पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या परगावच्या शुभंकर, शुभार्थींच्यापर्यंत पोचण्यासाठी आज वेबसाईट,फेसबुक, whats app, व्हिडीओ कॉन्फरन्स अशी विविध साधने आहेत..सुरुवातीच्या काळात मात्र लिखित साहित्य, फोन,पत्रे, पत्रके याशिवाय साधन नव्हते. फोनवरील संपर्क वन टू वन असायचा.आणि इतर साधने खर्चिक,पोस्टावर अवलंबून राहावे लागत असल्याने.खात्रीलायकही नव्हती.त्यावेळीही पुण्यात आलेल्यावेली भेटणे,सभेला हजर राहणे असे अनेक सदस्य करीत.पण ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याजोगी होती. त्या काळातील आज हयात नसलेल्या अनेकांची आज आठवण येते. प्रत्यक्ष पाहिले नसले तरी जो काही थोडाफार संपर्क झाला त्यातून जवळीक निर्माण होई..त्यातील एक नाव म्हणजे लीलाताई माडीवाले..त्यांच्या तज्ज्ञत्वाच फायदा आम्हाला घेता आला नाही.
११ जुलै २००९ मध्ये सर्व सदस्यांची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले.तेंव्हा परगावच्या सदस्यांनाही प्रश्नावली पाठवली होती अनेकांनी प्रश्नावली भरून पाठवल्या.त्यात लीलाताईंचीही प्रश्नावली होती.नर्सिंग क्षेत्रात त्यांनी ३३ वर्षे काम केले होते.निवृत्तीच्यावेळी त्यांचा हुद्दा प्रिन्सिपल नर्सिंग ऑफिसर होता.याशिवाय त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन विषयात एम.ए.केले होते.नर्सिंगवर त्यांनी मराठीतून पुस्तके लिहिली होती.निवृत्तीनंतरही त्यांचे लेखन वाचन सुरूच होते.मंडळाने पाठवलेली स्मरणिका त्याना पोचली होती.त्यातले लेख त्याना माहितीपूर्ण, प्रेरणादायी वाटले होते.मंडळाने पत्रे पाठवून,फोनवर संपर्कात राहावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती.
त्यांच्या या ओळखीत पत्रकार, प्राध्यापक असलेलेले रत्नागिरीचे माझे विद्यार्थी राजेन्द्रप्रसाद मसुरकर यांच्या भेटीमुळे भर पडली.ते कोणी पार्किन्सन्स पेशंट असल्यास मला कळवत असतात.तसेच त्यांनी लीलाताईंच्याबाबत सांगितले.ते नुकतेच लीलाताईना जुन्नर तालुक्यातील बेल्हे या त्यांच्या गावी भेटून आले होते.खूप प्रभावित झाले होते.त्या पंचाहत्तरीत होत्या.त्यांचे सारे शरीर पार्किन्सन्सने थरथरत होते आणि त्या स्वत:वर विनोद करत सांगत होत्या मी या वयात डान्स करते आहे पहा.स्वत:च्या अवस्थेबद्दल कोठेही रडगाणे न गाता त्या छान गप्पा मारत होत्या.कंपामुळे लिहिणे शक्य नसले तरी भावाला लेखनिक बनवून पुस्तके लिहित होत्या.मसुरकर यांनी २९ जुलै २०१० च्या तरुण भारतमध्ये त्यांच्यावर लेख लिहिला होता त्यातून बरीच माहिती समजली.
लीलाताईनी नर्सिंगचा कोर्स केला होता तसा नर्सिंग टीचर डीप्लोमाही केला होता.अलिबाग,रत्नागिरी,कोल्हापूर येथे त्यांनी काम केले.फक्त कामापुरते काम अशी त्यांची वृत्ती नव्हती.एक शिक्षिका म्हणून त्याना प्रशिक्षणार्थीना भाषेची अडचण येते हे लक्षात आले.त्यांनी मराठीतून नर्सची कामे,जबाबदाऱ्या,दिनचर्या यावर लिहिले.खेडेगावातील स्त्रियांनाही पुस्तके उपयुक्त ठरतील हे लक्षात घेऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शरीरस्त्रावर पुस्तक लिहिले.सहज सोपी भाषा आणि भरपूर आकृत्या यामुळे पुस्तके लोकप्रिय झाली.
आजूबाजूला समस्या दिसल्या की त्यावर त्या लगेच उपाय शोधत.त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचार्यांना साधा रजेचा अर्जही लिहिता येत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी कर्मचार्यांच्या दैनंदिन गरजांवर पुस्तक लिहिली.त्यांच्या नर्सिंगवरील पुस्तकांची गुजराथीत भाषांतरे झाली.
आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देण्याचे काम त्या करत.रत्नागिरीत असताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या तरुणाला अर्धवट सोडलेले कॉलेज शिक्षण पूर्ण करायला लावले.त्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत:ही एम.ए.चा अभ्यास केला. व्याकरणावरही एक पुस्तक लिहिले.हे एक उदाहरण असे अनेकांचे जीवन त्यांनी मार्गी लावले.
त्यांच्या कर्तुत्वाची दखल सरकारनेही घेतली.महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या त्या सदास्य झाल्या.सुश्रुषा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.पेशंट आणि उपचारक यांच्या नात्यात संवादाचे महत्व त्या जाणत होत्या. ते कमी होत आहे याची त्याना खंत होती.पण निराश न होता ही गरज पटवण्याचा त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला.निवृत्तीनंतरही पार्किन्सन्स आजाराला तोंड देत लेकानकाम चालूच ठेवले.
आम्ही परगावच्या सदस्यांशी संपर्क ठेवण्यात कमीच पडलो.लीलाताईंच्या तज्ज्ञत्वाच फायदा आम्हाला घेता आला नाही याची हळहळ वाटते.