सोमवार दिनांक १२ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती..
‘ पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत’ पुस्तकाचे लेखक शेखर बर्वे यांचे’ पार्किन्सन्सचे आत्मविश्लेषण’ या विषयावर व्याख्यान झाले.
प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.शुभंकर, शुभार्थींचे वाढदिवस साजरे झाल्यावर रामचंद्र करमरकर यांनी शेखर बर्वे यांची ओळख करून दिली. स्वत:च्या पत्नीच्या पार्किन्सन्सचा शोध घेता घेता त्यांनी सर्व शुभार्थीना आपापल्या पार्किन्सन्सचा शोध घेण्यास भाग पाडले.त्यांचे व्याख्यान लेख स्वरुपात याच स्मरणिकेत देत आहोत.शुभंकरानी शुभार्थीला विविध गोष्टी करण्यास प्रेरित करणे,पार्किन्सन्ससाठी विविध उपचार,शुभार्थीचे निरीक्षण करून न्यूरॉलॉजिस्टशी चर्चा,व्यायाम ,आहार,मन प्रसन्न ठेवण्यासाठी विविध उपाय अशा अनेक बाबींवर शेखर बर्वे यांनी चर्चा केली.सखोल अभ्यास,अनेक शुभार्थींचे निरीक्षण आणि स्वानुभव यांचा आधार त्यांच्या व्याख्यानाला असल्याने सर्व उपस्थित प्रभावित झाले.
आपल्या व्याख्यानातील’ मन रमविण्यासाठी विविध कलांचा उपयोग’ हा धागा पकडत शेखर बर्वे यांनी सौ वसुधा बर्वे यांना गीत म्हणण्याची विनंती केली.वसुधाताईनी पार्किन्सन्स झाल्यावर मन रमविण्यासाठी संगीत क्लास सुरु केला.संगीताच्या दोन परीक्षाही दिल्या.त्यात प्रथम श्रेणी मिळवली.त्यांनी ‘केशवा माधवा’ हे भक्तीगीत सुरेल आवाजात म्हटले.त्या गात आहेत,शेखर बर्वे यांनी हातात माईक धरला आहे, पत्नीकडे कौतुकाने पाहत आहेत हे दृश्य शुभंकर शुभार्थी यांच्यातल्या सुसंवादाचे प्रात्यक्षिकच होते.
यालाच पूरक अशी विजय देवधर यांची ‘पेपर क्विलिंग’च्या आधारे केलेली भेटकार्डे होती.रंगीबेरंगी फुलांची कार्डे पाहून सर्वच प्रभावित झाले.देवधर यांनी हे काम करताना आपणास वेळेचे भान नसते असे सांगितले.रंग मला बोलावतात असेही ते म्हणाले.आता अनेकाना काहीना काही बोलावे असे वाटत होते.
विजय ममदापुरकर यांनी ओंकाराचे अनुभव सांगितले,
रमेश घुमटकर यांनी चालता चालता एकदम फ्रीज झाल्यावर आपण काय करतो हे प्रात्यक्षिकासह सांगितले,
श्रीपाद कुलकर्णी यांनी आपले अनुभव सांगितले.
नारायण कलबाग यांनी प्रार्थना म्हटली.जोत्स्ना सुभेदार यांनी वाढदिवसानिमित्त बर्फी दिली.
शेवटी मंडळाच्या आधारस्तंभ सुमन जोग आणि नर्मदा हॉल मिळवून देणे आणि तेथील व्यवस्था बसवून देणे यात पुढाकार घेणाऱ्या नंदा रेगे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.