आमच्या जवळच्या नातेवायीकांकडे आम्ही विवाहापुर्वीच्या गृह्मुखासाठी गेलो होतो.होमाचा धूर झाला आणि हे गच्चीत जावून बसले कारण नुकतीच ह्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती.माझी नजर ह्यांना शोधत आहे हे पाहुन उपस्थीतांपैकी एकानी येवून सांगितले. काका गच्चीत आहेत.नंतर दोन दिवस वेगवेगळे विधी आणि लग्नादिवशीही वेळोवेळी हे कुठे आहेत याची ते माहिती देत होते.लग्नाच्या गडबडीत मला त्यात काही गैर जाणवले नाही.ते मला काकानी ओळखले घरच्यांबद्दल चौकशी केली असे ज्या पद्धतीने सांगायला लागले तेंव्हा माझ्या लक्षात आले,ह्यांना पीडी झालाय म्हणजे यांची स्मृती गेली आहे असे त्यांना वाटत होते.बऱ्याचजणांचा पीडीमध्ये स्मृती भ्रंश होतो असा समज असतो.
पार्किन्सन्सच्या एक लक्षणात स्मृतीभ्रंश हेही आहे पण तो सर्वाना होत नाही.माझ्या पाहण्यात २/३ जणांनाच स्मृतीभ्रंश झालेला आढळला.तेही ८५/९० अशा वयात म्हणजे तो उतार वयानेही असू शकतो.अल्झायमरवर ( स्मृती भ्रंश ) पीएचडी करत असलेल्या मंगला जोगळेकर यांना अल्झायमर झालेले पीडी पेशंट हवे होते.मी त्यांना एकही नाव सांगू शकले नाही. मला जे माहित होते ते त्यावेळी जीवित नव्हते. उलट अत्यंत चांगली स्मृती असणारे अनेक सांगता येतील.कै अनिल कुलकार्णीनी शेवटपर्यंत स्मरणिकेसाठी उत्तम लिखाण दिले. डॉक्टर प्रकाश जावडेकर यांचे पुस्तक प्रकाशित होत आहे.तर प्रभाकर जावडेकर यांनी ‘जावडेकर कुलवृत्तांता’सारखे किचकट काम केले.वास्तुविशारद चंद्रकांत दिवाणे शेवटपर्यंत अगदी जुन्या फाईलमध्ये कोठे काय आहे ते मुलांना सांगत.अशी असंख्य उदाहरणे देता येतील.सुरुवातीला शुभार्थी,शुभंकर लक्षणांची भली मोठ्ठी यादी पाहून आपल्याला वाट्याला हे सर्व येइल का म्हणून भयभीत होतात.मीही यातून गेली आहे.मला हे एकटे बाहेर गेले की आपला नाव पत्ता विसरले तर विसरणार नाहीत ना? असे वाटायचे. आज माझ्या या बावळटपणाचे मला हसू येते.पक्षाघात आणि पीडी याबाबत पण लोकांच्या मनात संभ्रम असतो त्याविषयी पुढच्या गप्पात.
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson’s Mitramandal, Pune( https://www.youtube.com/playlist… ) हा युट्युब channel पहा