ठाणे येथील प्रसिध्द आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेची पुणे येथे शाखा सुरु झाली आहे.ठाण्याप्रमाणे पुण्यातही विविध स्वमदतगटांना एका छताखाली आणून आरोग्य चळवळ वृद्धिंगत करण्याचा संस्थेचा विचार आहे.प्रत्येक स्वमदतगटाचे स्वत:चे कार्य एकीकडे चालू राहील. याशिवाय आय.पी.एच.महिन्यातून एक दिवस प्रत्येक स्वमदतगटाला त्यांची जागा सभेसाठी देणार आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी दर महिन्याचा चवथा सोमवार दिला गेला आहे.
.त्यानुसार या महिन्याची सभा सोमवार दिनांक २३ एप्रिलला दु.४ ते ६ यावेळात आयोजित केली होती.पहिलीच सभा असल्याने किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे अनुभवांची देवाण घेवाण आणि शरच्चंद्र पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन ठरवले होते.पटवर्धन यांनी रोल प्लेद्वारे मार्गदर्शन ठरवले होते.सभेस १६ शुभंकर शुभार्थी उपस्थित होते.बंगल्याच्या बाहेर रस्ता दाखवण्यासाठी आय.पी.एचची व्यक्ती उभी होती. आत आल्यावर आय.पी.एचच्याच प्राची बर्वे हसतमुखाने स्वागत करत होत्या. त्या काहीवेळ आमच्यात सामील झाल्या.त्यामुळे सुरुवातीसच नवखेपणा गेला.
प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.बरेचजण नवीन असल्याने सुरुवातीला परस्पर परिचय करायचा ठरले.शरच्चंद्र पटवर्धन,शोभना तीर्थळी,आशा रेवणकर यांच्या ओळखीतून नकळत मंडळाचा थोडा इतिहास नवीन लोकांना समजला.अरुण सुर्वे,किरण दोषी हे एरवी न बोलणारे नेहमीचे सदस्य भरभरून बोलले.८६ वर्षाचे ताम्हनकर आणि त्यांच्या ८० वर्षाच्या पत्नी यांची उपस्थितीच प्रेरणादायी होती.साताळकर,कुर्तकोटी आणि पटवर्धन पतीपत्नींची नव्यानेच ओळख होत होती.दिल्लीहून नुकत्याच पुण्यात आलेल्या डॉ.रेखा देशमुख स्वत: समुपदेशक असल्याने मधून मधुन त्यांचे मार्गदर्शन होत होते.असे असले तरी त्यांनाही स्वमदत गटाची गरज वाटत होती.गट छोटा असल्याने प्रत्येकजण मोकळेपणाने बोलत होता..प्रत्येक व्यक्तीच्या पार्किन्सन्सची सुरुवात आणि लक्षणे वेगळी असली तरी पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी पार्किन्सन्सचा स्वीकार,आपला आजार समजून घेणे,त्यानुसार निरीक्षण करून न्यूरॉलॉजिस्टना माहिती देणे व त्यांचे औषधोपचाराचे काम सुकर करणे,औषधाच्या वेळा पाळणे,नियमित व्यायाम, शुभंकराचे सहकार्य, स्वमदत गटात सहभाग हे सर्वांनाच आवश्यक आहे हे अधोरेखित झाले. पद्मजा ताम्हनकर यांनी रामाचे भजन म्हणून गप्पांची रंगत वाढवली.परिचय, टाळ्यांचा आणि जिभेचे व्यायाम या सर्वात दोन तास कसे निघून गेले समजलेच नाहीत.
मधल्या काळात समोर आयता चहा आला.अनेक गोष्टींचे अवधान ठेवण्याची गरज असणाऱ्या आम्हा आयोजकांना.येथे उपस्थित राहण्याशिवाय काहीच करावे लागले नाही.माहेरपण उपभोगल्यासारखे वाटले.
सहकार्याबद्दल आय.पी.एच.च्या कर्मचाऱ्यांचे आभार.
एकूण पहिलीच सभा उत्साहवर्धक होती.