२०१७ च्या जागतिक पार्किन्सनन्स दिनानिमित्ताच्या मेळाव्यात शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन ठेवले होते.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.असे प्रदर्शन ठेवावे ही कल्पना ज्यांच्यामुळे सुचली त्या शुभार्थी कै.विद्याधर पटवर्धन यांची प्रकर्षाने आठवण झाली.
आम्ही घरभेटींना सुरुवात केली तेंव्हा ज्यांचा आमच्यावर प्रभाव पडला त्यापैकी विद्याधर पटवर्धन हे महत्वाचे नाव.त्यांचा मुलगा कोणत्या तरी खेळांच्या स्पर्धासाठी कोल्हापूरला गेल्याने,ते मुलीकडे होते.खर तर तेही बरोबर जाणार होते पण प्रकृती बिघडल्याने जाऊ शकले नाहीत.त्यांची पत्नी निवर्तली होती.गरजेनुसार मुलाकडे किंवा मुलीकडे ते राहत. दोन्हीकडे आनंदात असत.गोऱ्यापान, शांत सात्विक चेहऱ्याच्या पटवर्धन यांचे व्यक्तिमत्व कोणावरही प्रभाव पडणारे असेच होते.त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला.
महाराष्ट्र बँकेत चाळीस वर्षे असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम केले.७५ व्या वर्षी त्यांना पीडीने गाठले.त्यांचा एक डोळा मोठ्ठा दिसायला लागला होता.डोळ्यांच्या डॉक्टरनी न्यूरॉलॉजीस्टकडे पाठवले.पीडीचे निदान झाले.आम्ही हे लक्षण पहिल्यांदाच ऐकत होतो.
. बँकेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला.७५ व्या वर्षी पीडी झाला तरी त्यानी चित्रकला सोडली नाही. चित्रकलेने पिडीच्या लक्षणावर मात केली.त्याना आम्ही भेटलो तेंव्हा ते ८० वर्षाचे होते. त्याना ताठरते बरोबरच कंपाचीही समस्या होती..त्यामुळे त्यानी पीडी झाल्यावर केलेली मोठमोठी पेंटींग्ज पाहून त्यांच्या जिद्दीला हॅट्स ऑफ म्हणावेसे वाटले.पक्षी, प्राणी, फुले, निसर्गाची विविध रुपे, व्यक्ती यांच्या चित्रानी तर कितीतरी वह्या भरल्या होत्या.चित्रे काढताना त्यांची समाधी अवस्था असे.. कंप, ताठरता जवळही फिरकत नसत.संगणकाशीही त्यांनी मैत्री केली होती.आनंदासाठी स्वमदत गटाची त्यांना गरज नव्हती.उलट स्वमद गटालाच ते प्रेरणा देणारे होते इतरांना त्यांचा त्रास होऊ नये ही त्यांची वृत्ती,वागण्याबोलण्यातील नेमकेपणा,व्यवस्थितपणा पहिल्या भेटीतच लक्षात आला.
औषधाच्या बॉक्सवर सुंदर अक्षरात किती वाजता कोणत्य गोळ्या घ्यायच्या याचा छोटा तक्ता त्यांनी केला होता.घरभेटीत आणखीही काही कलाकार भेटले. जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात शुभार्थीच्या कलाकृतीचे प्रदर्शन ठेवायचे ठरवले २००९/१० हे वर्ष कलोपचार या विषयालाच वाहिलेले होते.त्यामुळे असे प्रदर्शन सयुक्तिकही होते.समारंभाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर अनिल अवचट येणार होते.मी बोलणार नाही ओरिगामी,बासरी वाजवणे,चित्रे काढणे करीन अस ते म्हणाले.त्यांच्या हाताला त्यावेळी दुखापत झाली होती हात बांधलेला होता चारला कार्यक्रम सुरु होणार होता. ते साडेचारला येणार होते.पण प्रत्यक्षात पावणे चारलाच आले.प्रदर्शन मांडून झालेले होते.प्रदर्शनाचा मोठ्ठा भाग पटवर्धन यांच्या पेंटिंग्जच्या फ्रेम्सनी भरलेला होता. त्यांनी प्रदर्शन पाहून तोंडभरून कौतुक केले.एका डॉक्टर कलाकाराने दिलेली ती दाद, म्हणून ती महत्वाची होती.
सभांना न येणारे पटवर्धन या कार्यक्रमाला आवर्जून आले होते.निवेदिकेनी त्यांची माहिती सांगितली.पटवर्धन यांनी उठून नमस्कार केला.टाळ्यांचा कडकडाट झाला.यानंतर कलाकृतींचे दुसरे प्रदर्शन २०१५ मध्ये झाले पण त्यावेळी पटवर्धन या जगात नव्हते.पण प्रत्येक प्रदर्शनाच्यावेळी त्यांची आठवण येताच राहील.त्यांच्याशी झालेल्या दोन चार भेटीतच त्यांनी आम्हाला खूपखूप दिले.