जागतिक पार्किन्सन्स मेळावा जास्तीत जास्त शुभार्थीकेन्द्री असावा असा आमचा प्रयत्न असतो. कलाकृती इशस्तवन,नृत्य हे सर्व शुभार्थींचेच असते.आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर असा इशस्त्वनात सहभाग असायचा.यावर्षी आम्ही ९४ वर्षाचे शुभार्थी कलबाग काकांचे ( नारायण कलबाग ) इशस्तवन ठेवायचे ठरवले.ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
त्याचे असे झाले,सोमवार ११ डिसेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती कलबागकाकांचा फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले.त्यांच्या अनेक कृती त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतात.कलबागकाका हे आदर्श शुभार्थी आहेत.त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका एकटेच राहतात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत नाहीत तर इतरांनाही मदत करतात.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला आहे. त्यानुसार दिनचर्या आखली आहे.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे.यावर स्वतंत्र लिहायला हवे.सभाना ते नियमित हजर असतात.सहलीचा आनंद लुटतात.या वयातील त्यांचा उत्साह अनेकांना प्रेरित करू शकेल असे वाटल्याने.यावर्षी ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यात त्यांचे इशस्तवन ठेवले.त्यांनी ही लगेच होकार दिला.हा माझा सन्मानच आहे म्हणाले.
आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असतात.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते.
मेळाव्याचा दिवस जवळ आला आणि अनेकांचे चौकशीचे फोन येवू लागले.’सभा ११ तारखेला आहे ना?’ ‘नर्मदा हॉल मध्येच यायचं ना?’ ‘केसरीवाड्यात सभा आहे ना?’ खर तर सभा ९ तारखेला आणि एस.एम.जोशी सभागृहात होती.सर्वाना फोन गेले होते,विविध माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिले होते.पण दर वर्षी अशा तऱ्हेच्या चौकशा होताच असतात.कलबागकाकाना तारीख,वेळ ठिकाण लक्षात असेल ना? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्यांना वेगवेगळ्या वेळी फोन करायचा प्रयत्न केला.पण ते फोन उचलत नव्हते. ते येऊ शकले नाही तर अडणार नव्हते.पण त्यांचे इशस्तवन व्हावे ही आमची मनापासूनची इच्छा होती.९ तारखेला सकाळी त्यांचा फोन आला.’मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?’ ‘हॉल माहित आहे ना’? मी खात्री करून घ्यायला विचारले’.हो.पत्रकार भवनच्या शेजारी एस.एम.जोशी हॉल’.माझा जीव भांड्यात पडला.खर तर त्यांचा व्यवस्थितपणा पाहता.मला ही शंका येणच चुकीच होत.
ते ठरल्याप्रमाणे वेळेवर आले.
ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले’.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील’ असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते.ते बोलताबोलता संगीतकार वसंत देसाई यांच्याबरोबर आपण कार्यक्रमात सहभागी असायचो असे ते म्हणाले होते हे आठवले.म्हणजे त्यांना सराव होता तरीही त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.सुरुवात छान झाली आणि कार्यक्रम रंगतच गेला.
प्रमुख पाहुणे डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
ही त्यांच्या कर्तुत्वाची एक झलक.त्यांचाकडे आणि त्यांच्याबद्दल सांगण्याजोगे खूप आहे.कोणीतरी त्यांच्याशी बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.