गुरुवार दि. १ सप्टेंबर २०१६ च्या कार्यशाळेचे वृत्त. – डॉ. शोभना तीर्थळी
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने फिजिओथेरपी कार्यशाळा आयोजित केली होती.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या ‘डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’च्या
न्युरोफिजिओथेरपिस्ट प्राध्यापक डॉक्टर नेहा सिंग त्यांचे सहकारी आणि विद्यार्थिनी अशी ४५ जणांची टीम या कार्यशाळेसाठी खास लोणीहून आली होती.या टीमसह एकूण ९० जण कार्यशाळेत सहभागी होते.
डॉक्टर नेहा सिंग, २०१२ साली मंडळाने फिजिओथेरपी कार्यशाळा आयोजित केली होती तेंव्हा डी.वाय.पाटील कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी म्हणून सहभागी होत्या.त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रकल्प पार्किन्सन्सवर आधारित होता.आज त्या स्वत: प्राध्यापक म्हणून कार्यशाळेचे आयोजन करत होत्या.अश्विनी मध्ये त्यांची टीम दोन वाजताच हजर झाली.मंडळाचे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे अडीच वाजता गेले तर नेहा आणि टीमची गरजेनुसार टेबल खुर्च्या मांडून,बॅनर लावून पूर्व तयारी झाली होती.शुभंकर, शुभार्थीही येऊ लागले होते.त्यामुळे वेळेत कार्यक्रमास सुरुवात झाली.
सुरुवातीला शुभार्थी कडून अनुमती पत्रक (consent form ) भरून घेऊन प्रत्येकाला बिल्ले लावण्यात आले.प्रत्येकाचे वजन,उंची,बी.पी. पाहण्यात आले.विद्यार्थिनीनी शुभार्थींचे assessment form भरले. एकूण ३६ शुभार्थी होते.स्टेशन १,२,३,४ अशा पाट्या टेबलसमोर लावल्या होत्या.मधल्या भागात शुभंकर आणि ज्यांची तपासणी झाली आहे त्या शुभार्थींची बसायची व्यवस्था केली होती.शुभार्थींचे, कंप,तोल जाणे,ताठरता, पोश्चर अशा समस्येनुसार वर्गीकरण केले होते. त्यानुसार वेगवेगळ्या स्टेशनवर शुभार्थींना बसवले गेले.प्रत्येक शुभार्थीबरोबर एक विद्यार्थिनी होती.प्रत्येक शुभार्थीला पुरेसा वेळ देऊन शिस्तबद्धपणे प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत, माहिती आणि व्यायाम सांगण्याचे काम सुरु होते..छापील माहिती असलेली पत्रकेही देण्यात आली.एकीकडे ३.३० वाजता डॉक्टर नेहा यांनी कार्यशाळेचे प्रयोजन आणि माहिती सांगितली.चार वाजता सर्वाना एकत्र बसवून सर्वांकडून कार्डियाक एक्सरसाईज म्हणजे चेअर एरोबिक्स करून घेतले.प्रत्येक शुभार्थीच्या शेजारी एक फिजिओथेरपिस्ट होता.समोर डॉक्टर साहिल घोरपडे,डॉक्टर रॅचेल नगरकर हे दोन डेमॉन्स्ट्रेटर होते.याशिवाय डॉक्टर नेहाही स्वत:एक्सरसाईज कसे करायचे हे दाखवत होते.यात खालीलप्रमाणे एक्सरसाईज शिकवले.
१)march pass २)stretch & swipe ३) tap & clap ४) एक आणि तीनचे एकत्रीकरण ५) दोन आणि तीनचे ६) दोन्ही हात जोरजोरात झटकणे.हे सर्व करताना काय काळजी घ्यायची हेही सांगितले.उदाहरणार्थ नाश्त्याआधी करणे,जेवणानंतर १ ते दीड तासाने करणे,आरश्यासमोर बसून १,२,३,४ असे अंक मोजत करणे हे महत्वाचे असल्याचे सांगितले.
याशिवाय हात आणि पाय यांचे कोआर्डीनेशन,श्वासोच्छवास,पोश् चर,कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीही महत्वाच्या असल्याचे सांगितले.
या सगळ्या भरगच्च कार्यक्रमात नेहमीप्रमाणे वाढदिवसही साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त उषा चौधरी यांनी काजू डिलाईट आणि शीला कुलकर्णी यांनी चॉकलेट दिली.
शुभंकर कल्याणी कुलकर्णी या छोट्या मोठ्या कामासाठी ऑनलाईन केअरटेकर पुरविणारी संस्था सुरु करणार आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे यांना नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करावयाचा आहे त्यासाठी शुभार्थिनी सहभागी व्हावे अशी त्यांनी विनंती केली.
अडीच तीनला सुरु असलेला हा भरगच्च कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालला.डॉक्टर नेहा यांनी केलेले नियोजन, दीपा होनप,अरुंधती जोशी,सविता ढमढेरे, वसू जोशी या कार्यकर्त्यांनी केलेली धावपळ,त्यांना अनेक शुभंकरांची साथ, शुभार्थीं चा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.