Thursday, October 3, 2024
Homeआठवणीतील शुभार्थीआठवणीतील शुभार्थी - डॉक्टर महादेव ठोंबरे - शोभनाताई

आठवणीतील शुभार्थी – डॉक्टर महादेव ठोंबरे – शोभनाताई

(पर्किंन्सन्स मित्रमंडळ या आमच्या स्वमदत गटाचे ‘पार्किन्सन्ससह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य आहे.काही जणांनी मला विचारले पर्किन्सन्स आजारामुळे दैनंदिन जीवनात त्रास सहन करावा लागतो,जगण्याची गुणवत्ता कमी होते.हा आजार बरा होणारा नाही असे सारखे डोक्यात असते असे असतांना आनंदात राहता येईल? याचे हो, नाही असे उत्तर देण्यापेक्षा ज्यांनी पार्किन्सन्सला मित्र बनवले शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी राहिले आणि आमचे जे रोलमॉडेल बनले अशा शुभार्थींबद्दल लिहिणे मला अधिक योग्य वाटले.त्यातूनच ‘आठवणीतील शुभार्थी’ मालिका सुरु झाली).

.स्मरणिका पाठवण्याचे काम मृदुला करत होती.तिने कृषी सोसायटीतील शुभार्थी सतीश चिटणीस यांना स्मरणिका पाठवली असे सांगताच मला ठोंबरे कृषी सोसायटीत राहतात हे लक्षात आले तिच्याशी मी त्याबाबत बोलले.ती म्हणाली, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या ठोंबरे यांचा फोन मिळेल.कृषी सोसायटीत ओळखीचे आहेत आणि दुसरे दिवशी सकाळी ११ वाजताच शुभार्थी सतीश चिटणीस यांनी ठोंबरे यांच्या मुलाचा मिलिंदचा मोबाईल नंबर पाठवला.ते ठोंबरे यांच्या शेजारीच राहत होते.मला युरेका युरेका असे मोठ्यांनी ओरडावे असे वाटले.ठोंबरे कुटुंबियाना संपर्क करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते.काखेत कळसा आणि गावाला वळसा असे झाले होते.
डॉक्टर महादेव ठोंबरे यांच्याबद्दल कितीतरी दिवसापासून मला लिहायचे होते.कोणावरही लिहिताना मी त्यांच्या कुटुंबियांची परवानगी घेते.आणि माझ्या आठवणींवर विसंबून न राहता त्या बरोबर आहेत ना हे तपासून घेते.डॉक्टरांच्याबाबत त्यांचा फक्त लॅंडलॉइन आमच्या कडे होता.त्यावर संपर्क होत नव्हता.सुरुवातीच्या काळात मोबाईल थोड्याच सभासदांकडे असायचा माझ्याकडेही नव्हता.त्यांचा संपर्क शोधण्याचे सर्व प्रयत्न वाया गेले होते.आणि अचानक तो सापडला..तसे नमनालाच घडाभर तेल झाले.आता मुळ विषयावर येते.
डॉक्टर ठोंबरे यांच्या निधनाला ६/७ वर्षे झाली पण त्यांच्याबरोबर झालेल्या भेटी मला आत्ता आत्ता घडून गेल्यासारख्या आठवतात..अश्विनी मध्ये सभेला ते नियमित यायचे सुरुवातीला एकटेच यायचे.नंतर थोडा तोल जायला लागल्यावर पत्नी बरोबर येई.ते मंडळात यायला लागले तेंव्हा त्यांनी पंचाहत्तरी ओलांडली होती.घशाच्या कॅन्सर होऊन गेला होता.त्यांच्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला होता.व्हिस्परींग सारखे बोलणे होते.पण त्याना काहीना काही भरभरून सांगायचे असायचे आणि ते सांगण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत.
त्यांची खरी ओळख झाली ती त्यांच्या घरभेटीत.तेंव्हा तीर्थळी फोरव्हीलर चालवायचे.आम्ही भरपूर घरभेटी करायचो.आम्हाला घर शोधावे लागू नये म्हणून ठोंबरे वाहिनी गेटपासून थोड्या पुढे येऊन उभ्या होत्या.साधी राहणी उच्च विचारसरणी असे दोघेही होते.ठोंबरे वाहिनिना मी प्रथमच पाहत होते.पण अनेक वर्षाची ओळख असल्यासारख्या आमच्या गप्पा सुरु झाल्या..त्यांच्या बागेत केसरी आंब्याचे झाड होते. आम्हाला आग्रह करून त्यांनी आंबा कापून दिला.
ते काय बोलत होते ते मला समजायला त्रास होत होता. मग त्यांनीच स्वत: मी नेलेली प्रश्नावली भरली. कृषी क्षेत्रात त्यांचे मोट्ठे काम होते.Joint Director of Agriculture या पदावरून ३५ वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले होते.ते हाडाचे संशोधक होते.निवृत्त झाले तरी त्यांचे काम थांबले नव्हते.’आदर्श शेती उद्योग’ नावाचे मासिक ते चालवत होते.त्याचे संपादक,प्रकाशक सबकुछ तेच होते.पार्किन्सन्स झाल्यावर ही ५/६ वर्षे ते हे मासिक एक हाती चालवत होते.त्यांचा पीएचडीचा विषय जंतुनाशके,कीटकनाशकके यावरच होता.त्यात त्यांचे सारखे काम चालत असे त्यांना झालेला कॅन्सर आणि पार्किन्सन्स हे त्याचेच फलित असे त्यांचे म्हणणे होते.त्यांनी स्वत:च्या शरीरालाही प्रयोगवस्तु बनवले होते.आणि त्यानुसार ते स्वत:च्या पार्किन्सन्सचे निरीक्षण करत.२०११ च्या स्मरणिकेसाठी त्यांनी ते ज्यांच्याकडे उपचार घेत त्या नटराज द्रविड यांच्याकडून लेख लिहवून घेऊन दिला होता.
आम्ही त्यांच्याकडे जाऊन आल्यावर दोन चार दिवसात त्यांचा फोन आला तुमचा पत्ता सांगता का? मी सांगितला.ते का मागतात हे काही मी विचारले नाही एक दिवशी ठोंबरे रिक्षाने थेट आमच्या घरी आले होते. मला थोडे आश्चर्यच वाटले.ते गोखले नगरला राहत आणि आम्ही सॅलसबरी पार्कला.त्यांनी रिक्षा थांबवून ठेवली होती.ते म्हणाले तुमच्या प्रश्नावलीतील काही प्रश्नाची उत्तरे सविस्तर दिली नव्हती म्हणून मी ती द्यायला आलो.त्यांनी कोणती औषधे घेता या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले होते.खरे तर न्यूरॉलॉजीस्टची औषधे त्यांनी दिली होती.पण आता आयुर्वेदिक व इतर औषधे लिहून आणली होती.औषधाचा खर्च किती येतो या प्रश्नाचे उत्तर मला अगदी ढोबळ अपेक्षित होते.त्यांनी अलोपाथी,आयुर्वेदिक,अर्थोपेडीक,मसाज. अशी वर्गवारी करून लिहून आणली होती.त्या दिवसाची तारीख टाकली होती. एका संशोधकाला नेमका आणि सविस्तर डेटा किती महत्वाचा असतो याची त्यांना जाण होती असे माझ्या लक्षात आले आणि ते हाडाचे संशोधक असल्याने त्याना हे महत्वाचे वाटले असावे.मला स्वत:चीच लाज वाटली.आणि डोळ्यात पाणी आले.पंचाहत्तरी ओलांडलेले ,दुर्धर व्याधीने ग्रासलेले ठोंबरे इतक्या लांब ही माहिती देण्यासाठी आले होते.मी प्रश्नावली भरून घेतल्याने हे माझे मोठे संशोधन आहे असे त्यांना वाटले असावे.मी त्याना मंडळाच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी ही सर्वसाधारण पाहणी आहे हे निट सांगायला हवे होते.
आजही त्यांच्याबद्दलच्या आठवणी लिहिताना माझा गळा दाटून आला आहे.कौटुंबिक दुर्घटना,कॅन्सर,पर्किन्सन्ससारखे दुर्धर आजार असे नियतीने कोरडे ओढले असले तरी .त्यांच्यातील संशोधक,परोपकारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा माणूस,कृतिशीलता,उत्साह या कशालाच नियती स्पर्श करू शकली नव्हती.माझ्या स्वत:च्या ,कॅन्सरच्या काळात ठोंबरेंची आठवण मला मानसिक आधार देणारी होती.
सतीश चिटणीस यांच्याकडूनही मला माहित नसलेल्या काही गोष्टी कळल्या..आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला.त्यांच्यावर गांधीवादाचा पगडा होता. ते फक्त खादीच वापरत.ते सोसायटीचे सेक्रेटरी होते.हिरीरीने समस्या सोडवत.सोसायटीच्या कार्यकारिणीचे ते अखेरपर्यंत सदस्य होते. सोसायटीच्या चांगल्या कामात त्यांचे मोठे योगदान होते कोणालाही काही अडचण आली कि ते धावून जात.हे करताना गाजावाजा किंवा कोणताही आव नसे.लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी त्यांची मैत्री होती.
८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.शेवटचे ५/६ महिने त्यांचे बाहेर पडणे बंद झाले होते.कारण खूप तोल जात होता.पण उत्साह,आनंद मात्र शेवटपर्यंत तसाच होता.ठोंबरे सर तुमच्या अशा जगण्याला सलाम.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क