Saturday, December 21, 2024
HomeArticlesपार्किन्सन्स डीसीज : जीवनशैली - डॉक्टर ह.वि.सरदेसाई

पार्किन्सन्स डीसीज : जीवनशैली – डॉक्टर ह.वि.सरदेसाई

HVS

पार्किन्सन्स डीसीज हा मेंदूतील सबस्टान्शिया नायग्रा नावाच्या भागातील पेशींची संख्या (आणि कार्य )कमी झाल्याने होणारा आजार आहे.या पेशींचे प्रमुख कार्य डोपामिन नावाचा रासायनिक रेणू तयार करणे,हे होय.आपल्या हालचालीतील सुबकता,डौल,आणि सफाई या रेणूमुळे प्राप्त होते.या रेणूच्या अभावामुळे कंप सुटतो,हालचाली संथावतात,स्नायू ताठर होतात.या आजारावर,आजार पूर्णपणे बारा होईल अशी औषधे आजपर्यंत सापडलेली नाहीत.त्यामुळे रुग्णाच्या जीवनशैलीत बुद्धिपुरस्सर बदल करण्याने विकाराला सामोरे जाणे सुलभ होते.जिवन्शिलिचा विचार प्रामुख्याने चार अंगानी केला जातो.आपला आहार आणि आपले विहार,आपले आचार आणि आपले विचार, थोडक्यात आपले सारे व्यवहार आपली जीवनशैली ठरवितात.पार्किन्सन्स डीसीज झालेल्या रुग्णांनी आपापले आहार,विहार,आचार आणि विचार कसे ठेवावे हे आता पाहू या.

आहार – पार्किन्सन्स रुग्णाचे वजन कमी होते,त्याना बद्धकोष्ठता येते,लाळ जास्त सुटते,या त्रासातून मोकळे होण्याच्या दृष्टीनेपुरेसे उष्मांक,भरपूर तंतू,पुरेशी जीवनसत्वे,थोडे आणि वारंवार खाणे इष्ट होईल.या करता त्यांनी हातसडीचा तांदूळ,ज्वारी,बाजरी,नाचणी,वरई अशी धान्ये सेवावीत.मोड आलेल्या कडधान्यांचे कढण प्यावे.अधमुरे दही सेवावे,केळी,पपई,चिक्कू,सफरचंद,कलिंगड,आंबा,पेरू,अशी फळेखावीत.ताज्या भाज्यांचे सूप प्यावे.या रुग्णांना झोपेच्या समस्या असतात.त्यामुळेचहा ,कॉफी अशी उत्तेजक पेये टाळावीत.पार्किन्सन्स डीसीज असणार्‍या व्यक्तींचा तोल जाऊन पडण्याची शक्यता असते.याकरता मद्यपान किंवा झोपेची औषधे घेणे टाळावे.हा आजार सहसा प्रौढ व वयस्कर व्यक्तीना होतो,या वयात रोहिणी काठीण्याचा विकार अनेकाना जडतो म्हणून तंबाखूचे सेवन कटाक्षाने टाळावे.

विहार – म्हणजे हालचाल आणि विश्रांती.स्नायू ताठर होतात.व हालचाल मंदावते.याला उपाय म्हणजे सतत स्नायूंचे कार्य करीत राहणे.एकाच जागी बसून राहण्याने हे जडत्व वाढते.लहान लहान कामे करीत राहणे इष्ट होय.कामातील सफाई वाढावी या हेतूने वर्तमानपत्रांची घडी करणे,पुस्तके व्यवस्थित लावणे,पादत्राणे जाग्यावर नीट लावणे,कपड्याना इस्त्री करणे असे कमी श्रमाचे काम करीत राहावे.एकट्याने रस्त्यावर फिरू नये.कारण समोरून वाहन आल्याचे कळले तरी चटकन बाजूला होणे जमणार नाही.रस्त्यावर चालण्याऐवजी व्हरांड्यात किंवा गच्चीवर चालण्याने खाचखळग्यांचा त्रासही चुकेल.या रुग्णांनी लहान टॉवेलवजा रुमाल सदैव बरोबर ठेवला पाहिजे.कारण तोंडातून लाळ सुटत राहते.ती पुसावी लागते.स्नायुंच्या अकार्यक्षमतेमुळेथकवा लवकर येतो.यासाठी अतिश्रम टाळावेत.या आजारात १५ ते २० टक्के रुग्णांनाविस्मृतीहोते.या करता आपले नाव पता लिहिलेले कार्ड ठेवावे.

आचार – कोणतेही काम करण्यापूर्वी आता आपण काय करणार आहोत याची योजना तयार करावी.काम करण्याचा वेळ जास्त लागेल याचे भान ठेवावे.पार्किन्सन्स डीसीज झालेल्या व्यक्तींच्या चेहर्‍यावर हावभाव उमटत नाहीत.त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते.आपल्या सर्व संबंधिताना आपल्या आजाराची कल्पना देण्याने हा गैरसमज टळेल.गीळण्याचे स्नायू अकार्यक्षम झाल्याने उचकी लागते,खाणेपिणे सावकाश व्हावे.तोंडात घेतलेला घास पूर्णपणे पोटात गेल्याखेरीच दुसरा घास घेण्याची घाई करू नये.उठणे, बसने,चालणे या क्रिया देखील दुसर्‍या व्यक्तीच्या मदतीशिवाय होणे कठीण,याची जाणीव असावी.तोल सांभाळण्यात येणार्‍या अडचणीमुळे पडण्याचा धोका असतो याचा विसर पडू देऊ नये.

विचार – अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असल्यामुळे भवितव्याची चिंता व सद्यपरिस्थितीमुळे खिन्नता येणे स्वाभाविक आहे.आपले प्रश्न समजाऊन घेणे,त्यांची उत्तरे समजाऊन घेणे,आपल्या समस्यांबद्दल आपल्या स्नेही -सोबती यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणे,चांगला छंद जोपासणे,धार्मिक कार्यात गुंतवून घेणे अशा मुळे मनाचे स्वास्थ्य टिकेल.

सारांशाने,पार्किन्सन्स डिसीज या आजाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णानेआपल्या औषधांच्या जोडीला आपल्या आहार,विहार,आचार,विचार इकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.आजारामुळे येणार्‍या दैनंदिन जीवनातील त्रुटी समजाऊन घेणे व त्यावर मार्ग योजून ठेवणे हा पार्किन्सन्स डिसीजवर मात करण्याचा प्रभावी मार्ग आहे.

डॉ. ह.वि.सरदेसाई यांच्या भाषणाची चित्रफित येथे पाहायला मिळेल.

(डॉक्टर ह.वि.सरदेसाई परिचय : डॉक्टर ह.वि.सरदेसाई हे नाव ४०/५० वर्षे प्रसिद्धीच्या झोतात आहे.५० वर्षापेक्षा जास्त काळ वैद्यकीय संवादातून परिचित आहेत.अचूक निदान,उच्चदर्जाचे विचार,बोलण्यातून मिळणारा दिलासा ही त्यांची वैशिष्टे.मात्र याबरोबर ते पेशंटला जीवनशैलीतील बदलाबद्दल आग्रहाने सांगतात.अनेक वैद्यकीय,शैक्षणिक संस्थांचे ते पदाधिकारी,सल्लागार,आधारस्तंभ बनले.बी.जे.मेडिकलमधली त्यांची कारकीर्द उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजली.त्यांना विविध पुरस्कार मिळाले.पुण्यभूषण पुरस्कार त्यातील एक.वैद्यकीय व्यवसायाबरोबर त्यांनी विपुल लेखनही केले.’घरोघरी ज्ञानेश्वर’,’जीवनशैली’ या त्यांच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या.’आहार व आरोग्य’ या त्यांच्या पुस्तकास साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला.सकाळ समुहाचे फॅमिली डॉक्टर,विविध मासिके,वृत्तपत्रे यातून ८० वर्षे ओलांडली तरी ते अव्याहत लेखन करीत आहेत..तांत्रिक जंजाळात न अडकता सर्वसामान्याना समजेल अशा सोप्या भाषेत ते लिहितात.लेखन, भाषणे यातून’ शहाणे करून सोडावे सकलजन’ हे ब्रीदवाक्य त्यांनी जपले आहे.११ एप्रिल २०१० या वर्षी पार्किन्सन्सदिनी प्रकाशित केलेल्या स्मरणिकेतील सदर लेख त्यांच्या परवानगीने येथे देत आहोत)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क