सोमवार दिनांक ९ जुलैला पार्किन्सन्स मित्रमंडळाने नर्मदा हॉल येथे सभा आयोजित केली होती. पाऊस असूनही ५०/ ६० जण उपस्थित होते.बंगलोर येथील व्यास ( विवेकानंद योग अनुसंधान संस्था ) विद्यापीठाचे ट्रेनर प्रकाश शेल्लीकरी यांनी प्राणायामावर व्याख्यान दिले.योगप्रसार हे मिशन असलेले शेल्लीकरी ६ महिने अमेरिकेत ६ महिने भारतात असतात.
सभेची सुरुवात शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करून झाली.यानंतर अविनाश धर्माधिकारी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.शेल्लीकरी यांनी सुरुवातीला सर्वांना तीन वेळा ओंकार म्हणायला सांगून भाषणाला सुरुवात केली क्रोनिक डिसीज का होतात आणि होलिस्टिक अॅप्रोचनी त्यावर मात कशी करता येते हे त्यांनी स्वानुभवावरून सांगण्यास सुरुवात केली.अनुवंशिकता नाही,व्यसन नाही तरी त्यांना कॅन्सर झाला.त्यांच्या पत्नीचा कॅन्सरने झालेला मृत्यू आणि त्यांना स्वत:ला झालेला कॅन्सर,मलाच का? हा सतावणारा प्रश्न, यामुळे कॅन्सरबद्दल मुळाशी जावून विचार करायला त्यांना प्रवृत्त केले.यासाठी त्यांनी कॅन्सरवरची अनेक पुस्तके आणून वाचली.त्यांच्या परीने उत्तर शोधले.कामाचा प्रचंड ताण आणि तो सोसण्यासाठी गरजेची असलेली भावनिक बुद्धिमत्ता ( EQ ) कमी पडणे,स्वस्थ,पुरेशा झोपेचा अभाव हे स्वत:बद्दल उत्तर त्यांना सापडले.बेंगलोर येथील व्यास विद्यापीठात घेतलेले प्राणायामाचे शिक्षण आणि इतर अभ्यासातून केमोथेरपी न घेता होलिस्टिक Treatment चा विचार त्यांनी केला.हे करत असताना वेळोवेळी तपासण्या करून कॅन्सर वाढत नाही ना हे पाहिले.
प्राणायाम हा होलिस्टिक अॅप्रोचचा एक भाग आहे.प्राणायाम का आणि योग्य पद्धतीने कसा करायचा हे समजले तरच त्याचा उपयोग होतो. त्यासाठी होलिस्टिक अॅप्रोच समजून घ्यावा लागेल.त्यात प्रथम येते Spirituality. देवावर विश्वास ठेवा. तो नसेल तर स्वत:वर विश्वास ठेवा. अहंम ब्रम्हास्मी म्हटले जाते.तुमच्यातल्या डॉक्टरला जागृत करा.शेल्लीकरी यांनी त्यासाठी अॅनाॅटाॅमीवरील पुस्तके वाचली.पंचेंद्रियांची शक्ती समजून घेतली.रूट कॉज शोधले.भूतकाळातील समस्यांचा प्रभाव काढून टाकणे,स्वत:तील Strong Points शोधणे,सकारात्मक विचार करणे याही गोष्टी महत्वाच्या आहेत.आपले आहे ते आयुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी होलिस्टिक अॅप्रोच महत्वाचा ठरतो.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विचार.योग्य विचारासाठी शरीर आणि मन यात ताळमेळ हवा.नकळत आपल्या मनाचा तोल जातो.नियंत्रण जाते.त्याचा विविध अवयवांवर परिणाम होतो.आणि स्वत:च निर्माण केलेल्या व्याधी मागे लागतात.शरीर आणि मन यात बॅलन्स राहण्यासाठी ओंकाराचा उपयोग होतो.रोज सकाळी ९ वेळा ओंकार करावा.रात्री झोपताना ९ वेळा ओंकार करावा,भ्रामरी करावी. त्यामुळे झोप चांगली लागते.स्मरणशक्ती चांगली राहते.प्राणायामालाही ओंकाराने सुरुवात करावी.ओंकार करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्यावा.त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. फुफ्फुसाची क्षमता वाढते.हे करताना डोळे बंद असावेत.ताठ बसावे.शरीर ताणरहित असावे.श्वासाकडे लक्ष द्यावे.श्वास घेतांना थंड हवा आत येते. श्वास सोडताना गरम हवा बाहेर जाते.हे करताना शरीराचा एखादा भाग अवघडला,तर हालचाल करून घ्यावी परंतु मिटलेले डोळे उघडू नयेत..भ्रामरीतील गुंजन २० सेकंदापेक्षा जास्त असावे.श्वास घेताना हवा आत घेणे,रोखणे ही क्षमता हळूहळू वाढवत जावी.
आहार हाही होलिस्टिक अॅप्रोचमध्ये महत्वाचा आहे.जेवताना पाणी न पिता पातळ ताक घ्यावे.पाणी पिल्याने पचनास आवश्यक विविध रस निर्माण होत असतात, ते डायल्युट होतात.ओमेगा ३ असलेले पदार्थ खावेत ,विविध फळे खावीत,शक्यतो ब्रेकफास्ट पूर्वी खावीत.तळलेले,मसालेदार पदार्थ खावू नयेत.जे खाऊ ते आनंदाने खावे.
या सर्वाबरोबर व्यायाम,प्राणायामही महत्वाचा आहे. कोणताही व्यायाम श्वासाबरोबर करावा.
आपला आजार समजून घेऊन, त्याला मित्र बनवून स्वत:च त्याला नियंत्रणात ठेवता येते.’थिंक ऑफ बिगर’ असा संदेशही त्यांनी दिला.त्यादिवशी ते २२ किलोमीटर वारीबरोबर चालून आले होते.मनाची ताकद, त्याला अभ्यासाची जोड यामुळे आजारावर नियंत्रण कसे शक्य आहे याचे ते जिते जागते उदाहरण आहेत.त्यांच्या व्याख्यानातुनही हा संदेश उपस्थितांपर्यंत पोचला.
शेवटी त्यांनी ओंकाराचे प्रात्यक्षिक करून दाखवले.ज्यांना अधिक शिकण्याची इच्छा आहे त्यांनी व्यक्तिगत रित्या किंवा गट करून बोलावल्यास शिकवण्याची त्यांनी तयारी दाखवली.
वाढदिवसानिमित्त रेखा आचार्य यांनी चहा,बिस्किटे दिली.पद्मजा ताम्हणकर यांनी पेढे वाटले.