ही घटना २००३ मधील आहे माझ्या मिस्टरांना चेकींग साठी मी हडीॅकर हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले होते सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्यानंतर तेथे असणाऱ्या डॉ.चारुदत्त आपटे आणि डॉ.प्रदीप दिवटे यांनी आम्हाला माझ्या मिस्टरांना “पार्किन्सन्स “हा आजार झाल्याचे सांगितले व त्याच बरोबर या आजारा विषयक सखोल माहिती पण दिली ती आता मी येथे लिहित नाही कारण बऱ्याच शुभार्थी व शुभंकर यांना ती माहिती आहे.असो
पार्किन्सन्स चे निदान झाल्यावर व त्या आजारा विषयक माहिती ऐकल्यावर आमच्या पण पायाखालची जमीन सरकली .तशा मनस्थितीत आम्ही उभयता घरी आलो मोठी कन्या काॅलेजमधून घरी आलेली होती. आमचे काहीसे चिंताग्रस्त चेहरे बघून तिने “आई-बाबा काय झाले ?एवढे टेन्शनमध्ये का दिसताय ?कसला ताण आलाय ?असे एकामागोमाग प्रश्न विचारायला सुरुवात केली मग तिला मी शांत करीत “बाबांना पार्किन्सन्स हा मज्जासंस्थेशी निगडीत आजार झाल्याचे सांगितले व त्याबाबतची थोडीफार माहिती सांगितली कारण तिचे हसण्या खेळण्याचे वय आहे तेव्हा तिने बाबांच्या आजाराचा ताण नको घ्यायला म्हणून.
पार्किन्सन्स आजाराची माहिती ऐकून घेतल्यानंतर माझी कन्या इतकी सहज म्हणाली
“पार्किन्सन्स सह जगायचे त्यात काय एवढे ? त्यानंतर मी मात्र तिच्या तोंडातून निघालेल्या त्या वाक्याचा विचार करू लागले “खरचं या आजारासह आनंदी जीवन जगता येईल ? त्यासाठी मला ह्यांची साथ मिळेल ? हो मिळेल की , का नाही मिळणार ?असे दुसरे मन मला म्हणू लागले.
हा आजार झाल्याचे कळल्यावर जेवढा शुभार्थी ला मानसिक धक्का बसतो त्याही पेक्षा तीव्र आघात शुभंकरावर होतात ते अनुभव आम्ही पण घेतले.पण मुलीच्या एका वाक्याने “त्यात काय एवढे पार्किन्सन्स सह जगायचे ! यामुळे आम्ही उभयता सावरलो व चांगला बोध घेतला आता हार मानायची नाही.आपण “पार्किन्सन्स “या चिकट पाहुण्याला शरीरातून हाकलून देऊ शकणार नाही तो आता शरीरात पक्क ठाणं मांडून बसलाय .तेव्हा आता आपणच त्याच्यासह जीवन जगायला सुरुवात करायची .
पार्किन्सन्स या आजारात आर्थिक विवंचना सतावते, कौटुंबिक, सामाजिक,मर्यादा जाणवतात, शुभार्थी ला नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी अखंड प्रयत्न करावे लागतात,हा हळूहळू वाढणारा आजार असल्यामुळे नंतर येणाऱ्या असंख्य समस्यांवर उपाययोजना कराव्या लागतात, शुभार्थी, शुभंकर यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या आजाराला दीर्घ काळ तोंड द्यावे लागते,, शुभार्थी शुभंकर यांच्या आवडीनिवडी, आशा आकांक्षा,दूर ठेवून धैर्याने तोंड द्यावे लागते .
या सर्व गोष्टींचा विचार करून शुभार्थी शुभंकर व कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक,यांच्या विचाराने शुभार्थी ला आधार शुभार्थी ची काळजी, औषधोपचार,सर्वांचा समजूतदार पणा, शुभार्थी ला माया प्रेम, सहकार्य याची देवाण,या आशावादावर “पार्किन्सन्स चा “पुढचा प्रवास सुरु ठेवावा लागतो .
“पार्किन्सन्स “झाल्यावर मुळी सुध्दा खचून न जाता आधीसारखे जीवन जगण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे.”लोक काय म्हणतील ?याचा विचार आपल्याला सतवायला नको असेल तर आपण हा आजार आपले जवळचे नातलग, कौटुंबिक सदस्य, मित्रमंडळी,शेजारीपाजारी आपले फॅमिली डॉक्टर,कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी,या सर्वांना विश्वासात घेऊन आजार ची कल्पना दिली तर कोणत्याच मनस्तापाला तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही.
आता तुम्ही म्हणाल पार्किन्सन्स सह जगायचे त्यात काय एवढे? हे म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात अवघड आहे .हो हे म्हणणं बरोबर आहे पण समाजात तुम्ही उघड्या डोळ्यांनी सर्वत्र पहाल तर तुम्हाला वरील वाक्याची प्रचिती येईल.आज अनेक लोक जगात,समाजात त्यांच्या व्यांधीसह,व्यंगासह आपापल्या समस्यांवर मात करीत जीवन जगत आहेत .”पार्किन्सन्स हा आजार तर साधारण पन्नाशी,साठीच्या आसपास माणसाला होतो बरचसं जीवन त्या सुमारास जगून झालेलं असतं .पण विचार करा ज्यांना जन्मताच अंधत्व मिळालेलं असतं ज्यांनी दुनियेत येऊनही ही दुनिया च बघितलेली नसते त्यांनी कसं जीवन जगावं?असेच,मुके,बहिरे जन्मताच अपंगत्व असलेले अपघाताने अपंगत्व आलेले अनेक लोक समस्यांना तोंड देत छान जीवन जगतात.
तेव्हा मित्रांनो,मैत्रिणींनो पार्किन्सन्स सह जगता येते त्यात एवढा बाऊ करायचे कारण नाही.उघडा डोळे पहा नीट समाजात लोक कसं जीवन जगतात ते.द्रुष्टी दोष आलेल्या लोकांना आयुष्य भर चश्मा घालूनच समाजात वावरावे लागते ,कर्ण दोष असलेल्या लोकांना चा़ंगले ऐकू येण्यासाठी श्रवणयंत्र लावावे लागतेच ना ते कुठे समाजात फिरताना लाजतात.मानेला,कमरेला पट्टा लावून कितीतरी लोकांना समाजात त्यांच्या कामानिमित्त फिरावेच लागते ते कूठे विचार करतात या शरीरावरील नवीन दागिन्यांचा .
ज्यांना डायबिटीस होतो त्यांना जीवनात शुगर कंट्रोल करण्यासाठी कायम स्वरुपी, वैद्यकीय सल्ला, डायबिटीस गोळ्या , शुगर टेस्ट वगैरे सातत्याने करावे लागते अशाच प्रकारे रक्तदाब, ह्रदयविकाराच्या समस्या,संधीवात, अशा कितीतरी आजारांवर मात करीत,करीत लोक जीवन जगताना दिसतात.
हे सर्व लक्षात घेता पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थी शुभंकर यांना पार्किन्सन्स सह नक्कीच आनंदी जीवन जगता येईल .हा आजार कॅन्सर सारखा किंवा हार्टफेल सारखा महाभयंकर नाही.किंवा लेप्रसी सारखा ही जखमा घेऊन फिरण्यासारखा नाही.हा आजार कमी जास्त होतो पण लगेचच मृत्यू संभवत नाही त्यामुळे निराश होऊ नका.प्रदीघॆ लढ्याची मानसिक तयारी ठेवून सतत प्रयत्न शील राहण्यातच शुभार्थी व शुभंकर यांचे फायद्याचे आहे.
आता पार्किन्सन्स सह जगण्यासाठी काय करायचे तर प्रथम शुभार्थी, शुभंकर यांनी व इतर सदस्यांनी आजाराला स्वीकारायचे ,समाजात छान मिसळायचे, सणसमारंभ,लग्न,अशा कार्यक्रमात सहभागी व्हायचे मित्रमंडळी सगेसोयरे,यांच्याघरी जायचे त्यांना आपल्या घरी बोलवायचे,आपापले छंद जोपासायचे,मनाला विरंगुळा मिळावा यासाठी आवडते खेळ खेळायचे,वाद्य वाजवायची,गाणी,म्हणायची गप्पागोष्टी करायच्या ,टिव्ही, मोबाईल,स़ंगणक, लॅपटॉप, वगैरेंचा छान वापर करायचा,मन गुंतवून ठेवण्यासाठी वाचन लेखन करावे.जोपर्यंत हिंडता फिरता येतंय तो पर्यंत भरपूर ट्रीपा करायचा ,पचतयं तो पर्यंत भरपूर खाऊन घ्यायचे,बसवतयं तो पर्यंत चित्रपट, नाटकं,गाण्याच्या मैफली पहायच्या ऐकायच्या. देवानंद सारखं बिनधास्त आयुष्य सुखासमाधानाने जगायचं “जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना ?या ऊक्ती नुसार आजचा दिवस पदरात पडला ना मग तो आनंदातच घालवायचा उद्याची चिंता आज कशाला करत बसायची आणि आताचे क्षण दु:खात घालवायचे .
तेव्हा मित्रांनो मैत्रिणींनो,आपण शय्याग्रस्त होऊ तेव्हा होऊ त्यांची काळजी आजपासून करीत बसू नका मस्त आनंदी जगा
योग्य औषधोपचार, नियमित व्यायाम,सकस पण प्रमाणात आहार, आणि सर्वात महत्वाचा सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी लक्षात ठेवल्यास व एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन प्रयत्न केल्यास “पार्किन्सन्स ” आजार होऊ न सुध्दा बरीच वर्षे चांगल्याप्रकारे चांगल्या दर्जाचे जीवन जगता येणे शक्य आहे हे मी खात्रीने सांगू शकते फक्त मनी प्रबल इच्छा व त्याला प्रयत्नांची जोड हवी प्रयत्न करा यश तुमचेच आहे.
तेव्हा मित्रांनो मैत्रिणींनो
“पार्किन्सन्स सह जगायचे त्यात काय एवढे ?
लेखिका
अंजली महाजन
१० ऑगस्ट २०२१