९ एप्रिल २०२३ – जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तीन वर्षानंतर एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले होते.प्रवेश करताना ताक देऊन स्वागत करण्यात आले. शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन बाहेर मांडले होते ते पाहून सर्व जण आत येत होते. सुप्रसिद्ध क्रीडावैद्यक तज्ज्ञ हिमांशू वझे हे प्रमुख पाहुणे होते.गौरी इनामदार यांनी सुरुवातीला निमंत्रितांचे व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.अंजली भिडे यांनी मधुर आवाजात इशस्तवन म्हटले.आशा रेवणकर यांनी मंडळाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.संस्थेचे संस्थापकसदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.अतुल ठाकूर यांनी वेबसाईट आणि स्वमदतगटाचे महत्व विषद केले.यानंतर डॉ. शोभना तीर्थळी यांनी कलाकृती प्रदर्शनातील सहभागींची माहिती सांगितली.गौरी इनामदार यांनी ‘चला संवाद साधूया….’ या पुस्तकाबद्दल आणि रुपांतरकार रामचंद्र करमरकर यांच्याबद्दल माहिती सांगितली.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.यानंतर प्रमुख पाहुणे हिमांशू वझे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.वक्त्यांनी ‘स्वास्थ्य संयोजन’ या विषयावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले.
श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.गौरी इनामदार यांनी गुरु ठाकूर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता केली.