शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा हॉटेल अश्विनी येथे पार पडली.
सभेस ६०/ ७० सभासद उपस्थित होते.मंगला जोगळेकर यांचे ‘विस्मरणाचे प्रश्न व उपचार’ या विषयावर व्याख्यान झाले.मंगला जोगळेकर या २०१० पासून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे.मेमरी क्लिनिक चालवतात.डिमेन्शिया पेशंट आणि त्यांच्या केअरटेकर साठीही त्या काम करतात.
वसू देसाई यांनी सुरुवातीला वक्त्यांची ओळख करून दिली.त्यानंतर शुभंकर शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
शुभंकर अंजली महाजन हिला दौंड येथील ‘रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट’तर्फे ‘रक्तदाता’ पुरस्कार प्राप्त झाला.त्याप्रीत्यर्थ तिचा सत्कार करण्यात आला.अंजलीने २१ वेळा रक्तदान केले आहे. तिचा रक्त गट ओ आरएच निगेटिव्ह आहे.हा रक्तगट रेअर असल्याने अत्यवस्थ परिस्थितीतल्या अनेकांचे जीव तिच्या रक्तदानामुळे वाचले आहेत.अंजलीनेआपले मनोगत व्यक्त केले. या रक्त गटाचे रक्त साठउन ठेवता येत नसल्याने.अत्यवस्थ रुग्णासाठी फोन आला की तातडीने जावे लागते.असे सांगितले.
मंगला जोगळेकर यांनी श्रोत्यांना प्रथम स्मरणशक्तीच्या कोणत्या समस्या आहेत हे विचारले आणि छोटे छोटे खेळ,कोडी,रोजच्या जगण्यातील प्रश्न सांगत विषय सोपा केला.सर्वाना बोलते केले.अशाच तऱ्हेने घरच्या घरीही खेळ कोडी तयार करून मेंदूला खतपाणी घालता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला.काही सूचना दिल्या.
लक्षात राहण्यासाठी करत असलेल्या कामाकडे पूर्ण लक्ष हवे.आजूबाजूला आवाज नको.
गटात बोलताना अनेक व्यक्ती बोलत असतात. तेंव्हा गटात महत्वाचे बोलणे नको.
निर्णय घेण्यास अडचण वाटत असेल तर जवळच्या माणसाची मदत घ्यावी,स्वत:स थोडा वेळ द्यावा.
विस्मृतीच्या लक्षणांची सुरुवात झाल्यावर दोन तीन वर्षे उशिरा लक्षात येतात.त्यामुळे लक्षणे दिसतात का यावर लक्ष ठेवावे.
चेहरे,माणसे लक्षात राहण्यासाठी त्या व्यक्ती आणि त्यांची काही वैशिष्टे यांची मनाशी सांगड घालावी.
मंगलाताईनी १०६ वर्षाच्या बाईचे उदाहरण दिले.त्यांच्या मुलाखतीत त्यांनी या वयात स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आपल्याला शिस्त उपयोगी पडल्याचे सांगितले.शिस्त कोणत्याही वयात लावता येते.आणि १५ दिवसात ती लागू शकते.असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय त्यांनी काही टिप्सही दिल्या.
१)एकावेळी दोन,तीन कामे करू नका.
२)अडथळे कमी करा.
३)थांबा आणि विचार करा.
५)समजल नाही तर पुन्हा विचारा.
६)एका वेळी अनेकांशी बोलू नका.
७)नजरेला नजर देऊन बोला.
८)कामाचे छोटे तुकडे करा.
९)ऑन पिरिएड असताना कामे करा.
१०) वेळेचे बंधन व इतर बंधने घालू नका.
११)मन शांत ठेवा.यासाठी झोप चांगली लागणे आवश्यक.
१२)नोटस्,डायरी,फळा,अलार्म,कॅलें डर या सर्वांचा वापर करा.
१३)नकारार्थी बोलू नका,स्वत:ला संधी द्या.होत आहे ते मान्य करा,धीर धरा.
१४) मेंदूच्या क्षमता कमी झालेल्या असतात.त्यामुळे अनेकाग्रता.असणार नाही हे लक्षत घ्या.
१५) झोप शांत लागण्यासाठी मन शांत राहण्यासाठी ध्यान,व्यायाम,पत्ते खेळणे अशा गोष्टी करा. आवडत्या गोष्टीत मन रमवा.
या सर्व टिप्स लक्षात ठेवून आणि घरच्या घरीही खेळ कोडी तयार करून मेंदूला खतपाणी घालता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला.
वाढदिवसानिमित्त कलबाग यांनी पेढे दिले.शीलाताईनी चॉक्लेट वाटली.९ एप्रिलच्या जागतिक पार्किन्सन्स दिवसाच्या निमित्ताने असलेल्या मेळाव्यात शुभार्थिनी केलेल्या कलावस्तुंचे प्रदर्शन असणार आहे त्यासाठी कलाकृती साठी आव्हान करण्यात आले.