जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा ११ एप्रिल वृत्त – डॉ. शोभना तीर्थळी
रविवार दिनांक १0 एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता.एप्रिलच्या भर उन्हात दुपारी साडे चारला कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते
सुजाता हरगुडेने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने सर्व आत प्रवेश करत होते.चाफ्याचे फुल देऊन सर्वांचे स्वागत केले गेले.
गणेश वंदना आणि त्यानंतर’ हमको मनकी शक्ती दे’ या आत्मिक बळ देणाऱ्या’ प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत विनया मोडक. वसुधा बर्वे,पद्मजा ताम्हणकर, सविता ढमढेरे आणि अंजली महाजन, या शुभार्थी आणि शुभंकरांनी सहभाग घेतला.संवादिनीवर त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर होत्या .
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व संचालन सौ.आशा रेवणकर यांनी आपल्या ओघवत्या आणि माहितीपूर्ण शैलीत केले.मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.
( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता.त्यांचे संचालन हृषीकेश पवार आणि प्रियशा यांनी केले.लय, तालबद्ध व नियंत्रित हालचाली यांनी कार्यक्रम सुरुवातीसच खूप उंचीवर गेला.
प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उभे राहून सलामी दिली.नृत्यामध्ये विलास जोशी,प्रज्ञा जोशी,मृत्युंजय हिरेमठ,शरद सराफ,प्रभाकर आपटे,सौ लेले,विजय देवधर,शशिकांत देसाई,श्री.देसाई,कर्नल पी.व्ही.चंद्रात्रेय या शुभार्थिनी आणि ,सौ.शेंडे या शुभंकरानी सहभाग घेतला.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या साडे सात वर्षाच्या परिश्रमाचे हे फलित होते.हृषीकेशने या उपक्रमाची फोटोसह माहिती हावर्ड युनिव्हर्सिटीच्या अल्टरनेटीव थेरपीत समाविष्ट झाल्याचे सांगितले.२०१५/१६ मध्ये तयार झालेल्या डान्स फॉर पार्किन्सन्स या फिल्मचे अमेरिकेच्या ‘मायकेल जे फॉक्स रिसर्च’ सेंटरमध्ये स्क्रीनिंग झाले तो अनुभवही आनंददायी होता असे सांगितले.अत्यंत सहज हालचाली करणाऱ्या श्री सराफ यांच्या पायात नुकताच रॉड घातला आहे हे सूत्र संचालिकेने सांगितले तेंव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विद्याधर वाटवे यांचे श्री.शरच्चंद्र पटवर्धन यांच्यासह मंचावर आगमन झाले.सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.यानंतर श्री पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन
पाहुण्यांचा सत्कार केला.पाहुण्यांच्या सत्कारानंतर गेली आठ वर्षे अश्विनी हॉटेल कार्यक्रमासाठी मोफत देणारे श्री.देवस्थळी,नृत्योपचारासाठी स्वत:च्या घरातील हॉल गेली सात वर्षे देणाऱ्या सुमन जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वृषाली बेलेकर,स्मरणिकेच्या प्रत्येक अंकात माहेश्वरी बँकेची जाहिरात देणाऱ्या उर्मिला तोष्णीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर विद्याधर वाटवे यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
डॉक्टर वाटवे यांनी स्वत:ची ओळख स्वत:च करून देणार असल्याचे सांगितले होते.त्यांनी एमडी,डीपीएम.ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व पदविका प्राप्त केली आहे.पुना हॉस्पिटलच्या स्थापनेपासून ते तेथे कार्यरत आहेत. अखिल भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.जागतिक मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचेही ते सदस्य आहेत.
आपल्या व्याख्यानात डॉक्टर वाटवे यांनी प्रथम पार्किन्सन्स आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे याबद्दल माहिती सांगितली.पार्किन्सन्स पेशंटला होणाऱ्या मानसिक आजाराचे निदान करताना प्रथम पीडीची औषधे,डायबेटीस,बीपी इ.ची औषधे याचा काही परिणाम आहे का हे पाहावे लागते.त्यानुसार पुढे औषधोपचार करावे लागतात.पीडी पेशंटबाबत न्युरॉलॉजीस्ट हा टीम कप्तान असतो.
पार्किन्सन्स मध्ये होणाऱ्या मानसिक आजारात प्रथम क्रमांक डिप्रेशनचा.४०% पेशंटमध्ये ते आढळते.काही वेळा डिप्रेशन निदान झाल्यावर त्या धक्क्यातून तात्कालिक असे ते असते.डोपामिनची पातळी कमी झाल्यानेही उदभऊ शकते. काहीवेळा पीडीची इतर लक्षणे दिसण्यापुर्वी लक्षण म्हणूनही डिप्रेशन आढळते.यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधाने काही वेळा कॉन्स्टिपेशन,अस्वस्थता असे साइड इफेक्ट होतात.शॉक ट्रिटमेंट हा सर्वात सुरक्षित उपचार आहे. पण त्याबाबत गैरसमज आढळून येतात.सिनेसृष्टीतील अतिरंजित कथा यात भर टाकतात.
यानंतर येतो चिंतातूरता( anxiety ) हा आजार.यात विविध प्रकारची भीती,काळजी येते.यासाठी anti anxiety औषधे,समुपदेशन,सायको थेरपी यांचा उपयोग होतो.
निर्विकारता ( Apathy ) बऱ्याच पेशंटमध्ये दिसते.हा औषधाचा परिणामही असू शकतो.याशिवाय सायकोसीस,यात hallucination,delusion यांचा समावेश होतो.काही वर्तन समस्याही असतात.
डिमेन्शीया,यात बुद्धी,भावना,व्यक्तिमत्वाचा हळूहळू ऱ्हास होतो हाही काहीजणात संभवतो.पूर्वी मानसोपचाराच्या औषधाने पीडी वाढायचा परंतु आता अनेक नविन औषधे आली आहेत.या सर्वावर न्युरॉलॉजीस्टआणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्या सहाय्याने उपचार करता येतात.शुभंकराची भूमिकाही महत्वाची असते.
भाषणात शेवटी प्रार्थना, नृत्य यांचे त्यांनी कौतुक केले.स्वमदत गटही मानसिक आधारासाठी सहाय्यक ठरत असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
रामचंद्र करमरकर यांनी विविध निवेदने केली.
दीपा होनप यांनी आभारप्रदर्शनाचे काम अत्यंत भावपूर्ण शब्दात केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे तोंड पेढ्यांनी गोड करून कार्यक्रम संपला.उपस्थित शुभार्थीना स्मरणिका मोफत देण्यात आल्या.सभेस येऊ न शकलेल्याना पोस्टानी पाठवण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यात अनेक स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.छपाईचे काम करताना इतरही मदत करणारे विनय दिक्षित, येणाऱ्यांची नोंद् ठेवणारे व स्वागत करणारे सुनंदा गोडबोले,रेवती हर्डीकर,सुहास हर्डीकर,अरुंधती जोशी;पुस्तक विक्रीचे काम करणारे हरिप्रसाद व उमा दामले,अजित कट्टी,विनया व मोरेश्वर मोडक,हे सर्व आमचेच आहेत.त्यांचे नेहमीच सहकार्य असणार आहे याची खात्री आहे.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग आणि फोटो काढण्याचे काम शशांक साठे आणि प्रशांत शेंडे यांनी उत्तमरीत्या केले आहे.वेबसाईटवर ते देण्यात येईल.कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्याना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.