शंकर हिंगे हे नाव घेताच हसतमुख,धडपडी आणि प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती डोळ्यासमोर येते. पार्किन्सन्समध्ये चेहरा भावविहीन होतो याला अपवाद असणारे हे व्यक्तिमत्व.अश्विनी मधील सभेला ते नियमित वेळेपूर्वी आणि एकटेच येत.घरभेटीच्यावेळी आम्ही हडपसरला त्यांच्या घरी गेलो तेंव्हा लक्षात आले.सभेला येण्यासाठी त्यांना केवढा आटापिटा करावा लागतो..इतका त्रास घेऊन जर शुभार्थी येत असतील तर त्याना उत्तमच द्यायला हवे हा धडाही आम्हाला मिळाला.ते जरी निवृत्त झाले असले तरी त्यांची पत्नी शाळेत नोकरी करत असल्याने त्यांच्या सोबत येऊ शकत नव्हती.त्यांना त्यांच्याबरोबर कोणी हवे अशी गरजही वाटत नव्हती.आम्हाला वाटायचे अश्विनी लॉज सभेला जाण्यासाठी आपल्याला किती लांब आहे.आमच्या दुप्पट अंतर असलेल्या हिंगेनी मात्र दूर यावे लागते अशी कुरकुर कधीच केली नाही.
हिंगेनी सहा वर्षे कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरी केली आणि ३० वर्षे किर्लोस्कर न्युमॅटिक मध्ये अकौंट सुपरवायझर म्हणून नोकरी केली.याबरोबर वैदिकी आणि योग शिक्षक म्हणूनही ते काम करत.त्यामुळे निवृत्तीनंतर काय हा प्रश्न त्यांच्यापुढे नव्हता.खर तर त्यांच्याकडे प्रश्न कोणतेच नव्हते उत्तरे मात्र होती.जगण्याचा उत्साह होता.स्वत: आनंदी राहून इतरांना आनंद लुटण्याचा स्वभाव होता.
ते तिसऱ्या मजल्यावर राह्त होते.मुलींची लग्ने झाल्याने पती पत्नी दोघेच राहत. आम्ही गेल्यावर पत्नीची तक्रार होती.तिचे गुढगे दुखत असल्याने जिने चढउतार करणे त्रासाचे होते.घर विकून ओल्डएज होम मध्ये राहावे असे त्याना वाटत होते.हिंगे याला तयार नव्हते आजूबाजूला अनेक वर्षाची संबंधित मित्रमंडळी होती.आम्ही त्यांच्याकडे बराच वेळ गप्पा केल्या.त्यानंतर आम्हाला त्या बाजुलाच राहणाऱ्या शिवरकर या शुभार्थीकडे जायचे होते.आम्ही रीक्षानी जाणार होतो.हिंगे म्हणाले अहो जवळच आहे मी येतो बरोबर.तुम्हाला घर दाखवतो.हिंगेंचे जवळ अंतर माझ्यासाठी खूप लांबचे होते.शिवरकरांच्याकडे उलटी परिस्थिती.त्यांनी पीडिला अजून स्वीकारले नव्हते.ते सभांना ही येत नसत.त्यांच्याकडे गाडी ड्रायव्हर होता.पण येण्याची इच्छा नव्हती.पीडीला आवश्यक असणारा व्यायाम ते करत नव्हते.हिंगेनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा व्यायाम घ्यायचे ठरले.त्याप्रमाणे ते घेऊही लागले.शिवरकर यांना घेऊन ते सभेला येवू लागले.त्यांची गाडी असल्याने आता हिंगेंचा बसनी येजा करण्याचे श्रम आणि वेळही वाचला.घरभेटीत, जवळच्या लोकाना एकमेकांशी गाठ घालून देणे हा एक हेतू होता.तो साध्य झाल्याने आम्हाला छान वाटले.
एकदा मी फोन केला तर त्यांना शुगर एकदम लो झाल्याने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे समजले.सभेच्या दिवशी त्यांना डीसचार्ज मिळणार होता.त्यांची पत्नी म्हणाली,त्याना सभेला यायची इच्छा आहे. आम्ही थेट सभेला येतो आणि नंतर घरी जाऊ.पण हॉस्पिटलच्या सर्व फॉरम्यालीटी होण्यास वेळ लागला.आणि ते सभेला येऊ शकले नाहीत.त्यानंतरही ते सभेला आलेच नाहीत.ते गेल्याचे वृत्तच आले.पुढे संपर्कही होऊ शकला नाही.त्यांनी पार्किन्सन्सला चांगले हाताळले पण मधुमेहाला ते हाताळू शकले नाहीत असे वाटते.पीडी कडे लक्ष देताना इतर आजाराकडे दुर्लक्ष नको.हे सर्वानीच लक्षात घ्यायला हवे.
.मंडळाला पत्र लिहून ते काय करता येईल याबाबत सूचना करत.वृत्तपत्रात पीडीविषयी काही आल्यास त्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना करत.सहलीची कल्पनाही त्यांनी मांडली होती.सकाळ वृत्त समूहाने फॅमिली डॉक्टरचा पार्किन्सन्स विशेषांक काढला होता.मुंबईच्या शुश्रुषा हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट नाथन यांचा त्यात लेख होता.त्यांनी पीडीवर एक सीडी तयार केली होती.हिंगेना वाटत होते आपण सर्वांनी मुंबईला एकत्र जावून त्यांना भेटावे.तेंव्हा पीडीवर मराठीतून फारसे लिखाण नव्हते.एखादा लेख आला तरी अप्रूप वाटायचे.आज मंडळाच्या नावावर तीन पुस्तके, ९ स्मरणिका,१३ संचारचे अंक असे लिखित साहित्य आहे.याशिवाय एक इबुक,वेबसाईट वरील लेखन, ब्लॉग आहे.युट्युब चॅनलवर तज्ञांच्या व्हिडिओ सीडी,नृत्योपचारावरील डॉक्युमेंटरी असे विपुल साहित्य आहे.दरवर्षी सहल जाते.हे पहायला हिंगे नाहीत.या सुरुवातीच्या काळातील शुभार्थींच्या सूचना,अपेक्षा यामुळेच हे झाले हे तितकेच खरे आहे.हिंगे तुम्ही असताना हे सर्व झाले नाही याची खंतही वाटते.