गप्पांमध्ये बराच खंड पडला. नानावटी हॉस्पिटल चा एक व्हिडिओ अनेकांच्यामार्फत माझ्यापर्यंत आला.पार्किन्सन्स गटातही अनेकांनी तो पाठवला. उलट सुलट चर्चा सुरु झाली आणि सर्वांशी गप्पाद्वारे संवाद साधावा असे वाटले. पार्किन्सन मित्र मंडळाच्या हितचिंतक आणि शुभेच्छुक अनेकांनी हा व्हिडीओ मला पाठवला. यानंतर PDMDS कडून याबाबत आक्षेप घेणारे निवेदनही अनेकांनी पाठवले.पार्किन्सन मित्र मंडळाचे काम अनेकापर्यंत पोचवण्यासाठी आपण सर्व आम्हास हातभार लावत असता. आणि अशी वेगळी माहिती आली तरी आवर्जून आमच्यापर्यंत पोहोचवता याबाबत मनापासून धन्यवाद.आमचे शुभ चिंतणारे म्हणून आमच्यासाठी तुम्ही शुभंकरच आहात.
काही शुभंकर, शुभार्थींची व्हिडिओ पाहून काहीतरी चमत्कार घडतो अशी भावना झालेली दिसली.अनेक शंका, प्रश्न दिसले.यात या उपचाराचा खर्च किती?,साईडइफेक्ट काय आहेत? परिणाम किती काळ टिकतो.असे अनेक प्रश्न होते? मी यातली तज्ञ नाही.त्यामुळे यातल्या तांत्रिक बाबीबाबत मला येथे बोलायचे नाही. पण आवर्जून सांगायचे आहे. आपल्या न्यूरॉलॉजिस्टना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये.तुमच्यासाठी योग्य असलेल्या गोष्टी ते सुचवतीलच.
आमच्या WhatsApp गटात याबाबत साधक बाधक खूप चर्चा झाली.औरंगाबादच्या न्यूरॉलॉजिस्ट कंजाळकर यांनी आमचे शुभंकर रमेश तिळवे यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून या उपचाराबाबातची शास्त्रशुद्ध माहिती दिली. आणि आमच्या शंकांचे निरसनही झाले.डॉक्टरांचे मनापासून आभार.
या सगळ्या प्रक्रियेत मला एक गोष्ट जाणवली.ती म्हणजे लोकांपर्यंत पोचण्यासाठी अनेक शब्दांनी जे काम होत नाही ते दृष्य स्वरूपातील माहितीने होते.
८ डिसेंबरला सुनिता कट्टी यांनी पार्किन्सन्स गटात बेंगलोर च्या एका हॉस्पिटलमध्ये. ही ट्रीटमेंट चालू असल्याचे वृत्त पाठवले होते त्यानंतर १२ डिसेंबरला नानावटी हॉस्पिटलमधील प्रयोगाचे वृत्त स्वाती ढींगरा यांनी पाठवले होते. या उपचाराची प्रक्रिया कसी असेल याची माहितीही एका लिंक द्वारे आली होती. पण त्यावेळी त्याची खूप दखल घेतली असे वाटले नाही पण व्हिडिओमुळे मात्र याचा सर्वत्र प्रसार झाला दृश्यस्वरूपातील माध्यम किती प्रभावी असते याचा प्रत्यय आला.शुभार्थींचे सकारात्मक अनुभव सर्वांच्या पर्यंत पोचवायचे तर जास्तीत जास्त या माध्यमाचा उपयोग करायला हवा याची जाणीव झाली.