” Destiny favors determined” निश्चयी व्यक्तीवर नशिबाचा वरदहस्त असतो.
वरील वाक्य वाचनात आले आणि मनात खळबळ उडाली.क्षणभर दिङ्गमूढ झालो.’स्थितीचा असे किंकर प्राणीमात्र’,’असेल माझा हरी’ अशी वचने ऐकत आलो,कर्तृत्व आणि नशीब यांची या वाक्याने बांधलेली आवळ्या भोपळ्याची मोट मनाला काही भावेना.पाचवीला सटवाई ललाटीचा लेख लिहिते.ही संस्कारातूनच मिळालेली माहिती.तेच ते नशीब! मग त्याचा आणि कर्तृत्वाचा संबंधच कसा येणार.’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हटले जाते.तरी किती अनुभवले जाते?
मला पडलेले प्रश्न आणि शंकासुराला आलेल्या शंका यांचे समाधान होण्याचा लवकरच योग येईल असे वाटले नव्हते.पार्किन्सन्स व्याधीने माझ्यावर झडप घातली आणि ब्रह्मांड आठवले सुरुवातीला योग्य निदान न झाल्याने चुकीचे औषधोपचार झाले आणि आजार बळावला.परिणाम मी पूर्णपणे परावलंबी, गलितगात्र झालो.अंघोळ घालण्यापासून, खायला घालण्यापर्यंत सर्व गोष्टी दुसर्याकडून करवून घ्याव्या लागत होत्या.अशा अवस्थेत एक वर्षाचा काळ लोटला त्यानंतर सुधीर कोठारी याना प्रकृती दाखवली.त्यांनी सांगितलेल्या औषधोपचाराने पार्किन्सन्सवर नियंत्रण मिळवता आले.माझे रोजचे व्यक्तिगत व्यवहार मी करू लागलो..पण आत्मविश्वास गमावलेलाच होता.हे राहिलेले कार्य माझ्या कुटूंबियानी केले. वेळोवेळी माझ्यावर जबाबदार्या टाकून त्या पूर्ण करुन घेतल्या.पूर्वी घरात फिरताना आधार घेणारा मी स्वतंत्रपणे वावरू लागलो.सर्वांनी घेतलेल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे माझा गेलेला आत्मविश्वास परत गवसला.घराबाहेर पडून एकट्यानेही वावरू लागलो.घरातली व घराबाहेरची छोटी मोठी कामे करू लागलो..नव्या जोमाने लिहू लागलो,संगणकावर अकांउटसची कामे करु लागलो.सहीसुद्धा करता न येणारा मी स्वतःच्या हस्ताक्षरात वृत्तपत्राना लिखाण पाठवू लागलो.
आणि १० एप्रिल २००८ उजाडला.त्या दिवशी पार्किन्सन्सधारकांचा मेळावा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हॉलमध्ये भरला होता.प्रवर्तक होते श्री शेंडे आणि श्री पटवर्धन!जवळजवळ तीनशे लोक उपस्थित होते.मेळाव्याला उपस्थित राहिल्यावर कुठतरी मन हेलावलं.चेहरे वाचायचा छंद असल्याने एक गोष्ट लक्षात आली की यातील बरीच मंडळी मनानं खचलेली आहेत. याना दिलासा देऊन यांच्या मनाला उभारी देणे गरजेचे आहे.आणि मी पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचे ठरवले.पार्किन्सन्स मित्रमंडळाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करून पार्किन्सन्स धारकांना जमेल तितके सहकार्य करून त्यांच्याशी सतत संपर्कात राहायचे ठरविले.
त्या दृष्टीने पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या मासिक बैठकानी चालना दिली.लोकांशी एकत्रितपणे संवाद साधता येऊ लागला.लोकाना अडचणी आहेत,प्रश्न आहेत आणि त्यातून ते मार्ग शोधात आहेत.याची जाणीव झाली.लोकांशी संपर्क वाढावा म्हणून ‘सकाळ’ मधून लेख लिहिला आणि दूरध्वनींचा अक्षरश: पाउस पडला.दुरध्वनी,मासिक,मेळावे,प्रत्य्क्ष गाठीभेटी यांनीही समाधानकारक संपर्क साधला जाईना.याकरिता पार्किन्सन्स धारकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष वैयक्तिक गाठीभेटी घेण्याचा उपक्रम सुरु केला आहे.तो यशस्वीही होत आहे.या गाठीभेटीच्या वेळी लोकांच्या मनात काही प्रश्न,शंका,कुशंका आहेत तसेच प्रत्यक्ष दिनक्रमात त्रुटी
आढळून आल्या.त्यांचा आढावा खालीलप्रमाणे घेतला आहे.
१) अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पार्किन्सन्स धारकांना अशा तर्हेचा वैयक्तिक संवाद साधलेला हवा आहे.त्याचे त्याना अप्रूप आहे.त्यांच्या इच्छाशक्तीला फुलविण्यासाठी अशा तर्हेच्या संवादाची गरज आहे.व्यक्तिगत संवादाच्या माध्यमातून.आम्हा दोघानाही उर्जा शक्ती मिळत होती.आमचे मनोबल इच्छाशक्ती वाढत होती
२) पार्किन्सन्स धारकांचे मनामध्ये मुलभूत चार प्रश्न कमीअधिक प्रमाणात सतावताना दिसत होते.
पार्किन्सन्स कॅन्सरसारखा प्राणघातक आहे का?
पार्किन्सन्स संसर्गजन्य आहे का?
पार्किन्सन्स वंशपरंपरागत आहे का?
पार्किन्सन्स पूर्ण बरा होतो का?
उत्तर नाही/नाही/नाही
३) पार्किन्सन्समुळे हालचाली मंदावतात.तेंव्हा हालचाली वाढवणे हे पार्किन्सन्सधारकांना महत्वाचे ठरते.यामध्ये रोज नियमितपणे फिरायला जाणे ही गोष्ट अत्यंत अगत्याची.मी स्वत: दररोज तीन किलोमीटरचा फेरफटका मारतो.फिरण्यामुळे ताजेतवानेपण येते.व शरीराचे स्नायू शिथिल बनतात.याबाबतीत आळस केला जातो असे आढळते.करणे अनेक दिली जातात.पण त्यातील अधिक तर दिले जाते ते म्हणजे तोल जातो किंवा जाण्याची भीती वाटते.तोल सावरण्यासाठी काय करायला पाहिजे याचे मंडळांनी आयोजित केलेल्या व्याख्यानातून अनेकवेळा मार्गदर्शन झाले आहेच. पण सोपा मार्ग म्हणजे हातात काठी ठेवणे.किंवा कोणाला तरी बरोबर घेऊन जाणे.काही जरी झाले तरी रामदासांच्या उक्तीत थोडा बदल करुन ‘दिसामाजी काहीतरी ते चालावे’. हे निश्चित.चालण्याबरोबरच स्नायुना ताण देणारे व्यायामही करणे आवश्यक.हा व्यायाम म्हणजे शाळेतील कवायतीची सुधारलेली आवृत्ती.
४) मेंदूतील डोपामिन हे द्रव्य कमी झाल्याने स्नायूवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा बिघडते.आणि मेंदूवरील स्नायूंचे नियंत्रण कमी होऊन पार्किन्सन्स ही व्याधी उद्भवते.कमी झालेले डोपामिन बाहेरूनच मेंदूत सोडावे लागते.ही प्रक्रिया औषधच्याच माध्यमातून केली जाते.म्हणूनच पार्किन्सन्स धारकांना सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहावे लागते.त्याना उपेक्षून चालत नाही.त्याचप्रमाणे डॉक्टर सतत बदलत रहाणेही योग्य नसते.नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था हॉते.
५) आणखी काही गोष्टी पार्किन्सन्सचा विशेष त्रास हाताना होत असतो.त्यामुळे लिहिणे,वस्तू पकडणे,उचलणे कठीण होऊन बसते.त्यामुळे पार्किन्सन्स धारक लिहिणेच सोडताना आढळतात.हा उपाय नव्हे.या उलट रोज एक पानभर लिहिलेत,जस येईल तस,तरी तुम्ही वाचता येण्यासारखे लिहू शकता.प्रस्तुत लेख हा मुळात माझ्या हस्ताक्षरातील होता एवढे सांगितले तरी पुरेसे आहे.परंतु अस लिखाणाच काम करताना कोणीही पार्किन्सन्स धारक आढळला नाही.आता तरी पार्किन्सन्स धारकांनी नियमित लिखाणाची सवय वाढवावी.
बहुतेक घरी पार्किन्सन्स धारक पलंगावर बसलेले आढळले.ही पद्धत घातक.एकदा पलंगावर बसण्याची सवय झाली तर पलंगावर लवंडावेसे वाटते.ही सहज प्रवृत्ती होते.आणि अवेळी झोपण्याची सवय होते.वस्तुत: पार्किन्सन्स धारकाला सक्रीय राहणे हे अधिक महत्वाचे.दुपारची वामकुक्षी व रात्रीची झोप एवढीच झोप सर्वसाधारण पुरेशी असते.खुर्चीत बसण्याची सवय लाऊन घेतली असता अवेळी झोप टाळता येते.शिवाय पलंगावर ठाण मांडल्याने आजारीपणाची सवय जडते.ती वेगळीच.
मित्रहो, एका पार्किन्सन्स धारकांने स्वत:शी व इतर पार्किन्सन्स धारकांशी साधलेल्या संवादाचे हे शब्दांकन. अर्थात संवाद साधणारा आणि शब्दांकन करणारा दोन्ही व्यक्ती एकच.अशा तर्हेने संवाद चालूच ठेवण्याचा निर्धार करा.पार्किन्सन्स धारकांनी परस्पर संवाद साधणे अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळे परस्परांना दिलासा मिळतो उर्जा मिळते.त्यांचे सोने करुया.औषधोपचार करून पार्किन्सन्सला स्वस्थ बसवू.आणि आपण इतर गोष्टी करायला मोकळे होऊया.आपण आपल्याकरिता वैयक्तिक व सामुहिक पातळीवर कार्य करू शकतो याचा विचार करून आपल्या भविष्याचा लेखाजोखा आपणच बनवूया.म्हणजे आपल नशीब आपणच घडवूया.दाखवून देऊ,की आम्हीच आमच्या नशिबाचे शिल्पकार आहोत.
( ज.द.कुलकर्णींचा सादर लेख ११ एप्रिल २०१०च्या पार्किन्सन्स दिनानिमित्त झालेली मेळाव्यात प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतील आहे.ही मित्रमंडळाची पहिली स्मरणिका.यासाठी ज. दंचाच पुढाकार होता.यासंबंधी पहिली मिटिंग त्यांच्याच घरी झाली.पण १५/३/१० रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले.सकाळ मुक्तपीठ मध्ये लेख लिहून त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाला लोकांपर्यंत पोचवले. स्वत:च्या प्रकृतीचा विचार न करता ते घरोघरी जाऊन शुभार्थीना भेटत.त्यांचे नैराश्य घालवीत.त्यांच्या बोलण्यातील तळमळ आणि ते स्वत: शुभार्थी असल्याने त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडत असे.प्रसन्न व्यक्तिमत्वाचे ज.द.कुलकर्णी मित्रमंडळाचे उत्साही कार्यकर्ते संघटक म्हणून नेहमीच लक्षात राहतील.)