एके दिवशी मी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शाळेत जात होते.तेवढ्यात मागून एक ट्रक वेगाने हाॅनॆ वाजवित आला आणि वेगाने पुढे गेला .हाॅनॆ जोरात वाजल्यामुळे मी ट्रक वर नजर टाकली तेव्हा ट्रकच्या मागे ठळक अक्षरात लिहिले होते “गोड बोलण्याने आपण जग जिंकू शकतो”. तेवढ्यात मी ते वाक्य वाचले . आणि काही क्षणात ट्रक भरधाव वेगाने निघून गेला .जे काम करायला मी दुचाकीवरून निघाले होते ते काम पूर्ण करून काही वेळातच मी घरी आले.तर हे जेवण करून दुपारचा पार्किन्सन्स गोळ्यांचा डोस घेऊन झोपी गेले होते.
मी पण जेवण केले . आणि चाळण्यासाठी म्हणून टेबलावरचे एक पुस्तक घेतले पण का कोणास ठाऊक माझे वाचनात अजिबात लक्ष लागत नव्हतं.माझ्या डोळ्यासमोर एक सारखं ट्रकच्या मागे लिहिलेले वाक्य “गोड बोलण्याने आपण जग जिंकू शकतो “हे येत होतं . आणि माझं मन म्हणत होते जर गोड बोलण्यानी आपण जग जिंकू शकतो तर आपण आपल्या नवऱ्याच मन का नाही जिंकू शकणार ? आपल काही तरी चुकतंय हे नक्की खरं आहे.पार्किन्सन्स हा आजार आपल्या नवऱ्यानी स्वत:हून मागून घेतलेला नाही.त्यांना तो दुर्दैवाने झाला आहे.आणि या आजारामध्ये काय काय होऊ शकते याबाबतची पूर्ण माहिती आपल्याला डॉ.नी दिलेली आहे.आणि तरी आपण यांचे बोलणे आपल्याला कधी कधी समजले नाही की आपली चिडचिड होते.आपण त्याबद्दल वाद घालतो आपला संयम सुटतो व काही तरी उलटसुलट चर्चा करून त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करतो .हे आपले वर्तन चुकीचे आहे हे मला ट्रकवरील वाक्याचे पारायण केल्यावर समजले आणि त्या दिवसापासून मी यांच्याशी चिडून बोलणे, त्रासिक स्वरात बोलणे , सोडून दिले आणि आमच्या ह्यांच्याशी अधिकाधिक गोड कसं बोलता येईल ?ह्याचाच विचार सतत करु लागले.
मानवाला परमेश्वराने दिलेली वाणी ही फार मोठी देणगी आहे.मानव आपल्या वाणीतून आपल्या इच्छा, भावना, विचार,गरजा, महत्त्वाकांक्षा व्यक्त करु शकतो.व लोकांपर्यंत त्या पोहचवू शकतो
तुमच्या बोलण्यावरून “तुम्ही कसे आहात ?याचा अंदाज ऐकणारे लोक बांधू शकतात बोलताना तुमच्या आवाजाची पट्टी, तुम्ही केलेल्या शब्दांची निवड, तुमच्या बोलण्यातील खरेपणा,बोलण्यातील भाव,बोलताना हातवारे करण्याची पद्धत, समोरच्या व्यक्ती बद्दलचा आदर, तुम्हाला इतरांबद्दल असलेली आपुलकी हे सारं सारं लक्षात येतं.
पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तीच्या बोलण्यावर शेवटी शेवटी परिणाम होऊ लागतो. बोलताना उच्चार स्पष्ट येत नाहीत ,आवाज क्षिण होतो, बोलताना लाळ गळते, बोलताना दम लागतो, काही वेळा विस्मरणामुळे थांबत थांबत बोलणे होते ,योग्य वेळी योग्य बोलणे हीहोत नाही , थोडंसं अस़बंध बोलणं होऊ शकते .
अशा वेळी पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थी शी घरातील सर्व सदस्यांनी अतिशय विचारपूर्वक संवाद साधला पाहिजे.घरात ताणतणाव,अशांतता, असुरक्षित पणा वाढेल असे संवाद टाळले पाहिजेत.शुभार्थीचे मन अस्थिर होणार नाही याची काळजी संवाद साधताना घेतली पाहिजे.शुभार्थीला नैराश्य,चिंता,भय,एकटेपणा,येणार नाही याची काळजी संवादातून घेतली पाहिजे.शुभार्थीशी सर्वांनी गोड शब्दांत हलकेफुलके संवाद साधले पाहिजेत.
सर्वांच्याच शारीरिक, मानसिक,व सामाजिक आरोग्यासाठी हे हितकारक आहे त्यायोगे मिळणारे निरामय,निरोगी, आयुष्य आणि आनंद सर्वांना च हवा असतो.काही वेळा वृध्द नागरिक,आजारी नागरिक या़ंच्याशी बोलताना भान रहात नाही आणि बोलण्याचे तारतम्य रहात नाही त्यावेळी ज्येष्ठांनी आपल्याला आपली बोलण्यातील चूक निदर्शनास आणून दिली तर आपण आपली चूक लगेचच कबूल करायची सोडून देतो आणि “आहे हे असं आहे “माझा आवाज मोठाच आहे.”मला असचं बोलता येतं “मला अशीच बोलायची पहिल्या पासून सवय आहे ” मी माझं बोलणं बदलू शकत नाही “
अशा प्रकारे माणसं स्वत:च्या बोलण्याचं समर्थन करत असतात पण हे योग्य नाही.साधारण माणूस १ वर्षाचा झाल्यावर बोलू लागतो म्हणजे विविध उच्चार करू लागतो.पण जाणीवपूर्वक, विचार पूर्वक बोलायला खूप वर्षे लागतात .
पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थी चे बोलणे जरी स्पष्ट नसले तरी कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यांशी स्पष्ट,गोड,मधूर,व नेमके बोलावे, आवाजात चढउतार असावेत, शुभार्थी शी,एकसुरी बोलणे, कंटाळून बोलणे, खूप संथ किंवा खूप भरभर बोलणे टाळावे.
शुभार्थी चे वर्तन शुभार्थी चे बोलणे कुटुंबातील सदस्यांना पटले नाही,आवडले नाही, त्यामुळे राग संताप आला तर त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि शुभार्थी ला निरर्थक बोलणे,आर्वाच बोलणे,त्याच्या मनावर ताण येईल असे घाबरणारे शब्द वापरणे टाळावे.
शुभार्थी काही सांगू लागले तर त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे,न पटल्यास त्यांना हळू आवाजात सांगावे पण उर्मटपणे किंवा तातडीने प्रतिउत्तर देऊ नये.स़ंपूर्ण ऐकून घेतल्यानंतर आपले मत मांडावे आपली प्रतिक्रिया सावध वृत्तीने द्यावी.शुभार्थीच्या भावभावनांचा विचार करावा.
आजाराने शुभार्थी हळवा झालेला असतो अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी शुभार्थी बोलताना हातवारे करून किंवा मध्ये मध्ये “आमचं ऐका जरा आमचं ऐका जरा किंवा टाळी वाजवून आम्ही काय म्हणतोय?शुक, शुक अशा वाक्यांनी लक्ष वेधून घेऊ नये ,त्यांना बोलतं असताना गप्प करु नये.त्यांना मनमोकळे बोलू द्यावे.
प्राथमिक शिक्षण झाल्यावर वाचता सर्वांनाच येत पण काय वाचावे ? याच ज्ञान थोड्यानांच येत.तसचं बोलता सर्वांना येत पण कुठे काय बोलावं ?कसं बोलावं ?केव्हा बोलावं ?याच ज्ञान फार थोड्या माणसांना असतं . म्हणून माणसाने चांगलं बोलायला शिकले पाहिजे.शुभार्थींशी बोलण्यासाठी आपल्या संग्रही सकारात्मक शब्दांची यादी केली पाहिजे.त्यासाठी भरपूर प्रमाणात वाचन केलं पाहिजे मग दैनंदिन जीवन जगताना बोलण्यात चांगले शब्द येऊ लागतात.आयुष्य बदलून टाकण्याची ताकद या शब्दांमध्ये असते.वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद,होतात व मग नेमक मोजक बोलता येऊ लागतं.शुभार्थींशी बोलताना चांगली लय सापडते.बोलण्यातला रूक्षपणा हळूहळू कमी होत जातो.शुभार्थीच्या ह्रदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते..
आपण दिवस भर कितीही आपल्या कामात,व्यवसायात दंग असलो तरी दिवसभरात थोडावेळ काढून कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमेकांशी आणि शुभार्थींशी संवाद साधलाच पाहिजे.कारण केवळ दोन शब्द बोलण्याने माणसामाणसातले अंतर कमी होण्यास मदत होते.एकमेकांशी बोलल्यामुळे गैरसमज दूर होतात.मनावरचा ताण हलका होतो.माणसाच्या बोलण्याचा आवाज हा आतून येत असतो.
थोडक्यात गोड बोलून जग जिंकता येईल व कटू बोलून शत्रू वाढवता येतील .गोड बोलण्याने जर आयुष्य बदलता येत असेल तर माणसाने गोडच बोलावे ना . काही माणसांना गोड बोलण्याची,हावभाव पूर्ण बोलण्याची जन्मताच दैवी देणगी मिळालेली असते म्हणून ते आयुष्यभर लोकांच्या स्मरणात रहातात.
अमिन सायानी यांचा ” बिनाका गीतमाला , आणि अमिताभ बच्चन यांचा “कौन बनेगा करोडपती ” हे दोन कार्यक्रम मी फक्त त्यांचा आवाज,त्यांचे मधूर बोलणे ऐकण्यासाठी पाहिले
चांगले जीवन जगण्यासाठी सत्य ,मधूर गोड नम्र पण बोलले की, आयुष्यातील निम्म्या समस्या सुटतात व जीवन सुकर होते.