रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता.मेळाव्याचे हे दशकपूर्तीचे वर्ष होते.एप्रिलच्या भर उन्हात दुपारी साडेचारला कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर, शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते
नेहमीप्रमाणे सुजाता हरगुडेने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने सर्व आत प्रवेश करत होते.चाफ्याचे फुल आणि थंड ताक देऊन सर्वांचे स्वागत केले गेले.
गणेश वंदना आणि गणेश स्तवनाने सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत वसुधा बर्वे,पद्मजा ताम्हणकर, सविता ढमढेरे, अंजली महाजन,विजया दिवाणे,शोभना तीर्थळी या शुभार्थी आणि शुभंकरांनी सहभाग घेतला.संवादिनीवर त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर होत्या .
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा होनप यांनी केले.त्यांच्या रूपाने एक नव्या दमाची उत्तम सूत्रसंचालिका मंडळाला मिळाली..
सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता. .नृत्यामध्ये विलास जोशी,प्रज्ञा जोशी,प्रभाकर आपटे,श्रीमती तिकोने,विजय देशपांडे,कर्नल पी.व्ही.चंद्रात्रेय,श्री सिंग,श्री,दिलीप कुलकर्णी, या शुभार्थिनी आणि सौ.शेंडे,दीपा लागू,श्रीमती वाघोलीकर या शुभंकरांनी सहभाग घेतला.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या साडे आठ वर्षांच्या परिश्रमाचे हे फलित होते.हृषीकेशने या उपक्रमाची फोटोसह माहिती हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अल्टरनेटीव थेरपीत समाविष्ट झाल्याचे मागील वर्षी सांगितले होते.त्याचा पुढचा भाग १५ नोव्हेंबर २०१७ ला प्रकाशित होणार आहे. हृषीकेश पवार यांनी यावेळी नृत्यार्थी स्वतंत्रपणे स्वत:च नृत्याचे संचलन करणार असल्याचे आणि आपले अनुभव सांगणार असल्याचे सांगितले.सुरुवातीला श्रीमती वाघोलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.त्या शुभार्थी पतीबरोबर नृत्यात सामील झाल्या.आता ते नाहीत पण त्यांचे नृत्य चालूच राहिले.नृत्याच्या शेवटी सुरुवातीपासूनचे विद्यार्थी विलास जोशी आणि नवीन विद्यार्थी श्री सिंग यांनी आपले अनुभव सांगितले.
यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर राजस देशपांडे यांचे श्री.शरच्चंद्र पटवर्धन आणि श्यामला शेंडे यांच्यासह मंचावर आगमन झाले. श्री पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.दीपा होनप यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
डॉक्टर राजस देशपांडे हे रुबी हॉल क्लिनिक येथे डायरेक्टर ऑफ न्यूरॉलॉजी म्हणून कार्यरत आहेत.नाटो या भारत सरकारच्या कमिटीचे सदस्य आहेत.त्यांनी एमबीबीएस,एमडी जनरल मेडिसिन केले. केइएममध्ये डीएम. न्यूरॉलॉजी मध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.कॅनडा येथे फेलोशिपवर गेले असता त्यांनी जनरल न्यूरॉलॉजी, न्युरो Ophthalmology, मुव्हमेंट डीसऑर्डर,मल्टीपल स्क्लेरॉसिस या विषयात विशेष काम केले.ग्रामीण भागात अपुऱ्या सुविधा असूनही गुंतागुंतीच्या केसेस हाताळणे,किल्लारी भूकंपाच्या वेळचे कार्य,जातीय दंगलीची परिस्थिती हाताळणे यातील योगदानातून त्यांनी सामजिक भान दाखवले.अनेक संशोधन पेपर त्यांच्या नावावर आहेत’.डॉक्टर जीन’ हे त्यांचे सर्वसामान्यांसाठीचे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे.
.पाहुण्यांच्या सत्कारानंतर गेली आठ वर्षे अश्विनी हॉटेल कार्यक्रमासाठी मोफत देणारे श्री.देवस्थळी,नृत्योपचारासाठी स्वत:च्या घरातील हॉल गेली सात वर्षे देणाऱ्या सुमन जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वृषाली बेलेकर,मंडळाच्या हितचिंतक डॉक्टर विद्या काकडे,निशिगंध हा व्यसनी स्त्रियांचा गट चालविणाऱ्या प्रफुल्ला मोहिते,डीमेन्शीया गट चालविणाऱ्या मंगला जोगळेकर आणि मंडळाचे हितचिंतक माधव येरवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.सकारात्मक विचारांची पेरणी केली.( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर राजस देशपांडे यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.याचवेळी वेबसाईटवरही अतुल ठाकूर यांनी स्मरणिका प्रकाशित केली.
यानंतर श्यामलाताई शेंडे यांनी भावपूर्ण शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
डॉक्टर राजस देशपांडे यांचे व्याख्यान ऐकण्यास सर्वच उत्सुक होते.डॉक्टरनी आपल्या आजोबांनी दिलेला समोरच्या पेशंटमध्ये स्वत:चे आई वडिलांना पहा असा सल्ला सांगितला.तो आजतागायत मी पाळत असल्याचे सांगितले आणि पहिल्या वाक्यातच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. ‘Basics of Parkinson’s disease and care at home’ या विषयावर बोलताना ते पार्किन्सन्सकडे तज्ज्ञाच्या नजरेतून पाहताना पेशंट आणि त्यांच्या कुटुंबियाच्या नजरेतूनही पाहातात हे सातत्याने जाणवले. पार्किन्सन्स हा जीवघेणा आजार नाही.यासह आनंदी,यशस्वी,प्रॉडक्टिव्ह्,क् रिएटिव्ह आयुष्य जगता येते हे सांगून या आजार बद्दलची भीती काढून टाकली.एकदा तो झाल्यावर त्याला हाताळायचे कसे याबद्दल उपयुक्त सूचना दिल्या.सर्वात महत्वाचे त्याला स्वीकारणे,जेवढे भांडत राहाल तेवढी आयुष्याची गुणवत्ता कमी होईल.
यासाठी त्याला समजून घेणेही महत्वाचे.न्यूरॉलॉजिस्टनी आजाराचे निदान केल्यावर सर्व कुटुंबियासह त्यांच्याशी एक मिटिंग करणे व आजाराबद्दल यथार्थ ज्ञान मिळवणे आवश्यक आहे.एकदा औषधाचा डोस जुळल्यानंतर वारंवार न्यूरॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज नाही. वर्षातून तीन चार वेळा जाणे पुरेसे आहे.इतर आजारासाठी फिजिशियन आणि घराजवळचे नर्सिंग होम पाहून ठेवावे अशा व्यावहारिक सूचनाही दिल्या.
यानंतर पार्किन्सन्स होतो म्हणजे नेमके काय होते? पार्किन्सन्सची नॉनमोटार लक्षणे,पेशंटला वावरताना सोयीचे जावे म्हणून घरात करावयाचे बदल,व्यायामाचे महत्व अशा विविध बाबी अत्यंत सोप्या रीतीने समजावून सांगितल्या.पेशंटबरोबर केअरटेकरचाही विचार करावा. इतरांनी पेशंटची काळजी घेऊन केअरटेकरला थोडा आराम द्यावा हे आवर्जून सांगितले.यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.वेळे अभावी काही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.ती मंडळाच्या संचार अंकातून देण्यात येतील.त्यांचे संपूर्ण भाषण वेबसाईटवर आणि युट्यूबवर ऐकावयास मिळेल.सर्वांनी आवर्जून ऐकावे आणि कुटुंबियांना ऐकवावे.
हे भाषण,एका तज्ज्ञ व्यक्तीचे होतेच पण सहानुभाव( Empathy )असलेल्या सुहृदाचे होते.
यानंतर काही महत्वाची निवेदने आणि आभाराचे काम अरुंधती जोशीने केले.
सभा संपल्यावरही डॉक्टरांच्या भोवती शुभंकर, शुभार्थीनी गर्दी केली. सर्वांच्याच प्रश्नांना डॉक्टर न कंटाळता उत्तरे देत होते.
यावर्षीच्या कार्यक्रमात शुभार्थीनी केलेल्या कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या. अनेकजण आवर्जून त्या पाहत होते.यावर्षीच्या कलाकृतीत विविधता होती.यावर स्वतंत्र लेख दिला जाणार आहे.एकूणच कार्यक्रम उपस्थितांना सकारात्मक उर्जा देणारा झाला.
सर्व शुभार्थीना स्मरणिका देण्यात आल्या.सभेस हजर नसणाऱ्याना पोस्टाने पाठविण्यात येतील.