Thursday, November 21, 2024
Homeसहल२१ नोव्हेंबर २०१८ - घाडगे बोटॅनिकल गार्डन सहल - शोभनाताई

२१ नोव्हेंबर २०१८ – घाडगे बोटॅनिकल गार्डन सहल – शोभनाताई

दरवर्षी नोव्हेंबर,डिसेंबरच्या दरम्यान पार्किन्सन्स मंडळाची सहल असते.यावर्षी २१ नोव्हेंबरला होती. नेमेची येणारा पाऊस नेम बदलून  पुण्यात २० नोव्हेंबरला अचानक कोसळला. आणि उद्या सहल जाऊ शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.हवामानाच्या भविष्यावर हवाला ठेऊन आम्ही सर्वांना आपली सहल ठरल्याप्रमाणे जाणार असा भरोसा दिला.यावेळी प्रथमच नर्मदा हॉलकडे जमायचे होते.प्रभातरोडला बस थांबवता येत नाही, कमिशनरची परवानगी घ्यावी लागते.आशा रेवणकर परवानगीसाठी गेल्या आणि दिलासादायक अनुभव घेऊन परवानगीसह परत आल्या.कमिशनरनी अगत्याने स्वागत केले.त्यांना आमच्या गटाबद्दल माहित होते.परवानगीबरोबर त्या भागात  ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांना तेथे थांबायला सांगतो असेही त्यांनी  सांगितले.
साडे आठला सर्वांना बोलावले होते.तरी आठपासूनच मंडळीं यायला सुरुवात झाली. चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद आणि उत्सुकता होती..नर्मदाच्या पारावर आलेली मंडळी स्थानापन्न होत होती.काही उभ्याउभ्याच गप्पा मारत होती..बस उभीच होती.आलेल्या व्यक्तींना नावाचा बिल्ला देवून लगेच बसमध्ये बसवणे,पैसे भरून घेणे,जे अजून आले नाहीत त्यांना फोन करणे,अशी  उमा दामले,अरुंधती जोशी,दीपा होनप,अंजली महाजन,वसू देसाई, आशा रेवणकर,सविता ढमढेरे यांची लगबग चालू होती. बसमध्ये चढण्यासाठी आणलेले स्टूल लहान पडत होते. नर्मदाच्या कुलकर्णी यांच्याकडून मोट्ठे स्टूल  आणले. नर्मदा हॉलही आमच्यासाठी उघडून ठेवला होता.त्यांची आमच्या कामात खूपच मदत होते.
अंजलीने हजेरी घेतली आणि ९ वाजून १० मिनिटांनी बस निघाली.अनेकदा सहलीत पुढे जागा मिळवण्यासाठी धडपड,भांडाभांडी आढळते.आम्हाला मात्र इतक्या सहली झाल्या पण असा एकही अनुभव आला नाही.सर्वाना न्याहारीसाठी ठेपले आणि चटणी देण्यात आली.अरुंधतीने नात झाल्याबद्दल बर्फी दिली.ओरिगामीसाठी कागद देण्यात आले. नेहमीप्रमाणे शरच्चंद्र पटवर्धन यांनी चौकोनी कागद कापून आणले होते.नंतर शिकवल्या जाणाऱ्या क्विलीन्गचे साहित्यही त्यांनी आणले होते.चहा घेणारे किती, कॉफी घेणारे किती आणि बिनसाखरेचा घेणारे किती याची मोजदाद होऊन घाडगे गार्डनला ऑर्डर गेली.
घाडगे गार्डन जवळच असल्याने लगेचच पोचलो.डोंगराच्या कुशीतले निसर्गरम्य ठिकाण आहे. पोचल्या पोचल्या चहा  तयारच होता.वसूने श्रुजबेरी बिस्किटे आणली होती.आमच्याप्रमाणेच एका शाळेची २५० मुले तेथे आली होती.मनोहारी निसर्गाबरोबर त्यांचे बागडणेही आनंददायी वाटत होते.आमचेही खेळणे, बागडणे सुरु झाले.व्यवधान वाढवणारा,सर्व सहभागी होतील असा इडली डोसा खेळ झाला.तेथेच असलेल्या जादुगार कोहीनुरच्या  जादूच्या  प्रयोगानी आणि त्याबरोबरच्या चटपटीत बोलण्याने निर्भेळ करमणूक झाली.
          यावर्षी प्रथमच आलेल्या उल्हास बापट यांनी सन डायल या स्वत: प्रयोग करून तयार केलेल्या साधनाचे प्रात्यक्षिक दाखवले.हे साधन सूर्याच्या दिशेनुसार वेळ दाखवते.यानंतर बसल्याबसल्या सर्वात जास्त एक रुपयाची नाणी कोणाकडे आहेत,किल्ल्या कोणाकडे आणि डेबिट, क्रेडीट कार्ड कोणाकडे आहेत, असा छोटा खेळ घेण्यात आला.जोत्स्ना सुभेदार यांच्याकडे १७ नाणी,रेखा आचार्यकडे १३ किल्ल्या आणि मधुकर तांदळे यांच्याकडे ४ कार्डस् निघाली.अशा छोट्या खेळात सर्व सहभागी होऊ शकतात.सर्वांनीच याचा आनंद घेतला. 
                                      
              जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात विजय देवधर यांच्या क्विलिंगचे डॉक्टर लुकतुके यांनी खूपच कौतुक केले होते.सर्वाना ते शिकण्याची इच्छा होती.यातून एकाग्रता,मोटर स्कील वाढणे,नैराश्य कमी होणे असे अनेक फायदे असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले आणि प्रात्यक्षिकास सुरुवात झाली.देवधर यांनी काही प्राथमिक भाग शिकवला.सर्वच शुभंकर, शुभार्थी यात सहभागी झाले.सर्वांच्या ओरिगामीच्या कृतीही करून झाल्या होत्या.विजय देवधर आणि शरच्चंद्र पटवर्धन या परीक्षकांनी त्यातून निवड केली.लगेच बक्षिसेही देण्यात आली.आशा रेवणकर प्रथम,रेखा आचार्य द्वितीय आणि नंदा चीद्दरवार,केशव महाजन यांना तृतीय क्रमांक विभागून मिळाला.डॉक्टर जावडेकर यांच्या स्केचलाही बक्षीस देण्यात आले.           सर्वांनाच आता आजूबाजूची हिरवळ, धबधबा,धबधब्यात मनसोक्त डुंबणारी मुले खुणावत होती. एक वाजेपर्यंत जेवण तयार होणार होते. तोवर काहीजण भोवतालचा निसर्ग पाहण्यास गेले.एक दोघांनी तेथे असलेल्या बाजांवर झोपणे पसंत केले.काही तेथेच गप्पा मारत बसले.सगळ्यांना एकपर्यंत गोळा करून आणण्यासाठी  विद्यार्थी सहाय्यक समीतीचा गिरीश कुलकर्णी हा तरुण विद्यार्थी आमच्याबरोबर होता.व्हिडीओ,फोटो काढणे,शुभार्थीना आधार देणे अशा विविध कामात त्याची मदत होत होती. 

         जेवणात पिठलं भाकरी, चायनीज,गुलाबजाम,शिरा,पुरी,पावभाजी  अशी विविधता होती. जेवणानंतर सर्वजण हॉलमध्ये जमले.सुरुवातीला वाढदिवस साजरे करून हास्याचा फुगा फोडण्यात आला. वसू देसाईनी प्रश्नमंजुषा तयार करून आणली होती. सर्वांना ते कागद वाटण्यात आले.दिलेल्या वेळानंतर कागद गोळा करण्यात आले.कोणाचे  किती बरोबर आहे पाहून नंबर लावण्यात आले.उन्नत्ती क्षीरसागर,उमा दामले,सुनिता चाफळकर यांनी यात प्राविण्य मिळवले. 

        नंतर  करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.माईकनी संप पुकारला. मग जवळ खुर्च्या घेऊन माईकशिवायच कार्यक्रम झाला.पार्किन्सन्सशी सामना करणाऱ्या शुभंकर, शुभार्थीना अशा छोट्या मोठ्या समस्यांना तोंड देणे सहज शक्य होते.जोत्स्ना सुभेदार यांच्या गणपती पंचरत्नने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर शोभना तीर्थळी यांनी सर्वांनी एकत्रित गावून म्हणायचा ‘सखू गेली पाण्याला’ हा खेळ घेतला.सखुला वेगवेगळे लोक भेटतात आणि हावभावासह गाणी म्हणतात.यात अरुण सुर्वे ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’,दीपा,आशा,सविता,वसू इ.नी ‘सुहाना सफर’,कुर्तकोटी पती पत्नींनी ‘तेरी प्यारी प्यारी सुरतको’, सुभेदार पती पत्नींनी ‘माळ्याच्या मळ्यामध्ये’, देसाई पती पत्नींनी ‘मेरा साया साथ होगा’,डॉक्टर जावडेकर यांनी ‘मानसीचा चित्रकार तो’अशी गाणी म्हटली.सर्वांसाठी गाणी तयार होती पण उशीर होत होता म्हणून सखुची साथ सोडावी लागली.

         सूत्र संचालनासाठी अंजलीने सूत्रे हातात घेतली.शोभना आणि सवितानी ‘गार डोंगराची हवा’ हे गाणे सर्वांसह म्हटले.सरोजिनी कुर्तकोटी यांनी पुलंचे विनोद सांगितले,पद्मजा ताम्हणकर विजया मोघे,श्रीमती अंतुरकर, शुभदा गिजरे यांनी भक्ती गीते म्हटली,विजया दिवाणेनी ‘चौदहविका चांद’,उन्नत्ती क्षीरसागरनी ‘तू बुद्धि दे’ ही प्रार्थना म्हटली.अंजली महाजननी स्वरचित कविता म्हटली.केशवराव महाजन यांनी ‘रहा गर्दीशोमे हरदम’ हे गीत म्हटले.डॉक्टर जावडेकर यांनी लहानपणीची आठवण सांगितली.उल्हास बापट यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात राजीव गांधी यांच्याबरोबर घडलेली थरारक आठवण सांगितली.
         कार्यक्रम चालू असताना  चहा बिस्कीटे आली आणि कार्यक्रमात रमलेल्या सर्वाना वेळेचे भान आले. शेवटी सर्वांनी सैराटच्या गाण्यावर नाचायचे ठरले होते.ते तर व्हायलाच हवे होते आणि झालेही.पटवर्धन,करमरकर हे पंच्याहत्तरी ओलांडलेले तरुण रिंगणात आल्यावर सर्वांनाच स्फूर्ती मिळाली.
        सर्वांचा एकत्रित फोटो झाला आणि पुढच्या सहलीची स्वप्ने पाहत,अनेक दिवसांसाठी उर्जा घेऊन मंडळी जड पावलाने परतली.जावडेकर म्हणाले, प्रत्येक दोन महिन्यांनी सहल निघायला हवी.
         यावेळी सहलीचे आयोजन करताना कार्यकारिणीतील कोणीतरी म्हणाले, पुढच्या वर्षीपासून  सहल नको.खूप टेन्शन येते.सह्लीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून आपलेच विधान विसरायला होते आणि पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे ‘ताण हवासा’ असेच म्हणावे लागेल. 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क