आज रामनवमी.डॉक्टर देशपांडेंची प्रकर्षाने आठवण येत आहे. राम नवमीला दौलत राममंदिरात आम्ही जात असू. त्याच्या जवळ राहणारे देशपांडे डॉक्टर बऱ्याचवेळा तिथल्या बागेत भेटत.पार्किन्सन्स मित्रमंडळामुळे त्यांची ओळख झाल्यापासुनचा हा परिपाठ होता.बागेत भेटले नाहीत तर /त्यांच्याकडे जात असू.नव्वदी ओलांडलेल्या देशपांडे यांचा पांढरे शुभ्र धोतर आणि कुडता, टोपी असा वेष असे. प्रसन्न व्यक्तिमत्व,लहान मुलासारखा निरागस आणि हसतमुख चेहरा पहिल्या भेटीतच छाप पडत असे.बोलण्याची हौस.पण पार्किन्सन्समुळे बोलणे समजत नसे.त्यांचे केअरटेकर कुलकर्णी त्यासाठी दुभाषी बनत.
डॉक्टर देशपांडे आणि त्यांच्या शय्याग्रस्त डॉक्टर पत्नी वत्सलाताई यांच्यासाठी कुलकर्णी पती पत्नींना त्यांनी आपल्या घरी ठेवले होते.कुलकर्णी पती पत्नी त्यांच्यासाठी घरातले सदस्यच वाटायचे.हे जोडपेही त्यांना आई वडिलच मानायचे.देशपांडे म्हणजे माझ्यासाठी देवच असे कुलकर्णी म्हणायचे. दुसऱ्या मजल्यावर राहायचे लिफ्ट नव्हती.दोन जिने उतरून डॉक्टरना खाली आणायचे म्हणजे कठीण काम होते. पण कुलकर्णी रोज त्यांना खाली फिरायला आणायचे मंडळाच्या सर्व सभांना सहलींनाही ते घेऊन यायचे.पीडीबद्दल सर्व माहिती करून घ्यायचे.देशपांडे एक कलंदर व्यक्तिमत्व.प्रचंड उत्साही कधी मनात आले की आमच्यापैकी कोणाकडेही त्यांना जायचे असायचे.कुलकर्णी न कंटाळता आणायचे.त्याना बाहेर नेणे त्रासदायक होते. म्हणून आम्हीच त्यांच्याकडे अनेकदा भेटी साठी जायचो.खुप खुश होत.आम्हालाही सकारात्मक उर्जा मिळत असे देशपांडे यांची पत्नी निवर्तल्यावर मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवले.त्यांना जवळून ओळखणाऱ्या कुलकर्णीनी आपला फोन नंबर देऊन सांगितले गरज पडल्यास मी आहे.कलंदर देशपांडेना वृद्धाश्रमाच्या नियमात,यांत्रिक व्यवस्थेत बांधून राहणे कठीण होते.ते सारखे पळून जाऊ लागले.वृद्धाश्रमचालकांनी त्यांना घेऊन जायला सांगितले आणि पुन्हा कुलकर्णीना पाचारण करण्यात आले.देशपांडेंच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुलकर्णीनी त्यांची सेवा केली.
शेवटपर्यंत ते सभेला आले. सभेत अगदी पुढच्या ओळीत बसत. शेवटी काहीना काही प्रश्न विचारत.सभेतील त्यांचे असण्याचा वक्त्यानाही आदर वाटे.त्यांनी स्वत:चे आत्मचरित्र लिहिले होते ते वक्त्यांना देत.त्यांचा स्वभावच आनंदी असल्याने त्यांचे सर्व जीवनही तसेच होते.अध्यात्माचा पाया होता.त्यांचे अध्यात्म बोलण्यातले नव्हते तर आचरणातले होते. कुलकर्णीही कविता करत.शेअरिंग असले की सादर करत.अनिल अवचट यांनी ओरिगमी प्रात्यक्षिकात वर्तमानपत्राच्या कागदाचा मुगुट केला होता..प्रत्येकांनी आपापला मुगुट डोक्यावर घातला.देशपांडे यांना तो अगदी खुलून दिसत होता..लहान मुलासारखे ते खुष झाले होते.
शेवटपर्यंत ते असेच राहिले.त्यांच्या पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यात त्यांच्या उमद्या स्वभावाचा, ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीचा जेवढा वाट आहे तेवढाच कुलकर्णी यांनी अत्यंत प्रेमाने,आपुलकीने केलेल्या सेवेचा आहे.
ते गेल्यावर दोन तीन दिवसांनी आम्हाला समजले. त्यांचे. वय आणि आजार पाहता तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.त्यांच्या सुंदर आठवणी मात्र मागे आहेत.