१३ एप्रिलला आमचा पार्किन्सन्स दिवस मेळावा झाला आणि १४ एप्रिलला आमचे हितचिंतक, आमच्या विविध उपक्रमांची दखल घेणारे अशोक पाटील यांची whatsapp वर प्रतिक्रिया आली.’ काल रात्री पार्किन्सन्स मंडळ स्मरणिकेतील एकापेक्षा एक सुरेख असे लेख वाचत बसलो होतो.त्यातील “पार्किन्सनस व तत्सम व्याधीग्रस्तांसाठी सूक्ष्म व्यायाम” …हा मोरेश्वर काशीकर यांचा लेख मला फारच आवडला.पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे.’
एखादा लेख छान होण्यासाठी त्याविषयाच्या सखोल ज्ञानाबरोबर तो विषय लोकांच्यापर्यंत पोचवायची आंतरिक तळमळही लागते.मोरेश्वर काशीकर यांच्याकडे शहाणे करुनी सोडावे सकलजन ही वृत्ती ठासून भरलेली आहे.त्यामुळेच वाढलेल्या पार्किन्सन्सची पर्वा न करता हा लेख त्याच्याकडून लिहिला गेला.
५/६ महिन्यापूर्वी त्यांचा मी सध्या सोप्या व्यायामाविषयी लेख लिहितोय असा फोन आला. आत्तापासून थोडे थोडे लिहिले की स्मरणिकेच्या वेळेपर्यंत लिहून होईल असे त्यांना वाटत होते.त्यांची वाढलेली फ्रीजिंगची समस्या आणि ताणलेला ऑफ पिरिएड पाहता हे कसे शक्य आहे असे मला त्यावेळी वाटले होते.१४ तारखेच्या सभेच्या वेळची त्यांची अवस्था आठवत होती.
१४ जानेवारी २०१९ ला डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे नर्मदा हॉल येथे व्याख्यान होते.सकाळीच काशीकर यांचा फोन आला.मी व्याख्यानाला येत आहे.जानेवारीत त्यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्त त्याना खाऊही द्यायचा होता.त्यांची मुलगी आली त्यामुळे ते आलेले समजले पण प्रार्थना झाली,सर्वांचे वाढदिवस झाले तरी ते आत आले नाहित.शेवटी व्याख्यानाला सुरुवात केली.ते फ्रीज झाले होते.त्यांना आत येण्यासाठी अर्धा तास लागला.
अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी बरेच शुभार्थी आपली दैनंदिन कामे करणे एवढेच कसेबसे करतात.काही दिवसांनी ते लेख लिहित असल्याचा फोन आला.स्मरणिकेसाठी लेखन देण्यासाठी १५ फेब्रुवारी शेवटची तारीख होती.त्यांचा पुन्हा फोन आला माझे लेखन झाले आहे पण संगणक बिघडलाय.मी त्याना म्हटले काही हरकत नाही. तुमचा लेख थेट छापायचा असतो त्यात संपादन करावे लागत नाही.अगदी पेजिंगच्या स्टेजला दिलेत तरी चालेल.त्यांचा लेख आमच्या मासिकासाठी asset असतो.पण अशी वेळच आली नाही त्यांनी २३ तारखेच्या दरम्यान लिखित लेख पाठवला.
मधल्या काळात तुम्हाला मासिक साठी प्रुफ रीडिंग करावयाचे असल्यास माझ्याकडे पाठवा असा फोन आला.मला फ्रीजिंगची समस्या असलेले,ऑफ पिरिएड वाढलेले आणि या त्रासाने हैराण झालेले,मानसिक स्वास्थ्य हरवलेले,नैराश्यात गेलेले अनेक शुभार्थी आठवत होते.त्यांचा फोन आला की त्यांची कशी समजूत घालायची असे मला वाटायचे?परदुःख शीतल हे मला मनातून समजायचे पण काशिकारांकडे पाहिले की वाटते,मनाचे सामर्थ्य आणि काहीतरी करायची जिद्द,तळमळ असेल तर सर्व शक्य आहे.अशी समस्या असलेले आणि कोणतीच समस्या नसून ही कुरकुर करणारे यांच्या साठी म्हणजे आपल्या सर्वांसाठीच मोरेश्वर काशीकर यांचे उदाहरण सकारात्मक उर्जा देणारे आहे.
आम्ही स्मरणिका देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो.त्यांच्या मनातल्या अनेक योजना ते सांगत होते.आम्ही थक्क!
काशीकर यांच्यामुळे भारावलेले क्षण येतच राहणार हे मला लक्षात आले.यापूर्वी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे.
असे इतरही भारावलेले क्षण अनुभवण्यासाठी पहा
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.