सोमवार दिनांक ११ जून रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने नर्मदा हॉल येथे सभा आयोजित केली होती. बऱ्याच शुभार्थींना पार्किन्सन्सची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपायाबद्दल सांगावयाचे होते.त्यामुळे यावेळी ‘अनुभवांची देवाण घेवाण ‘असा विषय ठेवला होता.सभेस ५० ते ६०जण उपस्थित होते.
सुरुवातीलाच चहापान झाले.वाढदिवसानिमित्त सविता ढमढेरे यांनी चहा,बिस्किटे आणि बर्फी दिली.शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे झाले.त्यानंतर अनुभव कथनाची सुरुवात शेखर बर्वे यांच्यापासून झाली.त्यांनी वाचन आणि अनुभव यावर आधरित विचार मांडले.चालणे,उठाबशा काढणे, वजन उचलणे यांनी मेंदू हेल्दी राहतो, असे एका संशोधन विषयक मासिकाचा आधार घेत सांगितले.डॉक्टर देशपांडे या निसर्गोपचार तज्ज्ञांबरोबर झालेल्या चर्चेनंतर,त्यांनी बर्वे यांना पत्र पाठवले.ते त्यांनी वाचून दाखवले.होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी दोन्ही प्रकारची औषधे घेत असल्यास दोन्ही गोळ्यांमध्ये ४५ मिनिटांचे अंतर ठेवावे, असे स्वानुभवावरून त्यांनी सांगितले.कारण अॅलोपॅथीच्या गोळ्या उत्तेजकता वाढणाऱ्या असतात तर होमिओपॅथीच्या कमी करणाऱ्या..शुभार्थीच्या लक्षणांचे योग्य निरीक्षण करून न्यूरॉलॉजिस्टना सांगितल्यास डोस ठरवणे सोपे जाते.वसुधा बर्वे यांना सकाळी उठल्यावर फ्रीजिंगचा त्रास होत होता.त्यांना संध्याकाळी ७.३० चा डोस बदलून रात्री १०/१०.३० पर्यंत घेण्यासाठी पूर्वी घेत असलेल्या सिंडोपापेक्षा जास्त क्षमतेची गोळी दिली आणि त्रास कमी झाला.बद्धकोष्ठासाठी सहसा रात्री झोपताना गोळी घेतली जाते, त्याऐवजी जेवणाआधी एक तास घेतल्यास चांगला उपयोग होतो असे मत त्यांनी मांडले.वसुधा बर्वे यांनी आपल्याला थोडेसे अंतर चालण्यास खूप वेळ लागतो, पण बर्वे कधीही न चिडता,न कंटाळता त्यांची सोबत करतात असे सांगितले.
अविनाश धर्माधिकारी यांनी फ्रोजन शोल्डरचा त्रास सुरु झाला. हा त्रास पार्किन्सन्समुळे आहे असे निदान होण्यास वेळ लागला, असे सांगितले.बंगलोरच्या विवेकानंद युनिव्हर्सिटीत प्राणायाम,योग,याचे प्रशिक्षण घेतले होते.सध्या ते ३० मिनिटे प्राणायाम करतात. त्यात अनुलोम विलोमवर भर असतो.तीन मिनिटे अकार, उकार आणि मकार करतात.पाच मिनिटे ओंकार करतात, हे कृतीसह सांगितले.यामुळे त्यांचा कंप कमी झाला.लिहिण्याची समस्या आणि कंबर दुखणे चालू आहे.डॉक्टरांनी निम्म्या गोळ्या कमी केल्या.बद्धकोष्ठासाठी रात्री झोपताना बेंबीत २ थेंब एरंडेल घालत असल्याचे सांगितले.
डॉक्टर प्रकाश जावडेकर यांनी गोळ्या कमी करताना बारीक लक्ष ठेवा, सावधपणे कमी करा, असे सुचविले.बऱ्याचवेळा त्याचे उशिरा परिणाम दिसतात, असे सुचविले.आनंदी राहिलात तर औषधांचा परिणाम चांगला होतो असे सांगितले.आपल्याला कशाने आनंद मिळतो ते शोधावे.जावडेकर यांना पेंटीगमध्ये आनंद मिळाला.रंग आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.दोन चार दिवसांनी एनिमा घेतल्याने बद्धकोष्ठाचा त्रास त्यांना होत नाही असे सांगितले.स्वत: लिहिलेल्या पुस्तकातील ‘ देव असलाच पाहिजे ‘ हे सकारात्मक विचार देणारे प्रकरण वाचून दाखवले.
८५ वर्षांच्या यशवंत एकबोटे यांना २००९ पासून पार्किन्सन्स आहे.ते टेबल साफ करणे, भांडी विसळणे, अशी घरातील कामे करतात.यातून समाधान मिळते. तसेच पत्नीला मदत होते.पत्नीही ८० वर्षांची आहे.औषधे नियमित घेतात,व्यायाम,प्राणायाम करतात. २ किलोमीटर चालतात.खुर्चीवरून उठताना, पायऱ्या चढताना त्रास होतो.मागे तोल जातो,गिळताना त्रास होतो.डोळ्यांना दोन दोन गोष्टी दिसतात.झोप येत नाही.या सर्वामुळे नैराश्य येते.अशा काही समस्या असल्याचे सांगितले.
अशा समस्या अनेकांच्या असल्याने त्यावर उपाय सुचविले गेले.शरच्चंद्र पटवर्धन यांनी पीडी नसणाऱ्यांनाही वयामुळे काही समस्या असतात.प्रत्येकवेळी पीडी मुळे होते असे समजून दुसरे काही कारण आहे का हे पाहिले जात नाही.याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे सांगितले.गिळण्याच्या त्रासावर त्यांच्या पत्नीला आयुर्वेदाचा उपयोग झाल्याचे सांगितले.वसुधा बर्वे यांनी नैराश्य जाण्यासाठी संगीत ऐका असे सुचविले. जावडेकर यांनी आपल्याला झोपेचा त्रास होता,तो झोपण्यापूर्वी काहीतरी क्लिष्ट वाचल्याने कमी झाला असे सांगितले.डोळ्यामुळे वाचता येत नाही असे एकबोटे यांनी सांगताच शोभना तीर्थळी यांनी ऑडीओ बुकचा पर्याय सुचविला.उतारवय आणि १० वर्षाचा पीडी असताना एकबोटे व्यवस्थित बोलू शकतात,चालू शकतात,स्मरणशक्ती चांगली आहे, सुसंबद्ध विचार करू शकतात,हेही खूप आहे, असे स्वत:ला समजावल्यास त्रास कमी वाटेल असे सुचविले.
रमेश घुमटकर यांनी आपल्याला ५०व्या वर्षापर्यंत घशात कफ होत असे. अनुलोम विलोमने तो कमी झाला असे सांगितले.चालताना मध्येच पाय भरून येतात, पुढे पाऊल टाकता येत नाही.अशावेळी आपण झाडाला धरून उभे राहतो.डावा, उजवा पाय आळीपाळीने १०/१० वेळा झटकतो. असे दोन तीन वेळा केल्यास पुन्हा चालता येते असे सांगितले.पटवर्धन यांनी असा त्रास होत असल्यास पोटरीला बँडेज बांधून बघण्याचा पर्याय सुचविला.पोलीस,पोस्टमन असे चालण्याचे खूप काम करावे लागणारे असे बँडेज बांधतात असे निरीक्षणही नोंदवले.
सुनील क्षीरसागर हे आपले मित्र शुभार्थी अजित सरदेसाई यांच्यासाठी आले होते.ते पतंजली योग शिक्षक आहेत.त्यांनी पीडी पेशंटने अनुलोम विलोम करावा असे सुचविले. यामुळे व्यान वायूचे संतुलन होऊन हालचालीवर चांगला परिणाम होतो. याचबरोबर भ्रामरी करावी असेही सांगितले.भ्रामरीने सेन्ट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो असे मत व्यक्त केले.
पद्मजा ताम्हणकर यांनी ओंकार व सुर्यकवच म्हटल्याने फायदा होतो असे सांगितले.त्यानंतर त्यांनी ‘मावळत्या दिनकरा’ हे गाणे म्हटले.
साताऱ्याहून आलेल्या उर्मिला इंगळे यांनी ८० वर्षे वय असलेल्या, दीड वर्षे शय्याग्रस्त असलेल्या पतीच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले.दासबोध,मनोबोध आदि ऐकणे, ऐकवणे,नामस्मरण यांच्या सहाय्याने स्वत:चे मनोधैर्य टिकवले आणि पतीलाही जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.
आता वेळ बराच झाला होता, त्यामुळे चर्चा थांबवावी लागली.तज्ज्ञांच्या व्याख्यानाएवढेच असे अनुभव कथन गरजेचे आहे आणि उपयुक्त ठरते असे म्हणावयास हरकत नाही.
टीप – कृपया कोणतेही उपचार करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.