सोमवार दिनांक १४ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.
आहारतज्ज्ञ मालविका करकरे यांचे ‘आरोग्यासाठी आरोग्यदायी आहार ‘या विषयावर व्याख्यान झाले.सभेला ४०/५० सदस्य उपस्थित होते.आता मासिक सभा या कौटुंबिक मेळावा बनत आहेत.नेहमी उपस्थित राहणारे पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरेच दिवस न आलेले शुभार्थी आलेले पाहून सर्वांनाच आनंद होतो.प्रज्ञा जोशी, आठ महिन्यांनंतर आणि नर्मदा हॉल मध्ये प्रथमच येत होती.वसुधा बर्वे यांना पाऊल उचलून टाकता येत नव्हते त्यामुळे त्या वार्षिक मेळाव्यालाही हजर राहू शकल्या नव्हत्या.आत शिरतानाच मला म्हणाल्या की पाहिलंत का मी आता काही आधार न घेता चालू शकतेय. मोरेश्वर काशीकर प्रार्थना सांगायच्या तयारीने आले होते.डॉक्टर अरविंद पाटील आणि संध्या पाटील सर्वांना भेटण्याच्या इच्छेने खास नाशिकहून आले होते.सभेत व्याख्यानातून ज्ञान मिळते आणि अशा आनंदी वातावरणातून सकारात्मक ऊर्जा मिळते.व्याख्यात्या मालविका करकरे यांनीही व्याख्यानाच्या सुरुवातीला मला येथे येवून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.
यानंतर काही महत्वाच्या टीप्स त्यांनी दिल्या.
– लीओडोपा आणि प्रोटीन असलेले अन्न एकत्र घेऊ नये.
– गोळ्या जेवणाआधी किंवा नंतर,गोळ्यांचे प्रमाण,वेळ हे डॉक्टर लिहून देतात ते तंतोतंत पाळावे.
– अन्न नको होते अशा वेळी कर्बोदके असलेल्या गोष्टी थोड्या थोड्या वेळाने घ्याव्यात.
– बऱ्याचजणांना गिळण्याची समस्या असते.त्यामुळे कमीत कमी १३०० कॅलरीची रोज आवश्यकता असते ती पुरी होत नाही.अशावेळी अॅनिमिया,डी व्हिटॅमीन आणि कॅल्शियम कमतरता होऊ शकते.यासाठी लिक्विड डाएट,सेमी लिक्विड डाएट ३/४ वेळा घेणे गरजेचे.
– शरीराची गरज ऐकावी.भूक लागल्यावर खावे.
– पार्किन्सन्समध्ये क्रॅम्प्सची समस्या असते.यासाठी पोटॅशियम,क्षार असणारे नारळ पाणी, लिंबू पाणी,कोकम सरबत असे पदार्थ घ्यावे.
– लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी काळा गुळ,बाजरी,मूळ्याचा,फ्लॉवरचा पाला,पुदिना यांचा वापर हवा.सी व्हिटॅमीन हे अन्न पदार्थाचे शोषण होण्यासाठी गरजेचे असते.यासाठी लिंबू वर्गीय फळे आहारात असावीत.लोखंडी कढई वापरावी.
– अंगदुखी,पायदुखी हे कॅल्शियमच्या कमतरतेने होतात.ही कमतरता भरून काढण्यासाठी दुध,दही ताक,पालेभाज्या ,नाचणीचे विविध पदार्थ खावेत.
– अॅसिडीटी असल्यास तळलेले,तिखट,मसालेदार पदार्थ टाळावेत.पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरू नये,उपास टाळावेत.पाचक,कोकम सरबत,गुलकंद,तुळशी बी,सब्जा यांचा आहारात समावेश करावा.
– पार्किन्सन्सच्या पेशंटना बध्दकोष्ठ्तेचा त्रास होतो.यासाठी पाणी,फायबरयुक्त पदार्थ आणि व्यायाम आवश्यक.
यानंतर बाहेरचे तयार पदार्थ न खाता त्याला घरगुती पर्यायी पदार्थ काय खावेत याचा तक्ता त्यांनी दाखवला. श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.यात डॉक्टर अमित करकरेही सहभागी झाले.
यानंतर शोभना तीर्थळी यांनी सभा यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. अरुंधती जोशी यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त चहा दिला.मोरेश्वर काशीकर यांनी बिस्किटे दिली.