गटाचा आत्मविश्वास वाढण्यास उपयोग होतो असे ते म्हणाले. विशाखा मेंडजोगे यांनी सुज्योग थेरपीबद्दल माहिती सांगितली.श्री.राजीव ढमढेरे यांच्यासाठी त्या ही थेरपी वापरतात. त्यांना याचा उपयोग होतो.उमेश सलगर यांनी आयुर्वेदिक औषध आणि महानारायण तेलाने मसाज याचा उपयोग झाला अशी माहिती दिली
नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरे करण्यात आले. शोभना तीर्थळी यांनी,गोपाल तीर्थळी यांच्या वाढदिवसानिमित्त खांडवीच्या वड्या- हा पारंपारिक पदार्थ आणला होता.तर हेमा शिरोडकर यांनी दिवाळीनिमित्त स्वत: केलेली चकली आणली होती.विनिता कुलकर्णी यांनी चहा दिला.
— शोभनाताई