मंगळवारी सकाळी सकाळी आकाशवाणीवर शुभार्थी सुधाकर अनवलीकर यांच्या निधनाची वार्ता ऐकली.लगेच महाराष्ट्र टाईम्समध्येही वृत्त वाचले.तसे हे अनपेक्षित नव्हते. ८०वर्षाच वय,गेली तीन वर्षे डायलेसीसही चालू होते. तरीही यापुढे त्यांचा हसतमुख चेहरा सभामधून दिसणार नाही याच दु:ख होतेच.
झुंझार पत्रकार म्हणून ते ओळखले गेले असले तरी आमची ओळख झाली ती पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट) म्हणूनच.पार्किन्सन्स मित्रमंडळात येणाऱ्या शुभार्थीत बरेचसे मलाच का? भूमिकेत असतात.काही पीडीशी सामना करायच्या तयारीत, काही पीडीचा सहज स्वीकार करून त्याला मित्र बनविणारे.अनवलीकरांचा खाक्या मात्र वेगळाच होता. पीडी त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.सो व्हाट? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. त्यांना तोल जाण्याची समस्या होती ते सभेला सुरुवातीला एकटेच यायचे.एकदोनदा पडलेही पण काहीच झाले नाही अशा अविर्भावात उठून बसले.त्यांना बोलण्याची समस्या निर्माण झाली होती.पण पार्किन्सन्स त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र पुसू शकला नाही.पिडीमुळे चेहर भावविहीन होतो हे त्यांच्यासारखेच आमचे अनेक शुभार्थी खोटे ठरवतात.पत्रकार म्हणून त्यांची ओळख आम्ही घरभेटीचा उपक्रम सुरु केला तेंव्हा झाली. सहजी संवादिजे या आगामी पुस्तकाची प्रुफे आली होती.अतिरथी महारथींची व्यक्ती चित्रे त्यात होती. नानासाहेब परुळेकर,बालगंधर्व,कृष्णराव फुलंब्रीकर,ग.दि.माडगुळकर,पु.ग सहस्त्रबुद्धे,श्री कृ.कोल्हटकर,मनोहर माळगावकर अशी कितीतरी नामवंत मंडळी, प्रुफ चाळताना मला दिसली. पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनवलीकर यांचे सहाध्यायी शंकर सारडा यांच्या प्रस्तावनेतून अनवलीकारांच्या जडणघडणीतल्या ,व्यक्तीमत्वातल्या अनेक बाबी निदर्शनास आल्या’.सिद्धहस्त वार्ताहर आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व’ असे त्यांचे वर्णन त्यानी केले. घरची परिस्थिती बेतासबात असल्याने शिक्षणासाठी, जगण्यासाठीचा झगडा खडतर होता.अर्थार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या कामातून साहित्यिक विचारवंत यांचा सहवास लाभला.त्यांतून जे अनौपचारिक शिक्षण मिळाले ते व्यक्तिमत्व संपन्न करणारे,बहुश्रुत करणारे होते.दहावीनंतर लगेच सकाळ मध्ये अर्धवेळ शिकाऊ पत्रकार म्हणून वर्णी लागली.सुंदर अक्षर आणि बिनचूक लेखन यामुळे डॉक्टर परुळेकर यांचा लेखनिक होता आल. आणि पत्रकारितेत पाय रोवण्यासाठी पत्रकारितेला आवश्यक असे विविध विषयाचे ज्ञानही झाले.बरोबरीने मराठी विषयात एम.ए.झाले.६२ सालपर्यंत ते सकाळ मध्ये होते.महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या पहिल्या अंकापासून ते ३३ वर्षे मटाच्या सेवेत होते.अनेक प्रकरणे उघडकीस आणून त्यांनी शोध पत्रकारितेचे विश्व गाजवले.त्यांच्या लेखणीने विविध विषयांत स्वैरसंचार केला.पु.ल.देशपांडे,ग,दि माडगुळकर,श्री.के क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बरांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले.त्यांच्या लेखांची ‘भुलाये न बने,” बोला अमृत बोला’,’सुजन कसा मन चोरी’ ही पुस्तके झाली.अभिनेत्री हंसा वाडकर यांचे आत्मकथन ‘सांगत्ये ऐका’ हे त्यांनीच माणूस मध्ये शब्दांकित केले.
मंडळात ते सामील झाले तेंव्हा हा भूतकाळाचा झगमगाट उरलेला नव्हता.वळणदार अक्षर आणि थोरामोठ्यांच्या मुलाखती घेण्याची क्षमता असणारी वाणी ही अस्त्रेच पार्किन्सन्सने बाधित झाली होती.प्रसन्न चित्ताला मात्र पार्किन्सन्सला हात लावता आला नाही.ज्यांच्या व्यवसायात बोलण हे महत्वाच असत असे प्राध्यापक,वकील,समुपदेशक असणारे अनेक शुभार्थी वाणीवरच्या हल्ल्याने कोसळून जातात.पार्किन्सन्स झाल्याच लपवतात.शुभार्थीच नाहीतर तरुणवयात मोठ्ठी पद भूषविणारे अनेक जेष्ठ नागरिकही वास्तव नाकारून भूतकाळच उगाळत बसतात. अनवलीकरांच मात्र अस नव्हत.मासिक सभाना ते यायचे,जेष्ठ नागरिकांच्या मेळाव्यातून दिसायचे. स्मरणिकेत त्यांनी स्वत:च्या कविता दिल्या. डायलेसीस सुरु झाल्यावरही ते सभांना आले.जानेवारीत दिनानाथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉक्टर मंदार जोग यांच्या व्याख्यानाला तर ते डायलेसीस करून लगेच आले होते.एप्रिलमध्ये जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या मेळाव्यालाही ते हजर राहिले.आता त्यांची अवस्था खर तर विकलांग म्हणता येईल अशी होती पण अशा परीस्थितीतही त्यांना सभांना यावेसे वाटे आणि त्यांची पत्नी त्यांना घेऊन येई.दोघानाही दाद द्यायला हवी.
‘सहजी संवादिजे ‘ या अनवलीकारांच्या पुस्तकात त्यांनी श्री.के.क्षीरसागर यांची जीवनविषयक भूमिका दिली होती.” माझ्यासारखे रोमँटिक पिंडाचे लोक पुष्कळदा नकळत सुखाकरता नव्हे,दु:खाकरता नव्हे तर केवळ अनुभवाकरता जगत असतात.’ अनुभव ‘ म्हणूनच त्याचं अनुभवावर प्रेम असत….बाह्य जीवनात यश येवो वा अपयश येवो,सुख येवो वा दु:ख येवो,आरोग्य वा रूग्णावस्था येवो,माझा हा मानसिक प्रवास चाललेलाच आहे.”अनवलीकराना हे पटलेलं असाव.पार्किन्सन्सकडेही त्यांनी एक अनुभव म्हणूनच पाहिलं असेल का?
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– डॉ. सौ. शोभना तीर्थळी