परमेश्वराच्या आळवणी चे आर्त सूर ऐकू येतात. पाखरांची किलबिल अजून सुरू झालेली नसते आणि आजाना चा तीव्र स्वर वातावरणाला कापत अल्लाला साद घालतो. हो कोंबडा ही विसरतो मग बांग द्यायला आणि नंतर लाजून आपले कर्तव्य पुरे करतो. चहाचा वाफाळता कप तोंडाला लावतो न लावतो तोच घंटांचे तालबद्ध आवाज चर्चमधून ऐकू येऊ लागतात. आई पण देवापुढे बसून म्हणत असते “कराग्रे वसते लक्ष्मी ” मी हातातला कप खाली ठेवतो आणि आईबरोबर म्हणतो , “करमध्ये सरस्वती,करमूलेतु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम्” दिवसाच्या प्रहरा ची सुरुवात करायची ती स्वतःच्या हाताचे दर्शन घेऊन! हात तरी कशासाठी तर कर्तबगारी साठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी नक्कीच पण पहिल्यांदा प्रार्थनेसाठी!मग ते आकाशाकडे उंचावलेले असतील नाहीतर छातीशी क्रॉस करणारे असतील किंवा नमस्कारासाठी जोडलेले असतील किंवा थंडीच्या तडाख्यातही काकड आरती साठी टाळ्या वाजवून साथ देणारेही असतील! प्रार्थना ..एवढेच उद्दिष्ट! ही प्रार्थना म्हणजे स्तुती, प्रार्थना म्हणजे आराधना, प्रार्थना म्हणजे विनंती!प्रार्थना म्हणजे शब्दार्चना! प्रार्थना म्हणजे मागणी पण भीक नव्हे ! प्रार्थना या शब्दातच एक प्रकारचा ओजस्वीपणा आहे,पावित्र्य आहे, मांगल्य आहे!! या जगाच्या सर्वव्यापी शक्तीपुढे नतमस्तक होण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना !विद्यार्थ्यांना शाळेची घंटा, प्रार्थना आणि उशिरा मुळे हातांवर वाजणार्या छड्या हा सगळा एकच शब्दसमुदाय वाटतो।
सक्तीने म्हणायला लावलेली प्रार्थना ही रडगाणे ठरते तर मनःपूर्वक आळवणी करून भक्तीने म्हटलेली प्रार्थना ही दगडालाही पाझर फोडते! आकाशात भरकटलेल्या अपोलो यानातील चांद्रवीर हे सर्व जगातून झालेल्या सामुदायिक प्रार्थनांमुळेच पुन्हा आपल्यात आले ही आजही सगळ्यांची श्रद्धा आहे. या सामुदायिक प्रार्थनेचा आता हिंदी सिनेमांनी अतिरेक केला. या अतिपरिचयामुळे हिंदी सिनेमातल्या प्रार्थनांचेही हसू झाले.
खरेतर प्रार्थनेच्या माध्यमातून सूर कळायला हवा, ताल समजायला हवा आणि शब्द मनाला भिडायला हवेत. ” गगन सदन तेजोमय ” सारखी प्रार्थना आयुष्यभर मनात घर करते. “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ” म्हणताना प्रेमभावना दाटून येते तर ” या झोपडीत माझ्या, आनंद साठवावा ” असे सांगणारी प्रार्थना दीपस्तंभासारखी ठरते. “गुरुविण नाही दुजा आधार” असे म्हणणारा शिष्य प्रार्थना करतो गुरूची. सगळीकडे दाटलेल्या निराशेच्या अंधारातला आशादीप म्हणजे प्रार्थना! संकटाला तोंड देण्यासाठी सगळे बळ एकवटणारी ,सामर्थ्याला तेज मिळवून देते ती ही प्रार्थना! मनोभावे केलेली प्रार्थना शांती समाधान मिळवून देते आणि सत्याच्या लढाईला बळही देते.” नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ” चा रोज संघस्थाना वर होणारा घोष ही माझी मातृभूमी सुजलाम सुफलाम होऊ दे त्यासाठी लागणारे परिश्रम आम्हाला करण्याचे बळ दे ही पण प्रार्थनाच आणि विद्यादान करणाऱ्या शिक्षकांनी” देता घेशील किती दो करांनी” अशी पाळी विद्यार्थ्यांवर आणावी ही प्रार्थना