पार्किन्सन्सने मला नाचविले – गोपाळ तीर्थळी

Date:

Share post:

tirthali_g

(गुरुपोर्णिमा कार्यक्रमात छोटीशी नृत्य झलक दाखविताना डावीकडून दुसरे )

पार्किन्सन्सनी मला नाचविले,सुरुवातीला उपचाराच्यामागे आणि आता आनंद देणारी कला शिकवून.पार्किन्सन्स आयुष्यात पाहिल्यांदा आला तो इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षी इंजिनीअरिंग ड्रॉइंग शिकत असताना त्या विषयाचा लेखक म्हणून.त्याच्या आधारे मी आयुष्यात मोठ्ठा झालो.त्यांनी पोट भरण्याचा मार्ग दाखविला.आणि दुसर्‍यांदा साठीच्या आसपास आला तो आजार बनून.

सप्टेंबर १९९९ मध्ये न्युरॉलॉजिस्टनी पार्किन्सन्सचे निदान केले.आणि सुरुवातीची अवस्था आहे.अ‍ॅलोपाथीची औषधे इतक्यात घेण्याची गरज नाही असे सांगितले.मग होमिओपथिक,आयुर्वेदिक असे चालू ठेवले.योगासने,प्राणायाम हे करायला सुरुवात केली.या काळात सुरुवातीला हाताला कंप,डाव्या पायाने फरफटत चालणे,बोलताना येणारा थकवा,बोलताना अडखळणारी जीभ असे शरीरावर परिणाम झाले होते.

सन २०००ते २००५ पर्यंत आयुष्यात कधी न भेटलेली माणसे भेटली.प्रत्येकजण आपल्या तोकड्या अनुभवाचा सल्ला देत होता.त्यामध्ये एक वैदू ज्याने एका महिन्यात २२००० रुपयांना गंडा घातला,कोणी ज्योतिषाचा मार्ग दाखवून यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो का पहाण्याचा सल्ला दिला. अ‍ॅक्युप्रेशर्,नॅचरोपथी,मालिश,मॅग्नेटिक थेरपी काय काय म्हणून सांगू.यात आणखी एक भर म्हणजे अ‍ॅक्युपंक्चर.एप्रिल २००४ पासून अडीच वर्षे हे सर्व उपचार झाले.सुरुवातीला तीन तास,नंतर एक तास असे उपचार देणारे अ‍ॅलोपाथीचे डॉक्टर होते.परंतु अ‍ॅलोपाथीच्या औषधाचे परिणाम घातक असतात असे त्यांचे म्हणणे होते.अशातच आमचे कौटुंबिक डॉक्टर मित्र भेटले.व ते माझ्यावर रागावलेच आणि अ‍ॅलोपाथीची औषधे सुरु करा असा सल्ला दिला.त्यांनी न्युरॉलॉजिस्टची अपॉइंट्मेंटही घेतली.अ‍ॅक्युपंक्चरवाल्या डॉक्टरांचा विरोध न जुमानाता २००५ मध्ये अ‍ॅलोपाथीची ट्रीट्मेंट सुरु झाली.

२००७ च्या मध्यावर प्रज्योत नावाच्या मासिकातून पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुपची माहिती समजली.त्यांचे संस्थापक सदस्य श्री मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन आहेत असे समजले.ज्या दिवशी वाचनात आले त्याच दिवशी त्यांच्याशी संपर्क साधला आणि घरी गेलो.आमच्या पुनःपुन्हा भेटी होत राहिल्या.पार्किन्सन्ससह आनंदी जगण्याचा धागा मिळाला.मीही नकळत सपोर्ट ग्रुपच्या कामात जोडला गेलो.

११ एप्रिल २००८च्या दि टाईम्स ऑफ इंडियाच्या अंकात’ Dancing away the Disease’ असा लेख जागतिक .पार्किन्सन्स दिनानिमित्त छापून आला होता.त्यात ‘नृत्य प्रेरणा’च्या सुचित्रा दाते यांच्या प्रयोगाबद्दल माहिती दिली होती.भरतनाट्यमचा त्या .पार्किन्सन्सवर थेरपी म्हणून उपयोग करत होत्या.त्या मोफत शिकवायला तयार असूनही फारसा प्रतिसाद मिळत नव्हता असे म्हटले होते.कोणत्या वयात काय शिकायचे या सामजिक बंधनामुळे हे होते असे त्याना वाटत होते.श्री व सौ शेंडेनी त्यांच्याशी संपर्क साधला.आणि आम्ही काही जणांनी त्या प्रयोगात सामील व्हायचे ठरविले.

दर शुक्रवारी नृत्य वर्ग सुरु झाला.या वयात काय शिकायचे अशी लाज न वाटण्याचे कारण माझ्या मते १९९८ मध्ये ‘सिद्ध समाधी योग ‘शिकताना झालेले संस्कार; मी कोणी तरी आहे हे विसरण्याचे शिक्षण तिथल्या शिबिरात शिकताना मिळालेले होते.आणि ते नोकरीत,कुटुंबात,समाजात वावरताना सगळीकडेच उपयोगी पडले.

शुक्रवारच्या क्लास मध्ये माझ्या नातवंडांच्या वयाच्या मुली असायच्या; आम्ही शिकताना पाहून त्याना मजा वाटायची.त्या कौतुकाने मदत करायच्या.आडाव,अभिनय,मुद्रा असे काहीकाही शिकत होतो.गुरुपोर्णिमेच्या कार्यक्रमात छोटीशी नृत्य झलक दाखविली.आपापल्या मुलांचे कौतुक पाहण्यास आलेल्या पालकाना खूप कौतुक वाटले.आमचे नृत्य फार चांगले झाले होते असे नाही.पण नर्सरीच्या छोट्या मुलांच्या चुकतमाकत केलेल्या नाचगाण्यांचे कौतुक जसे होते तसेच होते ते.पूर्वी कामाच्या व्यापात माझ्या मुलींच्या संमेलानालाही कधी गेलो नव्हतो.पण आता मात्र इतर विद्यार्थीनिंचे अरंगेत्रम पाहण्यासाठी विद्यार्थी म्हणून जाऊ लागलो.दाते मॅडम जीव तोडून शिकवत होत्या पण आम्ही मात्र नेटाने शिकत नव्हतो.

कोणत्याही कलेला सराव महत्वाचा पण तो आम्ही करत नव्हतो.मध्यंतरी कुलकर्णी पतीपत्नी अमेरिकेला गेले नंतर शेंडे पतीपत्नी अमेरिकेला गेले.माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन्स झाली.अशा काहीना काही कारणांनी क्लास बुडायाचा पण दाते मॅडमनी नाद सोडला नाही.त्यांच्यातील शिक्षिकेनी आम्हाला प्रवृत्त करण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले.अस्मिता पवारला आमच्यावर देखरेखीसाठी नेमले.ती रोज गप्पा मारत मारत सराव चालू आहे ना याची माहिती घेऊन नोंदी ठेवी.त्यांनी दुसरे असे केले स्वतंत्र क्लास न घेता सर्वांच्या बरोबर क्लास घेणे सुरु केले.त्यामुळे आम्ही कुठे आहोत हे समजू लागले.

पार्किन्सन्सने चेहरा भावविहीन होतो असे सांगितले जाते प्रत्य्क्षात अनुभवलेही.चेहर्‍याचे स्नायू ताठ झाल्याने हे होते.मी बोलणारा कमी.पण माझा राग,आंनद,कौतुक, कंटाळा हे चेहर्‍यावरून समजायचे.पार्किन्सन्समुळे हे बंद झाले होते.नृत्यामाधल्या व्यायामानी आणि अभिनायांनी चेहर्‍यावरची ताठरता कमी होऊ शकते.आता न बोलता माझा राग बायकोला समजतो,काही आवडले नाही म्हणून नाराजी किंवा आवडल्याबद्दलचे कौतुक इतराना समजू शकते.वेगवेगळ्या हालचाली आणि त्यांचे बदलते वेग यांची सांगड घालणे आता थोड थोड जमायला लागल आहे.मुद्रांच्या सरावामुळे वेगवेगळ्या हालचाली सुलभ होऊ लागल्या आहेत.

अ‍ॅलोपाथीच्या औषधा व्यतिरिक्त इतर जे काही करतो ते सर्व पूरकच आहे.ज्या प्रकारात आपल्याला आनंद मिळतो तेच करावे तरच त्याचे दृश्य परिणाम मिळतात.नृत्यामध्ये नुरोबिकचा वाटाही आहे.माझ्या मते नृत्याबरोबर ओंकाराचे शास्त्रशुद्ध शिक्षण,रामरक्षा सारखी स्तोत्रे,हास्यक्लब,प्राणायाम आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाचे मार्गदर्शन व आधार या सर्वामुळे मी पार्किन्सन्सग्रस्त असूनही आनंदात राहू शकतो.लाजभीड सोडून इतर पार्किन्सन्स ग्रस्तानीही नृत्योपाचारात सामील व्हावे आणि नृत्यातून मिळणारा आनंद लुटावा.

(गोपाळ तीर्थळी हे पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारिणीचे अनेक वर्षे सदस्य आहेत.ते शुभार्थी आहेत तसेच अनेक शुभार्थींसाठी शुभंकरही.पार्किन्सनन्स झाल्यावर नाकारणे, भीती,चुकीचे उपचार आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या परिचयानंतर यथार्थ ज्ञानातून स्वीकार आणि मैत्री.असा त्यांचा प्रवास झाला.शुभार्थींची यथार्थ ज्ञानातून स्वीकार ही अवस्था लवकर येण्यासाठी धडपड हे मिशन मानून कार्यरत. सदर लेख ११ एप्रिल २०१० च्या पार्किन्सन्स दिनादिवशी प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतील आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

What is Parkinson’s Disease?

Parkinsons Disease is a disease of the brain when certain cells of the brain loose their function which...

पार्किन्सन्स मित्रमंडळ स्मरणिका २०२४

येथून डाऊनलोड करता येईल स्मरणिका २०२४Download

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   'झपूर्झा '...

विविध गुणदर्शन – ५ नोव्हेंबर २०२३

५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा...