या लेखात मला माझ्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीबरोबर आलेले विविध अनुभव सांगावेसे वाटत आहेत म्हणून मी सदर लेखात ते नमूद करत आहे.असे अनुभव सगळ्यांना येतीलच असे नाही.कदाचित माझ्या पेक्षा वेगळे अनुभव वृद्धांच्या बाबतीत काहींना आले असतील अजूनही येत असतील असो
माझ्या सासूबाईंना १०५ वर्षे आयुष्य लाभले होते.त्यांचा आणि माझा जवळपास ३८ वर्षांचा सहवास , या मध्ये अनेक विविध प्रकारचे अनुभव मला त्यांच्या सहवासात आले सर्व लिहिणे शक्य नाही.पण जे मनाला भावले ते लिहिते .
माझ्या सासूबाई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. देवधर्म, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा त्या नेमाने करीत असत.खूप पोथ्या ही नित्यनेमाने वाचत असत .
चातुर्मासात त्या दरवर्षी वेगळे नेम करीत असत.
थोडक्यात त्या देवधर्म व्रतवैकल्ये यात खूप रमत .असे छान जीवन त्या जगत होत्या. पण शरीर धर्म कधी कोणाला चूकत नाही.तो त्यांना ही चुकला नाही,त्यांना काही दिवसांनी शरीराची साथ मिळेनाशी झाली चालताना दम लागू लागला आणि किंचित तोल जाऊ लागले.
मग त्यावर्षी मी त्यांना काकडआरतीला न जाण्याचा सल्ला दिला पहाटे उठून एकट्यांना मंदिरात नेऊन सोडणे मला शक्य नव्हते, मग सासूबाईंनी “लहान मुलांना शाळेत जायला रिक्षा लावतात तशी मला काकडआरतीसाठी रिक्षा लाव” असा हट्ट धरला , मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली पण रिक्षावाले मिळाले नाहीत.आता कोजागिरी पौर्णिमेला काकडआरती सुरू होणार व आपल्याला जायला मिळणार नाही म्हणून माझ्या सासूबाई नाराज झाल्या काय उपाय करावा मी विचार करुन लागले मग मी त्यांना शांतपणे सांगितले “आई देव सर्वत्र आहे बाहेरच्या मंदिरात काकडआरती केली काय? आणि आपल्या देवघरा समोर केली काय सारखीच असते तेव्हा तुम्ही पहाटे उठून आपल्याच देवासमोर काकडा करा त्यांना ते पटले
सकाळी स्नान करून देवासमोर दिवा उदबत्ती लावून त्या मनोभावे काकड्या ची गाणी म्हणू लागल्या सुरवातीला मला आपण खूप मोठी लढाई जिंकली असे वाटू लागले त्यांची गाणी पहिले २/३ दिवस ऐकायला छान वाटली पण हळूहळू त्यांच्या गाण्याचा तालसुर वाढू लागला. पहाटे च्या शांततेत आवाजाची पातळी वाढू लागली,यांची झोपमोड होऊ लागली .
मग मी सासुबाईंना “हळू आवाजात गाणी गा सा़ंगू लागले त्या तेव्हा हो म्हणायच्या आणि मी गेल्यावर त्यांचा आवाज वाढायचा
लहान मुलांना जसं हळू बोल , म्हंटले की,ती जोरात मोठ्या आवाजात बोलतात तसंच वर्तन या वृद्धांचे होते.त्यांना दिलेल्या सूचना जणू समजत नाहीत.
अशा प्रकारे आमच्या घरात कोजागिरी ला सुरू झालेला काकडा त्रिपूरी पौर्णिमेला संपला .
काकडआरतीची गाणी पहाटेच्या वेळी शांततेमुळे इतर इमारती मधील लोकांना ही ऐकू जात होती व ते लोक “या वयात ही आजींचे केवढे पाठांतर आहे,आवाज किती खणखणीत आहे, उत्साह केवढा दांडगा आहे तुमच्या सासुबाईंचा वगैरे स्तुतीसुमने उधळीत होते.
पण मला मात्र मीच सुचविलेल्या उपायाचा त्रास झाला यांच्या झोपेचे तंत्र बिघडले त्यामुळे त्यांची त्या महिन्यात चिडचिड झाली.
एक महिना संपला मग पूर्वी सारखे दैनंदिन जीवन सुरू झाले मला हायसे वाटले.
तात्पर्य म्हातारपण म्हणजे दूसरे बालपण याची प्रचिती मला सासूबाईंच्या काकडा आरती वरुन आली त्या काकडा आरतीच्या काळात खूप आनंदी होत्या उत्साही होत्या आपल्या गाण्यामुळे कोणाला काही त्रास होत असेल का ? हे त्यांच्या गावी ही नव्हते.आपल्याला काकडाआरती करायला मिळतेय यातच त्यांचा आनंद होता .
अगदी लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर सोडल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद त्यांना झाला होता.
नंतरच्या वर्षी त्यांना पहाटे उठून काकडा आरती करणे जमेनासे झाले हळूहळू त्यांची शक्ती कमी झाली पण एक वर्ष मात्र त्यांनी मनसोक्त गाणी गायली.
अजून ही मला त्या गेल्या तरी त्यांची ती काकडा आरतीची गाणी आठवतात.आणि दरवर्षी काकडा सुरु झाला की मला आमच्या घरातील काकड आरती सोहळा डोळ्यासमोर येतो.
अशा बऱ्याच आठवणी आहेत त्या मी हळूहळू आठवतील तशा सांगेन.
लेखिका
अंजली महाजन पुणे
२८|११|२०२१
अंजली छान गमतीदार आठवण.