मे २०१९ ची मासिक सभा माझ्या चांगली लक्षात राहिली.या सभेत ठरलेल्या वक्त्या आजारी पडल्याने आल्या नाहीत.आयत्यावेळी परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करण्याचे ठरले .’शुभंकरांनी स्वत:ला स्पेस देत शुभार्थीला हाताळण्यासाठी कोणते उपाय योजले’ असा विषय ठरला.अनेक शुभंकरांचे अनुभव आणि काही शुभार्थींचे अनुभव यांनी एक वेगळीच उर्जा निर्माण झाली. मुळात नर्मदा हॉल हा गुरुदेव रानडेंचा ध्यानमंडप होता.त्या हॉलमध्ये नेहमीच पॉझिटिव्ह वाटायचे.या सभेने त्यात भर पडली.माझ्यासाठी हे महत्वाचे ठरले कारण त्यानंतर आठ महिने मी सभेला येऊ शकले नाही.मला कॅन्सरचे निदान झाले.पण सभेतून निर्माण झालेल्या सकारात्मकतेने मला निदानाचा स्वीकार करणे सोपे गेले.त्यातून बाहेर येतानाही ही उर्जा माझ्या बरोबर होती.यातील एक होते, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे शुभार्थी बाळाभाऊ दासराव जोशी.त्याना सर्व बा.दा.या नावानेच ओळखतात.
ते सभेसाठी नांदेडहून खास आले होते.मुलगा पिंपळे सौदागरला राहतो तेथून ते एकटेच आले होते.नुकताच जागतिक पार्किन्सन्स दिन मेळावा झाला होता त्यावेळी प्रकाशित केलेली स्मरणिका त्याना मी देत होते. त्यांनी स्पायरल बायडिंग असलेले बाड दाखवले.त्यांच्या मुलांनी वेबसाईटवरील पीडीएफ फाईलवरून सर्व स्मरणिका, संचारचे अंक यांचे प्रिंटआउट काढून एकत्रित फाईल करून दिली होती.त्यांच्या मुलाचेही मला कौतुक वाटले.बा.दांच्या जीवनाचा आलेख थक्क करणारा होता.
उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून ३६ वर्षे काम केले.उपप्राचार्य पदापर्यंत ते पोचले होते. अध्यापन, एमफिल,पीएचडीच्या विद्यार्थ्यांना गाईड करणे,विविध परिषदात पेपर वाचणे असे शैक्षणिक स्वरूपाचे काम त्यांनी केले.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील वृत्तपत्रातून,नियतकालिकातून त्यांनी विपुल लेखन केले. बही:शाल व्याख्यानमाला,आकाशवाणी,प्राध्यापक परिषदा,परिसंवाद,साहित्य संमेलने यात सहभागाबरोबर मार्गदर्शकाची भूमिका बजावली.हे करताना विद्यार्थी हित,भोवताल आणि एकूणच समाजाचे हित आणि राष्ट्रहित असे चढत्या भाजणीने त्यांचे कार्य विस्तारत गेले.यात उक्ती आणि कृती दोन्हींचा समावेश होता.
निवृत्तीनंतरही त्यांच्या कार्यात खंड पडला नाही.वंचितांपर्यंत शिक्षण पोचविणे हा त्यांचा ध्यास होता.सत्ता ,संपत्ती याच्या मागे न लागता त्यांनी तन,मन, धन वेचून काम केले. याचा कोठे गवगवा केला नाही.अध्यापन असो,संशोधन असो,ग्राहक पंचायत,ग्रामपंचायत,ज्येष्ठ नागरिक संघ, असो या सर्व कामात त्यांनी स्वत:च्या कामाचा वेगळा ठसा उमटवला.त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या विद्यार्थी आणि आणि कुटुंबीयांनी ‘ज्ञानतीर्थ’ नावाने गौरव अंक काढला.त्यांची सर्व स्तरातील लोकप्रियता दाखवणारा असा हा ग्रंथ आहे.त्यांचा यथोचित गौरव करणारा शुभेच्छापर लेख स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी लिहिला.त्यांनी आपल्या लेखात कर्म ज्ञानशील आणि ज्ञान कर्मशील बनविणाऱ्या लोकांच्यात बा.दांची गणना केली.या सर्व कार्यात आणि मुलांना संस्कारित आणि उच्चशिक्षित बनविण्यात प्राध्यापिका असलेल्या पत्नी डॉ.वसुधा जोशी यांचीही उत्तम साथ मिळाली.
या अंकात भरभरून स्तुती करणारे अनेक लेख आहेत. नातवंडे, मुले, सुना कुटुंबीय आणि मित्र मंडळींनी बा.दांच्यावर लिहिले आहे. विध्यार्थी,अनेक नामवंतानी वैचारिक, संशोधन स्वरूपाचे लेख लिहिले आहेत.प्राचार्य राम शेवाळकर, डॉ.यु.म. पठाण,नागनाथ कोतापल्ले, असीम सरोदे अशी उदाहरणादाखल नावे सांगता येतील.यात विविध तज्ञांनी विविध विषय हाताळले आणि ग्रंथाचा दर्जा आणि उपयुक्तता मूल्य वाढविले.खरे तर त्यांचे इतर कार्य आणि अनुभव हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
आता यात पार्किन्सन्स कधी आला? तो त्यांच्या ६१/६२ व्या वर्षीच आला होता.पण वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलीकाने विठ्ठलाला थांब जरासा विटेवरी असे सांगितले तसेच कार्यमग्न बा.दा.नी पीडीला शरीरावर पूर्ण कब्जा करू न देता रोखले.पुण्याला ते सभेला आले तेंव्हा त्यांना पीडी होऊन १६ वर्षे झाली होती.त्यांच्याकडे पाहून तसे वाटत नव्हते.
त्यांच्या शेअरिंगमधून बर्याच गोष्टी समजल्या.ते दैनंदिन कामे स्वत:ची स्वत: करत. शिवाय बारमाही शेतीची कामे करत. यासाठी ४/५ मैल चालावे लागे पण ते काठी वापरत नसत.एकटे फिरत.प्राध्यापक पत्नीची मदत होइ.ज्येष्ठ नागरिक संघ, ग्राहक पंचायत, ग्राम पंचायत अशी इतर सामाजिक कामेही सुरु असत.त्यांनी आणि त्यांच्या पत्नींनी लिहिलेले ‘श्रीक्षेत्र माहूर’ हे पुस्तक मंडळाला भेट दिले. त्यावेळी त्यांचे लेखन अजून सातत्याने चालू होते.प्रादेशिक वृत्तपत्रात त्यांचे दैनंदिन सदर असे.अनेक विद्यापीठांसाठी ते पीएचडीचे गाईड होते.आमचे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपण स्वत: हाताने लिहिता की लेखनिक घेता असे विचारले असता त्यांचे उत्तर ‘स्वत: लिहितो’ असे होते.लिहिताना कंप पूर्ण थांबतो. फक्त अक्षर आता बारीक झाले आहे असे ते म्हणाले.गौरव ग्रंथाबाबत वर लिहिलेले अनेक उल्लेख त्यांच्या शेअरिंग मध्येही होते.
१८ फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांचे युरीनरी प्रॉब्लेममुळे निधन झाले.शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सर्व कामे चालू होती.त्यांचे सुपुत्र प्रसाद यांच्याशी बोलताना समजले जेष्ठ नागरिकांची भारतीय पातळीवरील संस्था फेस्कॉमचा इतिहास लिहिण्याचे काम चालले होते.त्याचे बा.दा.मुख्य संपादक होते. ८० टक्के काम झाले होते.त्यांनीच तयार केलेली माणसे हे काम पुढे नेतील. त्यांचे विचार, लिखाण,कार्य या सर्वातून आजही ते अनेकांच्या मनामनात असतील.पार्किन्सन्समुळे असे कितीतरी गुणवंत, कीर्तिवंत आमच्या परिवारात आले हे आमचे भाग्य.
९ जून हा त्यांचा जन्मदिन.या निमित्त त्यांना आदरांजली म्हणून हा लेख.
बा.दा.ना विनम्र प्रणाम