गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.. यावेळी डॉक्टर अरूण दातार (संचालक – सूर्या जिम) यांचे ‘पार्किन्सन्स आणि व्यायाम’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. सभेस ५०/६० जण उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.सुरुवातीला डिसेंबर महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत अशा शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.यावेळी माननीय वक्त्यांचा वाढदिवसही डिसेंबर मधील होता.
डॉक्टरांनी सुरुवातीला ‘.प्रार्थना नसती तर मी वेडा झालो असतो असे गांधीजी म्हणत’ असे सांगत प्रार्थनेचे महत्व सांगितले.
यानंतर त्यांनी काही वेगवेगळ्या कारणाने शारीरिक दोष निर्माण झालेल्या व्यक्तींना व्यायामाद्वारे कसे बरे केले याची उदाहरणे सांगितली.१०/१२ वर्षाच्या मुलाचे आजारपणामुळे हातपाय अधू झाले होते.या मुलाकडून मसाज,पोहणे, व्यायाम हे करवून घेतले.चार वर्षात ज्याला छोटा दगडही उचलता येत नव्हता तो ११५ किलो वजन उचलू शकला.हे साध्य करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी त्यांनी सांगितल्या.
१) आपले दु:ख,त्रास जवळच्या व्यक्ती सोडल्यास सर्वाना सांगत बसु नका.यावर बहिणाबाईची कविता त्यांनी सांगितली.’माझ दु:ख माझ दु:ख तयघरात कोंडलं,माझ सुख माझ सुख हंड्या झुंबरे टांगलं’.
स्वत:च्या अपघातानंतर निर्माण झालेल्या दुर्धर परिस्थितीवर मात करण्यास ती उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले.
२) ठरलेले व्यायाम करताना लक्ष केंद्रित करणे महत्वाचे.शुभंकराने व्यायाम करताना जिद्द, आशावाद निर्माण करावा.प्रेम, काळजी,सहानुभूती दाखवून शुभार्थीला कमकुवत करू नये.
३) .व्यायामात सातत्य,काटेकोरपणा,शिस्त हवी.उरकाउरकी नको.कंटाळा नको’ टू.फिल टायर्ड इज नॉट टू बी
टायर्ड’ ‘द मसल्स ग्रो ओन्ली व्हेन …यु फोर्स देम टू ग्रो’ हे लक्षात घ्यावे.
४) You are not disabled by the disabilities you have but you are able by the abilities you have.
५) मनाने खंबीर बनून दुखण्यावर स्वार व्हा. यातून ,शरीराची ताकद वाढवत नेता येते.
६) व्यायाम करताना निश्चीत असे उद्दिष्ट हवे.यात अल्पकालीन,दीर्घकालीन,निर्णायक असे प्रकार सांगितले.
यानंतर त्यांनी प्रत्यक्ष व्यायाम करून घेतले.व्यायामाच्या सुरुवातीला दीर्घ श्वास घेऊन मन स्थिर केले.त्यानंतर डोळे मिटून पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताण विरहीत करण्यास सांगितले.नंतर पुन्हा त्याच अवयवांना ताण देण्यास सांगितले.पुन्हा ताण विरहीत करून व्यायाम प्रकार सुरु केले.( हे व्यायाम प्रकार स्वतंत्रपणे संचार किंवा स्मरणिकेत देण्यात येतील) सर्व शुभंकर शुभार्थी उत्साहाने यात सहभागी झाले.’नो पेन नो गेन’ म्हणून काही झाले तरी व्यायाम चुकवायचा नाही.हे सर्वांच्या मनावर ठसवले.
ज्या दिवशी व्यायाम नाही त्यादिवशी जेवण नाही असा निर्बंध स्वत:वर घातल्याचे त्यांनी सांगितले.व्यायामाबरोबर आहार विहाराचे महत्वही विशद केले.त्यांच्या विचाराना ‘आधी केले मग सांगितले’ असे अनुभवाचे अधिष्ठान असल्याने, सर्वांनाच त्यांचे विचार भावले.पंचाहत्तरीतही त्यांची शरीरसंपदा, दीड दोन तासातील आत्मविश्वासपूर्ण,उत्साहाने ओतप्रेत भरलेला वावरही सर्वांवर प्रभाव टाकून गेला.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
शेवटी अंजली महाजनने व्यायामाविषयीच्या घोषणा सांगितल्या.
डॉक्टर दातार यांनी पेशंट एकत्रित आल्यास आपण व्यायाम शिकवण्यास तयार आहोत असे सांगितले.डॉक्टरांच्या जीवन दर्शन सांगणाऱ्या ‘शून्यातून सूर्याकडे’ या पुस्तकाच्या प्रती काहीजणांनी घेतल्या.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ‘ पार्किन्सनन्सचा स्वीकार करून पार्किन्सन्ससह आनंदी राहावे’ या ब्रीदवाक्याला पूरक आणि प्रेरणादायी अशा डॉक्टरांच्या व्याख्यानाने सकारात्मक विचाराची पेरणी नक्कीच झाली.