पूर आला , पाणी चढल , पाणी उतरलं..बोलायला , वाचायला वाटत पण इतकं सोपं नसत सगळं !
ज्यांच्या उंबऱ्याला वगैरे पाणी लागत त्यांना याची दाहकता समजते. महापूर म्हणजे काही स्टेटस वर ” ओ शेठ ” गाणं टाकून मिरवायची गोष्ट तर मुळीच नाहीये.
पै पै जोडून उभा केलेला संसार अचानक भिजून जाणं , कुजून जाणं नसत पचायला सोपं ! अगदी प्राणप्रिय म्हणून जपून ठेवलेली एखादी वस्तू , गोष्ट पुराच्या पाण्यात कुजून जाते , संपते अक्षरशः.. त्या गोष्टी सोबत कितीतरी आठवणी जोडलेल्या असतात , त्या इतक्या सहजपणे विसर्जित होतात ?
एखाद्या सासुरवाशिणीचा तिच्या लग्नात माहेरून आलेला लाकडी पाट असतो , बाईने आयुष्यभर जपलेला एखादा साधा तांब्या असतो , कोणाच्या पिढ्यान् पिढ्यांकडून वारश्यात आलेला देव्हाऱ्यातला बाळकृष्ण असतो , कुणाची आयुष्यभर खजिन्यासारखी जपून ठेवलेली पुस्तक असतात तर कधी अगदी ज्यांनी नेहमी आधार दिला त्या मातीच्या मायाळू भिंती आणि ऊन वाऱ्यात सावली देणार साधं छप्पर अगदी पडुन , वाहून , विरून जातं आणि त्यांच्या आठवणीत सुद्धा रमायला धास्ती वाटते कारण पुढच्या ओल्या संसाराकडे पाहता अजून किती काय काय उभं करायचंय याचे हिशोब मन मांडत राहत !
घरात पुराच पाणी खेळून गेल्यावर जेंव्हा घरात पाऊल ठेवतो ; तेंव्हा उरलेल्या गाळात भिजलेल्या संसाराची लक्तरं दिसत असतात. आणि येणाऱ्या मदतीने भौतिक गरजा भागल्या तरी काळजाला पडलेली घरं लिंपायला तो नदीचा रवाळ , दुर्गंधीयुक्त , संसारावर काजळीसारखा पसरलेला गाळ नाही कामी येत !
रोज ५-६ लिटर भर दूध देणार दुभतं जनावर जेंव्हा पुराच्या पाण्यात तसच सोडावं लागतं , तेंव्हा अगदी चहाच्या प्रत्येक घोटात लागणाऱ्या दुधाच्या चवीनं सुद्धा भडभडून येत ! नदीला माय म्हणतो आपण ; करतो तिची पूजा पण आईचा राग संसारच पुसून टाकतो , त्याचं काय?
शेवटी माणूस यातून सुद्धा राहतो उभा.. गाळातून घसरणारे पाय सावरत , बियाणांची भिजून फुगलेली पोती सोडत , मातीने भरलेली पातेली – हंडे – घागरी – बादल्या – तांबे – फुलपात्र – वाट्या – पळ्या सगळं घासून घासून धुवून काढत , उगाच एखाद्या सांदीतून अचानक निघणाऱ्या साप किरडाला घाबरत घाबरत ; पण करतो तो संसार उभा .
पण नंतर एखाद्या सामान्य दिवशी एखाद्या आयुष्यभर जपलेल्या पण पुरत वाहून गेलेल्या गोष्टीची आठवण काढून उगाच हळहळत असतो , महापुराच्या मानसिक गटांगळ्या जास्त त्रास देतात !
😞😔याला जोडून चिपळूण….
- स्वतः चे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले असताना आजूबाजूच्या 25 कुटुंबात प्रत्येकी 5000रु वाटणारा व्यावसायिक
*पुराचा तडाखा न बसलेल्या भागातून या व्यावसायिकाच्या मित्राने 9 मजूर जेवणाच्या रसदीसह साफसफाई साठी पाठवले - चौकात उभे राहून, मदत घेऊन येणार्या ट्रक मधील मालावर गरज नसताना डल्ला मारणारे दरोडेखोर
- मंत्री, व्हीआयपी येणार म्हणून त्यांनी बघायला घाण असावी यासाठी सफाई रोखणारे प्रशासन
*बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांच्या हालांकडे दुर्लक्ष, पिण्याच्या पाण्याचे वांधे
*येणारी मदत नीट वाटण्याची स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा नाही
*मदत नको पण वांझ दौरे थांबवा
निधी गोळा करणाऱ्यांचीही पात्रता लायकी इतिहास लक्षात घ्यायला हवा